Protest March LIVE UPDATES | देशभरात एल्गार, कामगार संघटनांचा बंद तर मनसेचा मोर्चा
संविधान दिवस अर्थात 26 नोव्हेंबरचा मुहूर्त साधत आज कामगार संघटनांनी देशव्यापी बंदची हाक दिली आहे. वाढीव वीज बिलाविरोधातील मनसे राज्यातील जिल्हाधिकारी कार्यालयांवर मोर्चा काढणार आहे.

Background
मुंबई : आजचा दिवस हा मोर्चा आणि आंदोलनाचा ठरणार आहे. कारण संविधान दिवस अर्थात 26 नोव्हेंबरचा मुहूर्त साधत आज कामगार संघटनांनी देशव्यापी बंदची हाक दिली आहे. याची महत्त्वाची बाब म्हणजे पहिल्यांद्याच कामगार संघटना, बँक कर्मचारी आणि शेती संघटना एकाच मुद्द्यावर एकाच दिवशी एकत्रितपणे आंदोलन करत आहेत. त्यासोबतच राज्यातील वाढीव वीज बिलाविरोधातील मनसेचा मोर्चाही आज आहे. राज्यातील जिल्हाधिकारी कार्यालयांवर मनसेच्या वतीने एकाच वेळी मोर्चा काढण्यात येणार आहे.
वाढीव वीज बिलाविरोधात मनसेचे राज्यभरात मोर्चे
वाढीव वीज बिलाच्या आंदोलनात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने उडी घेतली असून आता जनतेला न्याय देण्यासाठी आज संपूर्ण राज्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मोर्चे आयोजित केले आहेत. आज संपूर्ण राज्यातील जिल्हाधिकारी कार्यालयांवर मोर्चा काढण्यात येणार आहे. एकाच वेळी संपूर्ण राज्यात निघणाऱ्या या मोर्चामध्ये लाखो लोक सामील होतील असे नियोजन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात आले आहे.
पूर्ण राज्यात कोरोनामुळे लॉकडाऊन झालेल्या कालावधीमध्ये विजेचा वापर जास्त झाल्याचे कारण देत महावितरणच्या वतीने राज्यातील वीज ग्राहकांना वाढीव वीज बिल पाठवण्यात आली. अव्वाच्या सव्वा वीज बील असल्यामुळे लोकांमध्ये असंतोष निर्माण झाला होता. राज्य सरकारने ही वीज बिलं दुरुस्त करुन देण्याची देण्याचं आश्वासनही दिलं होतं. मात्र पुन्हा राज्य सरकारने घूमजाव केल्यामुळे वीज ग्राहकांमध्ये असंतोष निर्माण झालेला आहे. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आज (26 नोव्हेंबर) संपूर्ण राज्यातील जिल्हाधिकारी कार्यालयांवर एकाच वेळी वाढीव वीज बिलाच्या निषेधार्थ आणि शासकीय धोरणांच्या निषेधार्थ मोर्चाचे आयोजन केलेला आहे.
कामगार संघटनांकडून देशव्यापी बंदची हाक
आज 26 नोव्हेंबर अर्थात संविधान दिनाचा मुहूर्त साधत देशातल्या अनेक कामगार संघटनांनी केंद्र सरकारविरोधात देशव्यापी बंदचं आवाहन केलं आहे. देशातल्या कामगार कायद्यात जे बदल होत आहेत ते घातक असल्याचा आरोप करत विविध हक्कांसाठी हे पाऊल उचलण्यात आलं आहे.
शेती क्षेत्रातले जे तीन महत्त्वाचे कायदे मोदी सरकारने नुकतेच मंजूर केले. त्यामुळे नाराज असलेल्या शेतकरी संघटनाही या बंदला पाठिंबा देणार आहेत. देशातल्या दहा केंद्रीय कामगार संघटना तसेच 35 फेडरेशन यात सहभागी होणार आहेत. जवळपास 25 कोटी कर्मचारी यात सहभागी होतील असा दावा केला जात आहे. गेल्या अनेक वर्षात हे पहिल्यांदाच चित्र दिसेल की कामगार संघटना बँक कर्मचारी आणि शेती संघटना एकाच मुद्द्यावर एकाच दिवशी एकत्रितपणे आंदोलन करत आहेत.























