Lata Mangeshkar: लतादीदींच्या स्मरणार्थ पोस्टाचं तिकीट प्रकाशित करणार; केंद्र सरकारची घोषणा
गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांच्या स्मरणार्थ पोस्टाचं तिकीट प्रकाशित करणार असल्याची घोषणा केंद्र सरकारने केली आहे.
नवी दिल्ली: भारतरत्न लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांच्या सन्मानार्थ पोस्टाचं तिकीट प्रकाशित करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सोमवारी ही माहिती दिली. या तिकीटासाठी काही डिझाईन तयार करण्यात आले होते, आता त्यावर काम सुरू असल्याचं ते म्हणाले. गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचं 6 फेब्रुवारीला निधन झालं होतं.
पोस्ट खात्याने दिलेल्या माहितीनुसार, महत्त्वाच्या व्यक्ती, घटना, निसर्गाच्या विविध छटा, दुर्मिळ फुलं आणि फळं, पर्यावरण, कृषी, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडी, खेळ या संबंधीत विशेष घटनांवर आधारित पोस्टल स्टॅम्प म्हणजे पोस्टाच्या तिकीटाचे प्रकाशन करण्यात येतं. पण हे मर्यादित स्वरुपात छापण्यात येतात. एका वर्षभरातील घटना किंवा कार्यक्रमांच्या तुलनेत व्यक्तींवर काढण्यात येणारे स्टॅम्प हे 10 टक्क्यांहून जास्त नसावेत असा पोस्ट खात्याचा नियम आहे.
Special commemorative stamp in memory of Lata Mangeshkar on anvil
— ANI Digital (@ani_digital) February 8, 2022
Read @ANI Story | https://t.co/gX0aINfNCt#LataMangeshkar #commemorativestamp pic.twitter.com/ZNiidhRCGb
गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर 28 दिवस रुग्णालयात रहावं लागलं होतं. त्यानंतर मल्टी ऑर्गन फेल्युअरनंतर त्यांचं निधन झालं.
भारतरत्न लता मंगेशकर या भारतातील सर्वात लोकप्रिय आणि आदरणीय गायिका होत्या, ज्यांचा सात दशकांचा कार्यकाळ यशाने भरलेला आहे. लता मंगेशकर यांच्या आवाजाने सात दशकांहून अधिक काळ संगीत विश्व गाजवले आहे. भारतातील 'स्वरसम्राज्ञी' लता मंगेशकर यांनी 20 भाषांमध्ये 30,000 गाणी गायली आहेत.
स्मारकावरून वाद सुरू
गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांचे रविवारी निधन झाले. निधनानंतर दिवसही लोटला नाही तोच त्यांच्या स्मारकावरुन राजकारणाला सुरुवात झाली आहे. दादरच्या ज्या शिवाजी पार्कमध्ये लतादीदींवर अंत्यसंस्कार करण्यात आले तिथं लता मंगेशकर यांचं स्मारक बनवावं अशी मागणी भाजपचे आमदार राम कदम, कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. तर राम कदमांच्या या मागणीला शिवसेना खासदार संजय राऊत आणि प्रियंका चतुर्वेदी यांनी प्रत्युत्तर दिलंय. तर शिवाजी पार्क हे शिवाजी पार्कच रहावं, त्याची स्मशानभूमी करु नये असे प्रकाश आंबेडकर म्हणाले. त्यामुळे लतादीदींच्या स्मारकावरून सध्या राज्यात राजकारण सुरू असल्याचे चित्र दिसत आहे.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha