Lalu Prasad's Health : लालू प्रसाद यादव यांची प्रकृती गंभीर, किडनी फक्त 20 टक्के कार्यरत, ब्लड प्रेशरही वाढला
Lalu Prasad's Health : राष्ट्रीय जनता दलाचे (RJD) अध्यक्ष आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) यांना सोमवारी चारा घोटाळाप्रकरणी पाच वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
Lalu Prasad's Health : राष्ट्रीय जनता दलाचे (RJD) अध्यक्ष आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) यांना सोमवारी चारा घोटाळाप्रकरणी पाच वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्याशिवाय त्यांना 60 लाखांचाही दंड ठोठावण्यात आला आहे. न्यायालयाच्या निकालानंतर लालू प्रसाद यादव यांची प्रकृती खालावली आहे. राजेंद्र इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (रिम्स) येथे लालू प्रसाद यादव यांच्यावर उपचार सुरु आहेत. रांची येथील रिम्स रुग्णालयात लालू प्रसाद यादव यांच्यावर उपचार सुरु आहे. लालू प्रसाद यादव यांच्यावर सात डॉक्टरांचे पथक उपचार करत आहेत. रिम्समधील डॉक्टर विद्यापती यांनी सोमवारी लालू प्रसाद यादव यांच्या प्रकृतीविषयक माहिती दिली. यामध्ये त्यांनी लालू प्रसाद यादव यांची प्रकृती गंभीर पण स्थिर असल्याचे सांगितले.
विद्यापती म्हणाले की, लालू प्रसाद यादव यांचा ब्लड प्रेशर आणि ब्लड शुगरमध्ये चढ-उतार सुरु आहे. सोमवारी सकाळी लालू प्रसाद यादव यांच्या रक्तातील साखरेचं प्रमाण 70 मिलीग्राम /डीएल इतकी होती. पण दुपारी त्यांच्या रक्तातील साखरेचं प्रमाण वाढून 240 मिलीग्राम /डीएलपर्यंत पोहचले. त्यांची किडनी 20 टक्केंपेक्षा कमी काम करत आहे. त्यांच्या प्रकृतीवर डॉक्टरांचं पूर्णपणे लक्ष आहे.
लालू प्रसाद यादव यांना डायबिटीज, ब्लड प्रेशर, हृदयरोग आणि किडनीसह जवळपास डझनभर आजार आहेत. लालू प्रसाद यादव यांचा उपचार करणारे डॉक्टर उमेश प्रसाद यांनी डिसेंबर 2021 मध्ये त्यांची किडनी 25 टक्के काम करत असल्याचे सांगितले होते. लालू प्रसाद यादव यांना कधीही डायलिसिसची गरज भासू शकते. आशापरिस्थितीत लालू प्रसाद यादव यांना तुरुंगातील शिक्षा भोगणे कठीण होऊ शकते, असे म्हटले जातेय.
लालू प्रसाद यादव यांना पाच वर्षांची शिक्षा, 60 लाखांचा दंड -
सोमवारी रांचीतील विशेष सीबीआय कोर्टाने दोरांडा चारा घोटाळा (Fodder Scam) प्रकरणी लालू प्रसाद यादव यांना शिक्षा सुनावली आहे. चारा घोटाळाप्रकरणी लालू यादव यांना पाच वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्याशिवाय त्यांना 60 लाखांचाही दंड ठोठावण्यात आला आहे. 15 फेब्रुवारी रोजी न्यायालयानं लालू प्रसाद यादव यांना या प्रकरणी दोषी ठरवण्यात आलं होतं. या पाचव्या प्रकरणापूर्वी लालू यादव यांना इतर चार प्रकरणांमध्ये 14 वर्षांची शिक्षा झाली आहे.
दोरांडा चारा घोटाळा प्रकरणी लालू प्रसाद यादव दोषी -
139 कोटी रुपयांच्या दोरांडा चारा घोटाळा प्रकरणी 15 फेब्रुवारी रोजी लालू प्रसाद यादव यांना दोषी ठरवण्यात आलं होतं. लालू प्रसाद यादव यांच्यासह 38 दोषींच्या शिक्षेवर आज व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे शिक्षा सुनावण्यात येणार आहे. यापूर्वी 15 फेब्रुवारी रोजी विशेष सीबीआय न्यायालयाचे न्यायाधीश एस. के. शशि यांनी 41 जणांना दोषी ठरवून 21 फेब्रुवारी रोजी शिक्षेवरील सुनावणी निश्चित केली होती. आज यापैकी 38 जणांना शिक्षा होणार आहे. अन्य तीन दोषी 15 फेब्रुवारीला न्यायालयात हजर झाले नाहीत. त्याच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आलं आहे. ज्या 38 जणांना आज शिक्षा सुनावण्यात येणार आहे, त्यापैकी 35 जण बिरसा मुंडा तुरुंगात कैद आहेत. तर लालू प्रसाद यादव, डॉ. के.एम. प्रसाद आणि यशवंत सहाय यांना प्रकृतीच्या कारणास्तव राजेंद्र इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (RIMS) मध्ये दाखल करण्यात आलं आहे.