नवी दिल्ली : देशाच्या राजकारणात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भूमिकेवर कायम प्रश्नचिन्ह निर्माण केले जाते. महाराष्ट्रातील राजकीय भूकंपामागेही शरद पवारांचा हात असल्याचे बोलले जात आहे. मात्र, काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना असे वाटत नसून शरद पवारांवर विश्वास असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांना याविषयी विचारले असता, यामागे पवारांचा हात नसल्याचे त्यांनी सांगितले.


काँग्रेसचे आमदार भोपाळला हलवले -
काँग्रेसचे आमदार हे काही भाजीपाला नाही, की ज्यांना खरेदी करता येईल. महाराष्ट्रात भाजप आणि अजित पवार यांनी दुर्योधन आणि शकुनी सारखे काम केले आहे. महाराष्ट्राच्या मुख्य न्यायधीशांनाही या शपथविधीचे निमंत्रण का दिले नाही? असाही प्रश्न रणदीप सुरजेवाला यांनी उपस्थित केला आहे. दरम्यान, खबरदारीचा उपाय म्हणून काँग्रेस त्यांच्या सर्व आमदारांना भोपाळला हलणार आहे.

भाजप बहुमत सिद्ध करु शकणार नाही - शरद पवार
अजित पवारांनी घेतलेला निर्णय हा त्यांचा वैयक्तीक निर्णय असल्याचे सांगत त्यांच्यावर कारवाई होईल, अशी माहिती राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी दिले. शिवसेना आणि राष्ट्रवादीने दुपारी साडेबारा वाजता संयुक्त पत्रकार परिषद घेत त्यांची भूमिका स्पष्ट केली. मला विश्वास आहे, की भाजप बहुमत सिद्ध करु शकणार नाही, असेही पवार यावेळी म्हणाले.

अजित पवारांची मनधरणी करण्यात अपयश
भाजपशी हातमिळवणी करत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणाऱ्या अजित पवार यांची मनधरणी करण्यात राष्ट्रवादीच्या नेत्यांना अपयश आले आहे. राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे, दिलीप वलसे पाटील आणि हसन मुश्रीफ हे अजित पवारांची मनधरणी करण्यासाठी गेले होते.

शिवसेनेचे नेते हॉटेल ललितमध्ये
महाराष्ट्रात झालेल्या राजकीय भूकंपामुळं शिवसेनेचेही धाबे दणाणले आहेत. त्यामुळं शिवसेना पक्षाने खबरदारीचा उपाय म्हणून त्यांचे सर्व आमदार मुंबईतील ललित हॉटेलमध्ये ठेवले आहेत. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सर्व आमदारांशी चर्चा केली असून सर्वांना शांत राहण्याचे आवाहन केले आहे.

पक्ष वाचवायचा असेल तर भाजपसोबत चला -
राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष फुटण्यापासून वाचवायचा असेल तर भाजपासोबत चला असा निरोप अजित पवार यांनी आमदरांकरवी शरद पवार यांना पाठवला असल्याचं सूत्रांच्या माहितीनुसार समजतं आहे. अजित पवार यांनी बंड करुन भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय इतका अनपेक्षित होता की अजित पवार यांनी आज थेट उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर वाय. बी. चव्हाण सेंटरमध्ये शरद पवार यांनी राष्ट्रवादीची बैठक बोलावली.

संबंधित बातम्या :

अजित पवारांच्या समर्थनातून राज्याला मजबूत सरकार देणार, शपथविधीनंतर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

पक्ष फुटण्यापासून वाचवायचा असेल तर भाजपसोबत चला; अजित पवारांचा आमदारांकरवी शरद पवारांना संदेश

Devendra-Ajit Sarkar | अजित पवारांचं बंड? भाजपला पाठिंबा! | ABP Majha