(Source: ECI/ABP News/ABP Majha)
"शिक्षित मुलींनी लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये राहू नये"; श्रद्धा हत्याकांडावर केंद्रीय मंत्र्याची वादग्रस्त प्रतिक्रिया
Shraddha Walkar Murder Case : शिक्षित मुलींनी लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये राहू नये, कारण... श्रद्धा हत्याकांडावर केंद्रीय मंत्र्याची वादग्रस्त प्रतिक्रिया चर्चेत. शिवसेना खासदार प्रियांका चतुर्वेदींचं सडेतोड उत्तर.
Shraddha Walkar Murder Case : दिल्लीत एका महिलेची तिच्या लिव्ह-इन पार्टनरनं निर्घृण हत्या केल्याप्रकरणी एका केंद्रीय मंत्र्यानं वादग्रस्त टिप्पणी केली आहे. या प्रकरणी सुशिक्षित मुलींनी पालकांना सोडून लिव्ह इन रिलेशनशिप निवडल्याचा ठपका केंद्रीय मंत्री कौशल किशोर यांनी ठेवला आहे. देश हादरवणाऱ्या श्रद्धा वालकर हत्याकांड (Shraddha Walkar Murder) प्रकरणावर प्रतिक्रिया देताना केंद्रीय मंत्र्यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.
केंद्रीय मंत्र्यांच्या या वादग्रस्त वक्तव्यानंतर देशभरातून संतापाची लाट उसळली आहे. शिवसेनेच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी तिखट शब्दांत टीका करत वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे केली आहे.
अशा गुन्ह्यांसाठी लिव्ह-इन-रिलेशनशिपच जबाबदार असल्याचं सांगत केंद्रीय मंत्री कौशल किशोर म्हणाले की, " अशा घटना हल्ली सर्व मुलींसोबत घडत आहेत, ज्या सुशिक्षित आहेत आणि ज्या स्वतःला स्पष्टवक्त्या (Frank) समजतात आणि भविष्यातील निर्णय स्वतः घेण्यास सक्षम असल्याचं समजतात.
श्रद्धा वालकर खून प्रकरणाचा संदर्भ देत त्यांनी "News18" ला प्रतिक्रिया दिली. "ते लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये का राहत आहेत? त्यांना तसे करायचे असेल, तर लिव्ह-इन-रिलेशनशिपसाठी योग्य नोंदणी करावी. जर आई-वडिल लिव्ह-इन-रिलेशनशिपसाठी तयार नसतील, तर कोर्ट मॅरेज करा आणि त्यानंतरच एकत्र राहा." पुढे बोलताना ते म्हणाले की, "मुलींनी विचार करायला हवा की, त्या असं का करताहेत?, सुशिक्षित मुलीच यासर्व प्रकारासाठी जबाबदार आहेत. कारण आई-वडिल दोघांनीही यासाठी नकार दिला होता. सुशिक्षित मुलींनी अशा रिलेशनशिपमध्ये येऊ नये."
केंद्रीय मंत्र्यांच्या या वक्तव्यावर शिवसेना खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या की, "मला तर याचं आश्चर्य वाटतंय की, ते असं नाही म्हणाले की, या देशात जन्म घेतल्यासाठीच मुली जबाबदार आहेत. निर्लज्ज, निर्दयी आणि क्रूर... सर्व समस्यांसाठी मुलींना दोष देण्याची मानसिकता सतत फोफावत आहे."
प्रियांका चतुर्वेदींनी आणखी एक ट्वीट केलं आहे. त्या ट्वीटमध्ये त्यांनी म्हटलंय की, "@PMOIndia खरंच महिला शक्तिबाबात ते जे बोलतात, ते खरंच त्यांना वाटत असेल, तर त्यांनी या केंद्रीय मंत्र्याला ताबडतोब बडतर्फ केलं पाहिजे. समाजातील अशा पितृसत्ताक मूर्खपणाचे ओझे आम्ही स्त्रिया सहन करतो. यापुढे उचलू शकत नाही."
दरम्यान, वादा झाल्यामुळे राग अनावर झालेल्या आफताब पूनावालानं त्याची लिव्ह-इन पार्टनर श्रद्धा वालकरची हत्या केली होती. यानंतर त्याने तिच्या शरीराचे अनेक तुकडे केले. त्यानंतर आफताबनं 300 लिटरचा फ्रीज विकत घेतला आणि 18 दिवसांत हे अवयव मेहरौलीजवळच्या जंगलात फेकून दिले.
महत्त्वाच्या इतर बातम्या :