(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Lalu Prasad Health Update: लालू प्रसाद यादव यांची प्रकृती चिंताजनक, रांचीच्या रिम्समधून दिल्ली AIIMS ला रेफर
लालू प्रसाद यांच्या प्रकृती बिघडल्याच्या बातमीनंतर त्यांची पत्नी राबडी देवी, मोठी मुलगी मीसा भारती, तेजस्वी यादव आणि तेज प्रताप यादव शुक्रवारी रांची रुग्णालयात दाखल झाले.लालू प्रसाद यादव यांना रांचीच्या रिम्स हॉस्पिटलमधून दिल्लीच्या एम्समध्ये रेफर करण्यात आले आहे.
नवी दिल्ली : चारा घोटाळ्यात तुरुंगवासाची शिक्षा भोगत असलेले आरजेडी प्रमुख लालू प्रसाद यादव यांची प्रकृती चिंताजनक आहे. प्रकृती बिघडल्यावर डॉक्टरांनी त्यांना रांचीच्या रिम्स हॉस्पिटलमधून दिल्लीच्या एम्समध्ये रेफर केले. रिम्सच्या अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली आहे. गुरुवारी सायंकाळी लालू प्रसाद यांची तब्येत अचानक बिघडली होती. रिम्सच्या पेइंग वॉर्डमध्ये दाखल झालेल्या लालू यादव यांना श्वास घेण्यात अडचण आल्यानंतर सर्व वरिष्ठ डॉक्टर रिम्समध्ये पोहोचले होते. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार छातीच्या संसर्गामुळे त्यांची तब्येत ढासळली.
लालू प्रसाद यांच्या प्रकृती बिघडल्याच्या बातमीनंतर त्यांची पत्नी राबडी देवी, मोठी मुलगी मीसा भारती, तेजस्वी यादव आणि तेज प्रताप यादव शुक्रवारी रांची रुग्णालयात दाखल झाले. तेजस्वी यादव म्हणाले होते की ते शनिवारी झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्याशी आपल्या वडिलांच्या स्थितीसंदर्भात चर्चा करतील.
लालूंचे मूळ गाव फुलवारीयात प्रार्थना
दुसरीकडे लालू प्रसाद यांच्या प्रकृती अस्वस्थ असल्याची माहिती मिळताच त्यांच्या कुटुंबातील सदस्य आणि आरजेडी कार्यकर्त्यांनी शुक्रवारी त्यांच्या मूळ गावी गोपाळगंजमधील फुलवारीयामध्ये पूजा-पाठ केले. फुलवारीयाच्या पंच मंदिरामध्ये, वैदिक जप करून पुरोहित दयाशंकर पांडे आणि हिरामण दास यांनी लालू यांची प्रकृती सुधारण्यासाठी खास पूजा अर्चना केली. यासह समर्थकांनी हवनही केले.
लालूंचा पुतण्या नितीशकुमार यादव, नातू लवकुश यादव, अभिषेक कुमार अभय, परमहंस यादव, विनीत यादव, राहुल कुमार, नितेश पांडे यांच्यासह आरजेडीचे शेकडो कार्यकर्ते यात सहभागी झाले होते. लालू यांचे पुतणे नितीश यादव म्हणाले की, आम्हाला आई दुर्गावर पूर्ण विश्वास आहे की आईच्या आशीर्वादाने ते लवकरच बरे होतील.