Manipur Violence: एन बिरेन सिंह राजीनामा देणार नाहीत, फाडलेले राजीनामा पत्र व्हायरल, मुख्यमंत्र्यांना महिलांचा पाठिंबा वाढला
Manipur CM N Biren Singh: मणिपूरमध्ये सुरू असलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री बिरेन सिंह राजीनामा देणार असल्याची चर्चा होती.
मणिपूर: मणिपूरचे मुख्यमंत्री बिरेन सिंह यांनी राज्यातील महिलांच्या वाढल्या पाठिंब्यामुळे राजीनामा न देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे. राज्यात उसळलेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर (Manipur Violence) मणिपूरचे मुख्यमंत्री बिरेन सिंह राजीनामा देणार अशी चर्चा होती. त्या पार्श्वभूमीवर बिरेन सिंह आज राज्यपालांना भेटून राजीनामा सादर करतील अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. पण पीटीआयने दिलेल्या ताज्या माहितीनुसार, बिरेन सिंह यांनी राजीनामा न देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी आपला राजीनामा फाडला असून त्याचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
PHOTO | Supporters of Manipur CM N Biren Singh stop him from meeting Governor and tender his resignation. pic.twitter.com/dNj1PupOog
— Press Trust of India (@PTI_News) June 30, 2023
मणिपूरचे मुख्यमंत्री आज राजीनामा देणार अशी चर्चा असतानाच शेकडो महिला त्यांच्या निवासस्थानी जमल्या. बिरेन सिंह यांनी राजीनामा देऊ नये अशी मागणी करत त्यांनी धरणे धरले. त्यानंतर राज्यातील दोन मंत्र्यांनी बिरेन सिंह यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर बिरेन सिंह यांनी आपले राजीनामा पत्र फाडल्याची माहिती आहे.
राहुल गांधी मणिपूर दौऱ्यावर
काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi Manipur Visit) दोन दिवसांच्या मणिपूर दौऱ्यावर आहेत. राहुल गांधी आज इंफाळ हॉटेलमध्ये समविचारी पक्षाचे नेते, युनायटेड नागा कौन्सिल (UNC) चे नेते आणि नागरी समाज संघटनांच्या सदस्यांना भेटणार आहेत.
मणिपूरमधील हिंसाचाराबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मौनाबाबत पत्रकारांनी विचारले असता राहुल गांधी म्हणाले की, मी येथे येऊन राजकीय विषयांवर भाष्य करणार नाही. "मी येथे कोणतेही राजकीय भाष्य करण्यासाठी आलो नाही... मी येथे या मुद्द्यांवर भाष्य करणार नाही... येथे लवकरात लवकर शांतता प्रस्थापित व्हावी अशी माझी इच्छा आहे," असे ते म्हणाले.
राहुल गांधी म्हणाले की मणिपूरमधील हिंसाचारामुळे प्रभावित झालेल्या लोकांना भेटल्यानंतर त्यांना प्रचंड वेदना झाल्या. या ठिकाणची परिस्थिती लवकरात लवकर सर्वसामान्य व्हावी अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली.
आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये राहुल गांधी म्हणाले की, "मणिपूरमधील हिंसाचारामुळे ज्यांनी आपले प्रियजन आणि घरे गमावली आहेत अशा लोकांची दुर्दशा पाहणे आणि ऐकणे हृदय पिळवटून टाकणारे आहे ... जेव्हा मी एखाद्या बहिणीला किंवा एखाद्याला भेटतो त्यावेळी वाईट वाटतं.
हिंसाचारग्रस्त राज्यात शांततेचे आवाहन करताना राहुल गांधी म्हणाले, "मणिपूरला सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शांतता हवी आहे, जेणेकरुन आपल्या लोकांचे जीवन आणि उपजीविका सुरक्षित राहू शकेल. त्या ध्येयासाठी आपले सर्व प्रयत्न एकत्र असले पाहिजेत."
मणिपूरमध्ये गेल्या दोन दिवसांत नव्याने हिंसाचार उसळल्यानंतर एका पोलीस हवालदारासह तीन जणांचा मृत्यू झाला आहे.
मणिपूरच्या तणावग्रस्त कांगपोकपी जिल्ह्यात झालेल्या चकमकींची माहिती देताना भारतीय लष्कराने सांगितले की, सशस्त्र दंगलखोरांनी हराओथेल गावात गोळीबार केला. लष्कराच्या म्हणण्यानुसार, याला प्रत्युत्तर म्हणून, परिस्थिती बिघडू नये म्हणून लष्कराने आपले सैनिक प्रभावित भागात पाठवले आहेत.
ही बातमी वाचा: