(Source: ECI/ABP News/ABP Majha)
कूचबहार गोळीबार प्रकरणी गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, ममता बॅनर्जींची मागणी; CRPF ने गोळीबार केल्याचा आरोप
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी उद्या कूचबिहारमधील त्या ठिकाणी भेट देणार आहेत, जिथे आज झालेल्या गोळीबारात चार जणांचा मृत्यू झाला.विशेष निरीक्षकांच्या अंतरिम अहवालाच्या आधारे कूचबिहारच्या सितलकुची विधानसभा मतदार संघातील मतदान केंद्र क्रमांक 126 वरील मतदान रद्द करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
कोलकाता : बंगालच्या कूचबिहारमधील सितलकुची येथे झालेल्या गोळीबारावरुन तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी केंद्रीय गृहमंत्र्यांचा राजीनामा मागितला आहे. याचवेळी ममता यांनी लोकांना शांत राहण्याचे आवाहन केलं असून सीतलकुचीमधील मतदारांवर सीआरपीएफने गोळीबार केल्याचा आरोप केलाय. मात्र, सीआरपीएफने हा आरोप फेटाळून लावला आहे. सीतलकुची, कूचबिहार येथील बूथ क्रमांक -126 च्या बाहेर सीआरपीएफ तैनात नव्हते. या घटनेत कोणत्याही प्रकारचा सहभाग नसल्याचे स्पष्टीकरण सीआरपीएफकडून देण्यात आले आहे.
विधानसभेच्या चौथ्या टप्प्यातील मतदाना दरम्यान कूचबिहार जिल्ह्यातील सीतलकुची येथे केंद्रीय दलाच्या गोळीबारात लोकांनी आपले प्राण का गमावले? या प्रश्नाचं उत्तर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी द्यावं, अशी मागणी एका जाहीर सभेत बॅनर्जी यांनी केलीय. केंद्रीय दलाचे अत्याचार पाहून आपल्याला बराच काळपासून असं होण्याची भीती वाटत होती असा दावा त्यांनी केलाय.
"निवडणूक आयोगाला लाज वाटली पाहिजे."
मुख्यमंत्री म्हणाल्या, की "इतक्या लोकांना मारल्यानंतर ते (निवडणूक आयोग) म्हणत आहेत की गोळीबार स्वसंरक्षणासाठी करण्यात आला होता. त्यांना लाज वाटली पाहिजे. हे खोटे आहे. सीआरपीएफने रांगेत उभे असलेल्या लोकांवर गोळीबार केला. मतदान आणि सीतलकुचीमध्ये चार जणांना ठार मारले. मला बऱ्याच दिवसांपासून अशी कारवाई होईल, अशी भीती वाटत होती. भाजपला माहित आहे की त्यांनी जनाधार गमावला आहे, त्यामुळे ते लोकांना मारण्याचा कट रचत आहेत."
शाह यांनी रचलेल्या कटातील हा भाग असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. बॅनर्जी म्हणाल्या, मी सर्वांनी शांत राहून शांततेत मतदान करण्याचे आवाहन करते. त्यांचा पराभव करुन त्यांचा बदला घ्या. तीन वर्षांपूर्वी झालेल्या पंचायत निवडणुकांमध्ये मारल्या गेलेल्या लोकांपेक्षा या निवडणुकीत मारल्या गेलेल्या लोकांची संख्या जास्त आहे."
त्या म्हणाल्या, की "जर तुम्ही निवडणुकीच्या सुरुवातीपासूनच आतापर्यंत मारल्या गेलेल्या लोकांची संख्या मोजली तर सुमारे 17-18 लोक मारले गेले आहेत. किमान 12 लोक फक्त आमच्या पक्षाचे होते. आज घडलेल्या घटनेविषयी निवडणूक आयोगाने लोकांना स्पष्टीकरण द्यावे. आम्ही प्रशासनाचे प्रभारी नाही तर आयोग प्रशासनाचे प्रभारी आहेत."