UPSCतील मराठी गुणवंतांचा राजधानीत सत्कार, मराठी अधिकाऱ्यांचं 'पुढचं पाऊल', दिग्गजांची उपस्थिती
यूपीएससीच्या परीक्षेत घवघवीत यश मिळवलेल्या गुणवंतांचा उद्या राजधानीत मान्यवरांच्या हस्ते सत्कार होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई हे या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे असणार आहेत.
नवी दिल्ली : यूपीएससीच्या परीक्षेत (UPSC Result) घवघवीत यश मिळवलेल्या गुणवंतांचा उद्या राजधानीत (Navi Delhi) मान्यवरांच्या हस्ते सत्कार होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई (Bhushan Gawai) हे या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे असणार आहेत. गुणवंतांचा सत्कार आणि यूपीएससीची तयारी करणाऱ्या परीक्षार्थींना मार्गदर्शन असं या सोहळ्याचं स्वरुप असणार आहे. दिल्लीतल्या डॉ. आंबेडकर इंटरनॅशनल सेंटरमध्ये सोमवारी 29 नोव्हेंबर रोजी दुपारी 2 ते 6 या वेळेत हा कार्यक्रम होणार आहे. डीओपीटी विभागाचे माजी सचिव दीपक खांडेकर, व्हाईस अँडमिरल सतीश घोरमाडे यांचीही कार्यक्रमाला उपस्थिती असेल.
दिल्लीत मराठी अधिकाऱ्यांनी स्थापन केलेल्या पुढचे पाऊल या संस्थेकडून हा कार्यक्रम पार पडतोय. दिल्लीत यूपीएससीच्या तयारीसाठी येणाऱ्या मराठी विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चाललीय. त्या उद्देशानं या विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळावं यासाठी पुढचे पाऊल ही संस्था हा कार्यक्रम आयोजित करते. यंदाचे हे कार्यक्रमाचे तिसरे पुष्प आहे.
राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाचे सदस्य आणि निवृत्त सनदी अधिकारी ज्ञानेश्वर मुळे या कार्यक्रमाचे अध्यक्ष असणार आहेत. डॉ. मुळे हे पुढचे पाऊल चे संस्थापक असून तामिनाडू केडरचे सनदी अधिकारी आनंद पाटील, डॉ. ज्ञानेश्वर वीर, उन्मेष वाघ, राहुल गरुड, प्रफुल्ल पाठक यांच्यासह एकूण 175 हून अधिक मराठी अधिकाऱ्यांचा पुढचे पाऊलमध्ये सहभाग आहे.
विमानतळ सुरक्षा विभागाचे अतिरिक्त महासंचालक प्रमोद फळणीकर ( IPS), दिल्ली सरकारमध्ये मुख्यमंत्र्यांचे सचिव संतोष वैद्य ( IAS) , संरक्षण मंत्रालयातले कार्यकारी संचालक सुशील गायकवाड ( IRTS) हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित असतील.
सप्टेंबर महिन्यात लागलेल्या यूपीएससीच्या निकालात यावेळी 70 मराठी विद्यार्थ्यांनी बाजी मारली होती. त्यातल्या अनेक गुणवंतांचं मनोगत, परीक्षेच्या तयारीबाबतचे त्यांचे अनुभव ऐकण्याची संधी या कार्यक्रमाच्या निमित्तानं विद्यार्थ्यांना मिळणार आहे. मृणाली जोशी, विनायक नरवाडे, रजत उभयकर, जयंत नाहाटा,धीनाह दस्तरगीर, विनायक महामुनी या यशस्वी उमेदवारांना या कार्यक्रमासाठी निमंत्रित करण्यात आलं आहे.