Maharashtra Breaking News 14 August 2022 : राज्य मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे अर्थ आणि गृह खातं
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
गुजरातमधील वलसाड जिल्ह्यातील उंबरगाव शहरातील बेला रेसिडेन्सी नावाच्या सोसायटीच्या 10 व्या मजल्यावर भीषण आग लागली आहे. अग्निशमन दल आणि पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून बचावकार्य सुरू केले आहे. अपार्टमेंटमधील लोकांना बाहेर काढण्याचे काम सुरू असून ही आग इमारतीच्या दहाव्या मजल्यापर्यंत पोहोचली आहे. उंबरगाव नगरपालिकेच्या गांधी वाडीजवळील बेला रेसिडेन्सी संकुलातील 10 मजली अपार्टमेंटमध्ये ही भीषण आग लागली आहे.
राज्य मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर झाले आहे. मुख्यमंत्र्यांकडे सामान्य प्रशासन, नगर विकास, माहिती व तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, सार्वजनिक बांधकाम(सार्वजनिक प्रकल्प), परिवहन, पणन, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन, मृद व जलसंधारण, पर्यावरण व वातावरणीय बदल, अल्पसंख्याक व औकाफ तसेच इतर कोणत्याही मंत्र्यांना वाटप न केलेले विभाग आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह, वित्त व नियोजन, विधी व न्याय, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, गृहनिर्माण, ऊर्जा, राजशिष्टाचार ही खाती असतील. तर राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे महसूल खाते दण्यात आले आहे. गुलाबराव पाटील यांच्याकडे पाणी पुरवठा आणि स्वच्छता, दीपक केसरकर यांच्याकडे शालेय शिक्षण मंत्री, उदय सामंत यांच्याकडे उद्योग मंत्रालय, तानाजी सावंत यांना सार्वजनिक आणि कुटुंब कल्याण, सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे वने आणि सांस्कृतीक कार्य, अब्दुल सत्तार यांच्याकडे कृषीमंत्री पद देण्यात आलंय.
राधाकृष्ण विखे-पाटील
महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास
सुधीर मुनगंटीवार
वने, सांस्कृतिक कार्य, व मत्स्य व्यवसाय
चंद्रकांत पाटील
उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य
डॉ. विजयकुमार गावित
आदिवासी विकास
गिरीष महाजन
ग्राम विकास आणि पंचायती राज, वैद्यकीय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण
गुलाबराव पाटील
पाणीपुरवठा व स्वच्छता
दादा भुसे
बंदरे व खनिकर्म
संजय राठोड
अन्न व औषध प्रशासन
सुरेश खाडे
कामगार
संदीपान भुमरे
रोजगार हमी योजना व फलोत्पादन
उदय सामंत
उद्योग
प्रा.तानाजी सावंत
सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण
रवींद्र चव्हाण
सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण
अब्दुल सत्तार
कृषी
दीपक केसरकर
शालेय शिक्षण व मराठी भाषा
अतुल सावे
सहकार, इतर मागास व बहुजन कल्याण
शंभूराज देसाई
राज्य उत्पादन शुल्क
मंगलप्रभात लोढा
पर्यटन, कौशल्य विकास व उद्योजकता, महिला व बालविकास
मंत्री संजय राठोड पोहरादेवीमध्ये दाखल झाले आहेत. पोहरादेवी येथे धर्म परिषद पार पडणार आहे. पोहरादेवी येथे बंजारा बांधवांची प्रचंड गर्दी पाहायला मिळत आहे. बंजारा वेशभूषा घालून महिलांनी जागोजागी लेंगी नृत्य सादर केलं. बंजारा समाजाचे राज्यभरातील कारभारी आणि नायक यांची ही या ठिकाणी उपस्थिती आहे. धर्म परिषदेसाठी राज्यभरातून बंजारा समाजाच्या नागरिकांची उपस्थिती पाहायला मिळत आहे.
महाराष्ट्राची चेरापुंजी म्हणून ओळख असलेल्या आंबोलीत मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. विकेंड असल्याने मोठ्या संख्येने पर्यटक पर्यटनासाठी आंबोलीत आल्यामुळे मोठी वाहतूक कोंडी झालीय. आंबोलीतील मुख्य धबधब्यावर दोन्ही बाजूंनी मोठी वाहतूक कोंडी दिसत आहे. वाहतूक कोंडीमुळे आंबोली घाटातून येजा करणाऱ्या वाहनचालकांना फटका बसत आहे.
