Lakhimpur Kheri: शेतकऱ्यांना गाडीखाली चिरडल्याप्रकरणी केंद्रीय मंत्र्याच्या मुलाविरोधात आरोप निश्चित
Lakhimpur Violence Case: गेल्या वर्षी 3 ऑक्टोबर रोजी उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी या ठिकाणी आशिष मिश्रा याने शेतकऱ्यांवर गाडी घालून त्यांना चिरडलं होतं. त्यामध्ये आठ जणांचा मृत्यू झाला होता.
लखनौ: उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरीतील तिकोनिया या ठिकाणी झालेल्या हिंसाचाराच्या प्रकरणी केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा टेनी यांचा मुलगा आशिष मिश्रा याच्यावर आरोप निश्चित करण्यात आला आहे. आशिष मिश्रा यांच्यासोबत 14 जणांवर हा आरोप निश्चित करण्यात आला आहे. देशात शेतकरी आंदोलन सुरू असताना उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी या ठिकाणी 3 ऑक्टोबर 2021 रोजी अजय मिश्रा यांच्या गाडीने शेतकऱ्यांना चिरडले होतं.
केंद्रीय मंत्र्यांचा मुलगा आशिष मिश्रा यांच्यासोबत या प्रकरणी अंकित दास, नंदन सिंह बिष्ट, लतीफ काले, सत्यम उर्फ सत्य प्रकाश त्रिपाठी, शेखर भारती, सुमित जायसवाल, आशीष पांडे, लवकुश राणा, शिशुपाल, उल्लास कुमार उर्फ मोहित त्रिवेदी, रिंकू राणा, वीरेंद्र शुक्ला आणि धर्मेंद्र बंजारा यांच्यावर हा आरोप निश्चित करण्यात आला आहे.
या प्रकरणी आरोपींवर भारतीय दंड संहिता कलम 147, 148, 149, 302, 307, 326, 427 आणि 120 (ख) तसेच मोटर वाहन अधिनियम कलम 177 अन्वये आरोप निश्चिती करण्यात आली आहे.
केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा 'टेनी' यांचा मुलगा आशिष मिश्रा आणि त्याच्या डझनभर साथीदारांवर चार शेतकऱ्यांना जीपने चिरडून त्यांच्यावर गोळीबार केल्याचा गंभीर आरोप आहे. शेतकऱ्यांनी दिलेल्या तक्रारीवरून आशिष मिश्रा आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध खून, खुनाचा प्रयत्न अशा अनेक गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटीची स्थापना करण्यात आली होती. एसआयटीने 5000 पानी आरोपपत्र दाखल केले आहे. ही घटना सुनियोजित कट असल्याचे एसआयटीने म्हटलं आहे.
लखीमपुरात काय झालं होतं?
गेल्या वर्षी देशात केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू होतं. दरम्यान, केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा हे एका कार्यक्रमानिमित्ताने लखीमपूर खेरी या ठिकाणी येणार होते. पण त्याआधीच कृषी कायद्याच्या विरोधात शेतकऱ्यांनी आंदोलन सुरु केलं. ज्यावेळी केंद्रीय मंत्र्यांचा गाडीचा ताफा या ठिकाणी आला त्यावेळी मंत्र्यांचा मुलगा आशिष मिश्रा याने आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना कारने चिरडण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणात नऊ शेतकऱ्यांचा मृत्यू झाला होता.
या प्रकरणी नंतर आशिष मिश्रा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. आशिष मिश्रा यांना फेब्रुवारी 2022 मध्ये अलाहाबाद उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला होता, त्याबाबतही अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. त्यानंतर 18 एप्रिल रोजी सर्वोच्च न्यायालयाने आशिष मिश्रा यांचा जामीन रद्द केला होता.