पेट्रोल, डिझेलनंतर आता घरगुती गॅस, सीएनजीच्या दरात वाढ
ग्राहकांच्या खात्यात ऑक्टोबर महिन्यात 376.60 रुपये प्रति सिलिंडर सबसिडी जमा होईल, जी सप्टेंबर महिन्यात 320.49 रुपये होती.
नवी दिल्ली : पेट्रोल, डिझेल दरवाढीचा मार सहन करणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना आता घरगुती गॅस दरवाढीचा झटका बसला आहे. दिल्लीत सबसिडी असलेल्या सिलिंडरची किंमत 2.89 रुपयांनी वाढली आहे. तर सबसिडी नसलेल्या सिलिंडरची किंमत 59 रुपयांनी वाढली आहे. आजपासून हे नवे दर लागू झाले आहेत.
दरवाढीनंतर दिल्लीत सबसिडी असलेल्या स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरची किंमत 2.89 रुपयांनी वाढली आहे. दिल्लीत सबसिडी असलेल्या सिलिंडरची किंमत 502.4 रुपये झाली आहे. सबसिडी नसलेल्या सिलिंडरची किंमत 820 रुपयांवरुन 879 रुपयांवर पोहोचली आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारातील वाढलेल्या किंमती आणि विदेशी चलनाच्या दरातील चढ-उतारामुळे ही वाढ करण्यात आली असल्याचं इंडियन ऑईलनं जारी केलेल्या परिपत्रकात म्हटलं आहे.
सबसिडी असलेल्या सिलिंडरच्या दरात झालेल्या दरवाढीचं मुख्य कारण सिलिंडरवरील जीएसटी हे आहे. त्यामुळे ग्राहकांच्या खात्यात ऑक्टोबर महिन्यात 376.60 रुपये प्रति सिलिंडर सबसिडी जमा होईल, जी सप्टेंबर महिन्यात 320.49 रुपये होती.
घरगुती सिलिंडरसोबतच सीएनजीच्या दरातही वाढ झाली आहे. दिल्लीत सीएनजीचे दर 1.70 रुपयांनी, तर नोएडामध्ये 1.95 रुपयांनी वाढले आहेत. या दरवाढीनंतर दिल्ली सीएनजी 44.30 रुपये तर नोएडामध्ये सीएनजी 51.25 रुपये प्रतिकिलो दरानं विकलं जात आहे.
पट्रोल आणि डिझेल दर रोज वाढत आहेत. महाराष्ट्रात पेट्रोलच्या दरांनी नव्वदी पार केली असून डिझेलचे दरही नव्वदीच्या दिशेने वाटचाल करत आहेत. त्यामुळे इंधन दरवाढीनंतर घरगुती सिलिंडर, सीएनजी दरवाढीनंही सर्वसामान्यांचा खिसा हलका होणार आहे.
इंधन दरवाढीबाबत सरकारने आधीच हात वर केले आहेत. तसेच आंतरराष्ट्रीय बाजारातील वाढलेल्या किंमतीमुळे होत असल्याचं सरकारनं स्पष्ट केलं आहे.