पुणे सातारा रस्त्यावर कात्रजच्या नवीन बोगद्यामध्ये चार चाकी गाडीने पेट घेतला. काही वेळ या रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली होती. धुरामुळे काही वेळ काही दिसत नव्हते. अग्निशमन दलाने घटनास्थळी जाऊ आग विझवली आहे. यामध्ये कुठलीही जीवितहानी नाही. आगीचं कारण अद्याप कळू शकलेलं नाही. अग्निशमन दलाकडून मिळालेल्या माहितीनुसार कर्वेनगर येथील चार जण या गाडीतून साताऱ्याच्या दिशेने प्रवास करत होतो. कात्रज बोगद्यात गाडी गेल्यानंतर गाडीत असलेल्या प्रवाशांना इंजिन मधून धूर येतो आहे, असे दिसतात त्यांनी तात्काळ गाडीतून बाहेर पडत अग्निशमन दलाला बोलवले. अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली.
वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी येथे महंत यांनी धर्म परिषद आयोजित केली. या परिषदेत संजय राठोड सुद्धा जाणार असल्याने जिल्हा भारातील बंजारा समाज बांधव पोहरा देवी येथे जात आहे.
कॅबिनेट मंत्री संजय राठोड आपल्या मतदार संघ दिग्रसमध्ये दाखल झाले आहेत. त्यांनी दिग्रस शहराचे ग्रामदैवत असलेल्या घंटीबाबा देवस्थान इथे जाऊन घंटीबाबा यांचे दर्शन घेतलं. मंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर ते पहिल्यांदाच दिग्रसमध्ये आले आहेत.
बुलडाणा जिल्ह्यात आढळलेल्या पहिल्या स्वाईन फ्लू रुग्णाचा शनिवारी मध्यरात्रीच्या दरम्यान मृत्यू झाला आहे. इकबाल चौकात राहणाऱ्या एका युवकाला (32 वर्षीय) आठ दिवसांपूर्वी स्वाईन फ्लूची लागण झाली होती. त्याला बुलडाणा येथील जिल्हा महिला रुग्णालयात भरती करण्यात आले होते. सुरुवातीला त्याची दोन वेळा कोरोना टेस्ट करण्यात आली परंतु ही टेस्ट निगेटिव्ह आल्यामुळे त्याचा स्वाब पुणे एन आय व्ही ला पाठविण्यात आला होता. हा युवक स्वाईन फ्लू ग्रस्त निघाला. त्याची लक्षणे गंभीर होती. तो व्हेंटिलेटवर होता. शनिवारच्या मध्यरात्री त्याची प्राणज्योत मालवली.
राज्यात एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडानंतर 12 खासदारांनी सुद्धा बंडखोरी करत त्यांचा गटात सामील झाले होते. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील दोन्ही खासदारांचा समावेश होता. कोल्हापूरचे खासदार संजय मंडलिक आणि धैर्यशील माने यांनी बंडखोरी करत एकनाथ शिंदे गटात गेले. आता पहिल्यांदाच बंडानंतर हातकणंगले मतदारसंघाचे खासदार धैर्यशील माने कोल्हापूर जिल्हामध्ये प्रथमच येत आहेत. गेल्या महिनाभरापासून त्यांनी बंडखोरी गेल्यानंतर मतदारसंघांमध्ये प्रथमच येत आहेत. त्यांच्या आगमनानंतर किणी टोल नाक्यावरून ते पेटवडगावपर्यंत तिरंगा रॅली काढण्यात येणार आहे.
देशात सलग दुसऱ्या दिवशी कोरोना संसर्गामध्ये घट झाल्याचं आढळून आलं आहेत. देशात शनिवारी दिवसभरात अर्थात गेल्या 24 तासांत 14,092 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. आदल्या दिवसाच्या तुलनेत ही रुग्ण संख्या 1,723 ने कमी झाली आहे.
आज नागपुरात शेकडो विद्यार्थ्यांनी सामूहिक वंदे मातरम गायन केले. राष्ट्रनिर्माण समितीने सक्करदरा चौकात आज 14 ऑगस्ट रोजी अखंड भारत संकल्प दिनानिमित्त सामूहिक 'वंदे मातरम' गायनाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते. विद्यार्थ्यांना आणि युवा पिढीला भारताचे ऐतिहासिक स्वरूप माहित व्हावे, भारताचा गौरवशाली इतिहास त्यांना माहित व्हावा. अखंड भारताविषयी त्यांच्यात जागरूकता निर्माण करून राष्ट्रीय चेतना निर्माण व्हावी या उद्देशाने हे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. 'आपल्याला स्वातंत्र्य सहज मिळाले नाही तर हजारो क्रांतिकारकांच्या बलिदानाने स्वातंत्र्य मिळाले आहे. त्यांच्या स्मृतींना आज आपण वंदन केले पाहिजे', असे मत नितीन गडकरी यांनी व्यक्त केले. स्वातंत्र्यानंतर या देशाचे स्वातंत्र्य भारतीय राहण्यासाठी ज्यांनी सीमाचे रक्षण करताना बलिदान दिले अशा सर्व अशा सर्व सैनिकांना ही वंदन केले पाहिजे असे ही गडकरी म्हणाले.
