(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Kolkata Fire: कोलकाताच्या स्ट्रॅंड रोड परिसरातील इमारतीला भीषण आग, 9 जणांचा मृत्यू
न्यू कोयलाघाट या इमारतीला आग लागली आहे. या इमारतीमध्ये पूर्व रेल्वे आणि दक्षिण पूर्व रेल्वेचे झोनल कार्यालय असून तळमजल्यावर रेल्वे तिकिट बुकिंगचे देखील कार्यालय आहे.
कोलकाता : कोलकाताच्या स्ट्रँड रोड परिसरातील एका इमारतीच्या 13 व्या मजल्यावर भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत 9 जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये 4 अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या इमारतीत रेल्वेच कार्यालय देखील असल्याचं कळतय. 10 अग्निशमन दलाच्या गाड्यांच्या मदतीनं या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे.
दरम्यान पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली आहे. मृतांच्या नातेवाईकांना राज्य सरकारकडून 10 लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. घटनेच्या तपासासाठी 4 रेल्वे उच्चस्तरीय अधिकाऱ्यांची समिती स्थापन करण्यात आल्याची माहिती रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी दिली आहे.
कोलकाता पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आग 6 वाजून 10 मिनीटानी लागली. मिळालेल्या माहितीनुसार 5 अग्निशमन दलाचे कर्मचारी इमारतीच्या लिफ्टमध्ये अडकले होते.
पूर्व रेल्वेचे प्रवक्ता कमल देव दास म्हणाले, न्यू कोयलाघाट या इमारतीला आग लागली आहे. या इमारतीमध्ये पूर्व रेल्वे आणि दक्षिण पूर्व रेल्वेचे झोनल कार्यालय असून तळमजल्यावर रेल्वे तिकिट बुकिंगचे देखील कार्यालय आहे.