गुजरातमध्ये भीषण स्फोट, अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल; 17 ठार अनेक जखमी
बनासकांठाच्या जिल्हाधिकारी मिहीर पटेल यांनीही माहिती देताना म्हटले की, आज सकाळी आम्हाला डिसा येथील औद्योगिक वसाहतीत एका फॅक्टरीत स्फोट झाल्याची माहिती मिळाली.

अहमदाबाद : गुजरातमधील बनासकांठा जिल्ह्यातील डिसा येथील एका फटाक्याच्या फॅक्टरीत भीषण स्फोट (Blast) झाल्याची घटना घडली. त्यामध्ये, 17 जणांचा मृत्यू झाला असून काहीजण गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. घटनेची माहिती मिळताच डिसा ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विजय चौधरी यांनी याबाबत माहिती देताना म्हटले की, येथील एका फटाक्याच्या फॅक्टरीत आग लागल्याची घटना घडली, त्यानंतर कंपनीत एकापाठोपाठ एक स्फोट घडून आले. त्यामध्ये, कंपनीतील काही कामगार अडकले. आगीची (Fire) तीव्रता भीषण असल्याने फॅक्टरीचा मलबा 200 मीटर दूरपर्यंत पोहोचला होता.
बनासकांठाच्या जिल्हाधिकारी मिहीर पटेल यांनीही माहिती देताना म्हटले की, आज सकाळी आम्हाला डिसा येथील औद्योगिक वसाहतीत एका फॅक्टरीत स्फोट झाल्याची माहिती मिळाली. त्यानंतर, अग्निशमन दलाच्या गाड्यांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र, या आगीच्या दुर्घटनेत कंपनीतील 17 कामगारांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत काही कामगार जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, स्फोटाची दाहकता एवढी भीषण होती की, फॅक्टरीतील भींतीही ढासळल्याचं पाहायला मिळालं. अनेक कामगारांच्या अंगाच्या चिंधड्या चिंधड्या झाल्या होत्या. या दुर्घटनेवेळी कंपनीत 20 कामगार कामावर होते, अशी प्राथमिक माहिती आहे.
दरम्यान, स्फोटाच्या घटनेनंतर अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली असून मदत व बचावकार्य सुरू केलं आहे.
#WATCH | Gujarat | Explosion occurs in a factory in the industrial area in Deesa, Banaskantha district; Five workers dead, says Collector. pic.twitter.com/PYkmn4UVeW
— ANI (@ANI) April 1, 2025