बीडच्या पाटोदा-मांजरसुभा रोडवरील पाटोदया जवळ भीषण अपघात झाला आहे. स्विफ्ट कार आणि टेम्पोचा झालेला हा अपघात एवढा भीषण होता की सहा जणांचा यात मृत्यू झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बीडच्या पाटोदा -मांजरसुभा रोडवरील पाटोदया जवळ बामदळे वस्ती येथे स्विफ्ट डिझायर कार-आयशर टेम्पोचा भीषण अपघात झाला.
राकेश झुनझुनवाला यांचे (Rakesh Jhunjhunwala Passed Away) आज सकाळी निधन झाले. ते 62 वर्षांचे होते. मागील काही दिवसांपासून ते आजारी होते. त्यांच्या निधनाने शेअर बाजार विश्वातील एक प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व हरपल्याची भावना व्यक्त होत आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांच्या मालकीच्या अकासा एअर या विमान सेवेचे उद्घाटन झाले होते. मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात त्यांनी शेवटचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झुनझुनवाला यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.
विरारमध्ये एकाच कुटुंबातील पाच लहान मुलांना अन्नातून विषबाधा झाल्याची घटना समोर आली आहे. यात दोन लहानग्याचा मृत्यू झाला आहे. घटना शनिवारी घडली आहे. कुटुंबातील पाच जणांपैकी तिघांवर पालिकेच्या रुग्णालयात उपचार सुरु आहे. पोलिसांनी दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवलं असून, शवविच्छेदन अहवालानंतर दोन लहानग्यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे स्पष्ट होईल. अशी माहिती मांडवी पोलिसांनी दिली आहे.
रेल्वे स्टेशनवर लोकल एक्सप्रेसमध्ये चढता-उतरताना प्रवाशांच्या होणाऱ्या गर्दीचा फायदा घेत प्रवाशांचे मोबाईल चोरणाऱ्या एका सराईत चोरट्याला कल्याण रेल्वे पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. किसन परमार असं या चोरट्यांचं नाव असून तो विठ्ठलवाडी येथे राहणार आहे. कल्याण रेल्वे पोलीस ठाण्यात मोबाईल चोरी होण्याच्या तक्रारींमध्ये वाढ झाली होती. या पार्श्वभूमीवर कल्याण रेल्वे पोलिसांनी या चोरट्यांचा माग काढला. कल्याण स्टेशन परिसरात रेल्वे पोलिसांचे गस्त सुरू असताना किसन परमार हा स्टेशन परिसरात संशयास्पद रित्या फिरताना आढळून आला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेत त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे आठ मोबाईल आढळले. चौकशी दरम्यान हे आठ ही मोबाईल चोरीचे असल्याचं निष्पन्न झालं. परमारने आधी देखील आणखी काही मोबाईल चोरी केल्याचा संशय पोलिसांना असून त्यादृष्टीने पोलीस तपास सुरू आहे.
पार्श्वभूमी
राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय तसेच स्थानिक पातळीवरील घडणाऱ्या सर्व घडामोडींची सर्वात पहिली बातमी 'एबीपी माझा' आपल्या प्रेक्षक-वाचकांना देण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामध्ये आज राजकीय, सामाजिक, आर्थिक घडामोडींपासून ते खेळ आणि मनोरंजनाच्या बाबतीत अपडेट्स देण्याचा प्रयत्न असतो. आपल्या प्रेक्षक-वाचकांना अप-टू-डेट ठेवण्याचा एक भाग म्हणून आम्ही आज दिवसभरात काय-काय महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत याची माहिती देत आहोत.
फाळणी दिवस -
14 ऑगस्ट याच दिवशी अखंड भारताचे दोन तुकडे झाले. ही वेदना लक्षात घेऊन दरवर्षी 14 ऑगस्ट हा दिवस फाळणी दिन म्हणून स्मरणात ठेवला जाईल. देशाची फाळणी कशी भयावह ठरली आणि त्याचा परिणाम आजही दिसून येतो हे लक्षात ठेवण्यासाठी 14 ऑगस्ट रोजी हा विशेष दिवस साजरा केला जाणार आहे.
