New Army Chief: लेफ्टनंट जनरल 'मनोज पांडे' असतील देशाचे पुढील लष्करप्रमुख
Indian Army: लष्कराचे उपप्रमुख असलेले लेफ्टनंट जनरल मनोज पांडे हे देशाचे पुढील लष्करप्रमुख असतील.
Indian Army: लष्कराचे उपप्रमुख असलेले लेफ्टनंट जनरल मनोज पांडे हे देशाचे पुढील लष्करप्रमुख असतील. लष्करप्रमुख जनरल एमएम नरवणे या महिन्याच्या अखेरीस निवृत्त होत आहेत. त्यांच्या जागी आता मनोज पांडे यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. लेफ्टनंट जनरल मनोज पांडे हे पहिले अभियंता असतील जे भारतीय लष्कराची कमान सांभाळतील.
लेफ्टनंट जनरल मनोज पांडे हे आधी इस्टन कमांडचे कमांडिंग ऑफिसर होते. त्यांनी अंदमान आणि निकोबार कमांडचे कमांडर-इन-चीफ पदही भूषवले आहे. लेफ्टनंट जनरल मनोज पांडे यांनी परम विशिष्ट सेवा पदक, अति विशिष्ट सेवा पदक आणि विशिष्ट सेवा पदक मिळवलं आहे.
Lt Gen Manoj Pande becomes first engineer to be appointed as Army Chief pic.twitter.com/lHh5vWBW2G
— ANI (@ANI) April 18, 2022
लेफ्टनंट जनरल मनोज पांडे यांचा जन्म डॉ. सीजी पांडे आणि प्रेमा यांच्या घरी झाला, त्यांची आई ऑल इंडिया रेडिओच्या उद्घोषक होत्या. त्यांचे कुटुंब नागपूरचे आहे. शालेय शिक्षण झाल्यावर मनोज पांडे हे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत रुजू झाले. एनडीएनंतर, त्यांनी इंडियन मिलिटरी अकादमीमध्ये प्रवेश घेतला. 3 मे 1987 रोजी शासकीय दंत महाविद्यालयाच्या सुवर्णपदक विजेत्या अर्चना सालपेकर यांच्याशी त्यांचा विवाह झाला.
मनोज पांडे यांना डिसेंबर 1982 मध्ये बॉम्बे सॅपर्स, कॉर्प्स ऑफ इंजिनियर्सच्या रेजिमेंटमध्ये नियुक्त करण्यात आले. ते यूकेच्या कॅम्बर्लीच्या स्टाफ कॉलेजचाही भाग राहिले आहेत. अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर ते भारतात परतले आणि ईशान्य भारताच्या माउंटन ब्रिगेडचे ब्रिगेड मेजर म्हणून नियुक्त झाले. लेफ्टनंट कर्नल पदापर्यंत पोहोचल्यानंतर त्यांनी इथिओपिया आणि इरिट्रिया येथील संयुक्त राष्ट्र मिशनमध्ये मुख्य अभियंता म्हणून काम केले.
लेफ्टनंट जनरल मनोज पांडे यांनी जम्मू आणि काश्मीरमध्ये एलओसीवर 117 इंजिनियर रेजिमेंटचेही नेतृत्व केले आहे. ऑपरेशन पराक्रम दरम्यान ते रेजिमेंट कमांडर होते. यानंतर त्यांनी आर्मी वॉर कॉलेज, महू येथे प्रवेश घेतला आणि हायर कमांड कोर्स पूर्ण केला. त्यानंतर त्यांची मुख्यालय 8 माउंटन डिव्हिजनमध्ये कर्नल क्यू म्हणून नियुक्ती झाली.
मेजर जनरलच्या पदावर बढती मिळाल्यानंतर, पांडे यांनी पश्चिम लडाखमधील उच्च उंचीवरील ऑपरेशन्समध्ये सहभागी असलेल्या 8 व्या माउंटन डिव्हिजनचे नेतृत्व केले. त्यानंतर त्यांनी लष्कराच्या मुख्यालयातील मिलिटरी ऑपरेशन डायरेक्टरेटमध्ये अतिरिक्त महासंचालक (ADG) म्हणून काम केले. लेफ्टनंट जनरल पदावर बढती मिळाल्यानंतर त्यांनी दक्षिण कमांडच्या चीफ ऑफ स्टाफची जबाबदारी स्वीकारली.