एक्स्प्लोर
मार्चच्या पहिल्या आठवड्यात लोकसभा निवडणुकांचा कार्यक्रम !
सध्या सुरु असलेल्या लोकसभेचा कार्यकाळ 3 जून 2019 ला संपणार आहे. त्यापूर्वी आगामी निवडणुका कोणत्या महिन्यात आणि किती टप्प्यात घेण्यात येणार? ही प्रक्रिया आयोगाने सुरु केली आहे.

नवी दिल्ली : निवडणूक आयोग मार्चच्या पहिल्या आठवड्यात आगामी लोकसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करु शकतं, अशी माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. लोकसभा निवडणुकीदरम्यान काही राज्यांच्या विधानसभा निवडणुकाही पार पडण्याची शक्यता आहे. सध्या सुरु असलेल्या लोकसभेचा कार्यकाळ 3 जून 2019 ला संपणार आहे. त्यापूर्वी आगामी निवडणुका कोणत्या महिन्यात आणि किती टप्प्यात घेण्यात येणार? ही प्रक्रिया आयोगाने सुरु केली आहे. आयोगाने 2004 चा लोकसभा निवडणूक कार्यक्रम 29 फेब्रवारीला जाहीर केला होता. या निवडणुका चार टप्प्यात झाल्या होत्या. तसेच 2009 मध्ये 2 मार्चआणि 2014 मध्ये 5 मार्च रोजी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता. मागील तीन लोकसभा निवडणुका एप्रिल ते मे महिन्याच्या दरम्यान झाल्या. लोकसभा निवडणुकांसह आंध्र प्रदेश, ओदिशा, सिक्किम आणि अरुणाचल प्रदेश या राज्यात विधानसभा निवडणुका होण्याची शक्यता आहे. सिक्किम विधानसभेचा कार्यकाळ मे महिन्यात संपणार आहे. तर आंध्र प्रदेश, ओदिशा, आणि अरुणाचल प्रदेश या राज्यांच्या विधानसभांचा जून महिन्यात कार्यकाळ पूर्ण होईल. दरम्यान जम्मू काश्मीरमध्ये भाजप आणि पीडीपी पक्षाची सत्ता होती. मात्र भाजप सत्तेतून पडला होता आणि तेथे राज्यापाल शासन लागू करण्यात आलं होत. सध्या तेथे राष्ट्रपती राजवट सुरु आहे. निवडणूक आयोगाला मे महिन्यात काश्मीरमध्ये निवडणुका घेणं अनिवार्य आहे. परंतू काश्मीरमधील निवडणुकांसाठी सुरक्षेबाबत विचार केला जाईल. जम्मू काश्मीरचा सहा वर्षाचा निर्धारित कार्यकाळ 16 मार्च 2021 पर्यंत होता. मात्र कोणत्याही पक्षाकडे सत्ता स्थापन करण्यासाठी पुरेसं संख्याबळ नसल्याने नोव्हेंबर 2018 मध्ये काश्मीर विधानसभा भंग करण्यात आली आहे.
आणखी वाचा























