(Source: ECI/ABP News/ABP Majha)
I.N.D.I.A Alliance: इंडिया आघाडीचा प्रवास खडतर! अखिलेश यादवांनी दाखवला हिरवा कंदील, ममता बॅनर्जींनी बदलली भूमिका, बिहारमध्ये नितीश कुमारांमुळे संकट
I.N.D.I.A Alliance: इंडिया आघाडीमध्ये सध्या घमासान सुरु आहे. बिहार, पश्चिम बंगाल, हरियाणा आणि पंजाबमध्ये जागावाटपावरुन विरोधी पक्षांमध्ये एकमत नसल्याचं चित्र आहे.
मुंबई : बिहारमध्ये (Bihar) सध्या सुरु असलेल्या राजकीय उलथापालथीवरुन इंडिया आघाडीमध्ये (I.N.D.I.A Alliance) सारं काही अलबेल नसल्याचं स्पष्ट झालंय. एकिकडे इंडिया आघाडीमध्ये सामील असलेल्या आरजेडी आणि जेडीयूमध्ये बिहारमधील सत्तेसाठी लढत सुरु आहे. तसेच दुसरीकडे पश्चिम बंगाल आणि पंजाबमध्ये देखील जागावाटपाच्या मुद्द्यावरुन इंडिया आघाडीमध्ये संभ्रम असल्याचं म्हटलं जात आहे.
सध्या समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी उत्तर प्रदेशात काँग्रेसला 11 जागा देण्याची घोषणा केलीये. याचदरम्यान लोकसभा निवडणूकांसाठी सगळ्यात जास्त जागा असणाऱ्या राज्यामध्ये काँग्रेस आणि सपामध्ये जागावाटपासंदर्भात सहमत झाल्याची माहिती देखील समोर आलीये. याचदरम्यान काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी म्हटलं की, आम्ही काही राज्यांमध्ये आमच्या जागा निश्चित केल्या आहेत, पण याबाबत आम्ही कोणताही अधिकृत घोषणा केली नसल्याचं म्हटलं आहे.
उत्तर प्रदेशात इंडिया आघाडीचं समीकरण तयार
अखिलेश यादव यांनी ट्वीट करत यासंदर्भात माहिती दिली, त्यांनी म्हटलं की, काँग्रेससोबत आम्ही 11 जागांसाठी युती करण्यावर सकारात्मक चर्चा केली. हा कल विजयी समीकरणासह पुढे जाईल. इंडिया आघाडी आणि 'पीडीए'ची रणनीती इतिहास बदलेल.
बिहारमध्ये राजकीय उलथापालथी
दुसरीकडे नितीशकुमार यांच्यामुळे बिहारमध्ये इंडिया आघाडीसाठी संकट निर्माण झाल्याचं म्हटलं जात आहे. राजदसोबतची युती तोडून ते पुन्हा एनडीएमध्ये सामील होणार असल्याची चर्चा आहे. नितीश कुमार यांनी इंडिया आघाडी स्थापन करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली होती. अशा परिस्थितीत ते एनडीएसोबत गेले तर विरोधी आघाडीचे काय होणार, असा प्रश्न उपस्थित केला जातोय.
पंजाबमध्ये भगवंत मान यांच्याकडूनही नकारात्मकता
इंडिया आघाडीच्या अडचणी फक्त एवढ्यापुरत्या मर्यादित नाही, तर पंजाबमध्येही इंडिया आघाडीच्या अडचणी कायम आहेत. पंजाबमध्ये आपने सर्व 13 जागांवर निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी गेल्या बुधवारी सांगितले की, पंजाबमध्ये काँग्रेससोबत कोणतीही युती झालेली नाही आणि त्यांचा पक्ष राज्यात एकट्याने निवडणूक लढवेल.
हरियाणामध्ये इंडिया आघाडीसाठी संकट
याशिवाय इंडिया आघाडीसाठी हरियाणामध्ये अडचणी निर्माण झाल्याचं चित्र आहे. मात्र, आम आदमी पक्ष आणि काँग्रेसने यापूर्वीच हरियाणातील 10 जागांवर एकट्याने निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली आहे. सध्या दोन्ही पक्षांनी हा विषय हायकमांडवर सोपवलाय.
पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी स्वबळावर निवडणूक लढवणार
दरम्यान ममता बॅनर्जी यांनी देखील स्वबळावर निवडणूक लढवण्याची घोषणा केली होती. यासंदर्भात मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी म्हटलं की, काँग्रेससोबत आमची कोणतीही चर्चा झाली नाही. आम्ही नेहमी म्हणत आलोय की, पश्चिम बंगालमध्ये आम्ही एकट्याने निवडणूक लढवणार आहोत.