राष्ट्रपती देशाला संबोधित करणार -
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु 76व्या स्वातंत्रता दिवसाच्या पूर्वसंध्येला सायंकाळी सात वाजता राष्ट्राला संबोधित करणार आहेत. सायंकाळी सात वाजता आकाशवाणीवरुन थेट प्रेक्षपण करण्यात येणार आहे.
मुंबई पोलीस आयोजित आजादी की दौड मॅरेथॉन -
मुंबई पोलीस आयोजित आजादी की दौड, ही मॅरेथॉन दौड रविवारी सकाळी 6-10 आयोजित करण्यात आली आहे. या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत.
मराठा आरक्षण प्रश्नी मुख्यमंत्र्यांनी बोलवली बैठक
मराठा आरक्षणासंदर्भात चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी बैठक बोलवली आहे. रविवारी दुपारी 12 वाजता, सह्याद्री अतिथीगृहलर बैठक होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या बैठकीला राज्यातील मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक, मराठा नेत्यांना आमंत्रित करण्यात आलं आहे.
15 ऑगस्ट पूर्वी खाते वाटप होणार – सत्तार
9 ऑगस्टला शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आहे. आज सहा दिवसानंतरही मंत्री पदाची शपथ घेतलेल्या मंत्र्यांना खाते वाटप नाही. मंत्री अब्दुल सत्तार यांनी 14 पर्यंत खाते वाटप होईल असं सांगितलं आहे.
मालाड येथे होणाऱ्या तिरंगा यात्रेला उपमुख्यमंत्री सहभागी होणार -
मालाड येथे होणाऱ्या तिरंगा यात्रेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार गोपाळ शेट्टी, आमदार योगेश सागर सहभागी होणार आहेत. यावेळी साधारण 15,000 नागरिक सवा की.मी. चा अखंड ध्वज घेऊन सामील होणार आहेत, सकाळी 8.45 वाजता, मालाड (पश्चिम), नटराज मार्केट, शिव मंदिर येथून यात्रेला सुरुवात होणार आहे.
काँग्रेसकडून आझादी की गौरव यात्रा -
काँग्रेसकडून आझादी की गौरव यात्रा काढली जाणार आहे. याला वर्षा गायकवाड, भाई जगताप आदी नेते उपस्थित रहाणार आहेत, सकाळी 10 वाजता, प्रभाकर रेस्टॉरंट येथून पुढे महात्मा ज्योतिबा फुले मार्ग, हिंदमाता, फाळके रोड, मुंबई मराठी ग्रंथ सग्रहाल मार्गा वरून दादर स्टेशन यात्रा अशी असणार आहे.
कामाठीपुरात स्वच्छतेची स्पर्धा -
मुंबई – मुंबईतील कामाठीपुरा आता वेगळ्या कारणासाठी चर्चेत आहे. इथे महापालिकेच्या ई विभागाकडून एक अनोखा उपक्रम राबवला जातोय. कामाठीपुरात स्वच्छतेची स्पर्धा भरवली जातेय. ज्या महिलेचं घरं सर्वाधिक स्वच्छ आणि आरोग्यदायी त्यांना पालिकेकडून विशेष पुरस्कारही दिला जाणार आहे.
गणपती बाप्पाचे रौप्य महोत्सव -
मुंबई – भारताच्या स्वातंत्र्याचे अमृत महोत्सव आणि कला दिग्दर्शक अतुल खुळे यांच्या गणपती बाप्पाचे रौप्य महोत्सव यानिमित्त 25 गणपतींची आरास करायचा निश्चय केलाय. त्यासाठी 25 कलात्मक दृष्टी लाभलेले कलाकार त्यांच्या पध्दतीने 25 गणेश मूर्ती साकारणार, आपल्या प्रत्येकाच्या मनात एक आकार असतो. या ठिकाणी अच्युत पालव, दिग्दर्शक प्रमोद पवार इत्यादी मान्यवर उपस्थित रहाणार आहेत.
यमुना नदी प्रवाहाबाहेर -
मुसळधार पावसामुळे यमुना नदीला पूर येण्याची शक्यता आहे. परिसरात संततधार पाऊस कोसळत राहिल्यास यमुना नदी धोक्याची पातळी ओलांडण्याची शक्यता आहे. शनिवारी यमुना नदी धोक्याच्या पातळीजवळ वाहत होती. यमुना नदीच्या काटावर वसणाऱ्या गावांना धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. तसेच 13 हजार पेक्षा जास्त लोकांचं आतापर्यंत स्थलांतर करण्यात आले आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -