Manipur Violence: मणिपूरमध्ये सुरक्षा दल आणि पोलिसांकडून गेल्या चार दिवसांत 40 संशयित दहशतवाद्यांचा खात्मा; मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती
मारले गेलेले कुकी अतिरेकी गटातील संशयित 40 सशस्त्र दहशतवादी असल्याची माहिती मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांनी इंफाळमध्ये दिली. कारवाई सुरुच असून मृतांचा आकडा अजूनही वाढू शकतो.
Manipur Violence: गेल्या अनेक दिवसांपासून हिंसाचाराने होरपळून निघत असलेल्या मणिपूरमध्ये सुरक्षा दल आणि पोलिसांनी गेल्या चार दिवसांपासून केलेल्या कारवाईत 40 जणांचा खात्मा करण्यात आला आहे. मारले गेलेले कुकी अतिरेकी गटातील संशयित 40 सशस्त्र दहशतवादी असल्याची माहिती मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांनी इंफाळमध्ये दिली. राज्य सरकारच्या अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार सशस्त्र अतिरेक्यांच्या विरोधात धडक कारवाई सुरुच असून मृतांचा आकडा अजूनही वाढू शकतो.
मणिपूरमध्ये नव्याने हिंसाचार
मणिपूरमध्ये शनिवारी रात्रीपासून अनेक ठिकाणी झालेल्या ताज्या हिंसाचारात चार नागरिक आणि एक निमलष्करी जवान ठार झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
मुख्यमंत्री काय म्हणाले?
मुख्यमंत्री बिरेन सिंह यांनी सांगितले की, मणिपूर पोलिसांकडून हिंसाचारग्रस्त भागात कारवाई केली जात आहे. नागरिकांविरोधात अत्याधुनिक शस्त्रे वापरणाऱ्या या दहशतवादी गटांविरुद्ध प्रत्युत्तरादाखल कारवाई केली जात आहे. कारवायांमध्ये, विविध भागात सुमारे 40 दहशतवादी मारले गेले आहेत आणि काहींना सुरक्षा दलांनी अटक केली आहे. नव्याने उफाळून आलेला हिंसाचार दोन समुदायांमधील नसून मणिपूरचे विघटन करण्याचा प्रयत्न करणाऱ्या सशस्त्र दहशतवाद्यांमधील असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की ही कारवाई कुकी अतिरेकी गटांविरुद्ध आहे ज्यांनी ऑगस्ट 2008 मध्ये केंद्र आणि राज्य सरकारसोबत सस्पेंशन ऑफ ऑपरेशन्स (एसओओ) करार केला होता.
25 कुकी अतिरेकी गटांसोबत करारावर स्वाक्षरी करण्यात आली होती. (त्यामधील 17 कुकी नॅशनल ऑर्गनायझेशनच्या अंतर्गत आहेत आणि आठ युनायटेड पीपल्स फ्रंट अंतर्गत आहेत) केलेल्या करारानुसार, या गटांच्या कार्यकर्त्यांना नेमलेल्या परिसरात बंदिस्त करून त्यांची शस्त्र बंदिस्त ठेवण्यात आली होती.
हिंसाचारावरून आरोप प्रत्यारोप
मणिपूरमध्ये हिंसाचार पसरवण्यात सस्पेंशन ऑफ ऑपरेशन्स गटातील अतिरेकी सहभागी होऊ शकतात, असा आरोप राज्य सरकारने केला आहे. दुसरीकडे, कुकी गटांकडून या हिंसाचारासाठी दोन कट्टरपंथी गट अरामबाई टेंगगोल आणि मेईतेई समुदायाच्या मीतेई लीपुन यांना जबाबदार धरण्यात आले आहे.
3 मे पासून मणिपुरात हिंसाचाराचा आगडोंब
दुसरीकडे, 3 मे रोजी कुकी आणि मेईतेई समुदायांमध्ये सुरू झालेल्या जातीय संघर्षाला 53 टक्के लोकसंख्येचा समावेश असलेल्या माजी मणिपूरच्या प्रबळ समुदायाला अनुसूचित जमातीचा (ST) दर्जा देण्यास विरोध केल्यावर सुरू झाला. हिंसक संघर्षात आतापर्यंत 74 जणांचा मृत्यू झाला आहे, जवळपास 300 जखमी झाले आहेत आणि 30,000 हून अधिक लोक विस्थापित झाले आहेत. राज्याच्या बहुतांश भागात कर्फ्यूला काही प्रमाणात शिथिलता देण्यात आली आहे आणि गेल्या 25 दिवसांपासून सर्व इंटरनेट सेवा बंद आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या