GPS Based Toll Collection : टोलच्या रांगेतून वाहनांची सुटका करण्यासाठी केंद्र सरकारने फास्टॅग लागू केला होता. आता फास्टॅगही संपुष्टात येणार असल्याची शक्यता असून जीपीएस आधारे टोल वसुली होणार आहे. सॅटेलाइट नेव्हिगेशन टोलिंग सिस्टिम ही नवी यंत्रणा लागू करण्यासाठी केंद्र सरकारनं चाचण्या सुरु केल्या आहेत. त्यात देशभरातील 1 लाखांहून अधिक वाहनांचा समावेश आहे. जीपीएस आधारीत टोल वसुली कशी होणार, कोणत्या देशात हा प्रयोग झालाय, जाणून घेऊयात
जीपीएस आधारीत टोल वसुली म्हणजे काय?
सध्या बहुतांशी नव्या वाहनांमध्ये जीपीएस यंत्रणा असते. संबंधित वाहनाने प्रवास केलेल्या मार्गावरून टोल वसूल केला जाणार. टोलची रक्कम ही वाहनधारकाच्या बँक खात्यातून अथवा ई-वॉलेटमधून कापण्यात येईल. ज्या वाहनांमध्ये जीपीएस यंत्रणा नसणार, अशा वाहनांसाठी जीपीएस लावण्यासाठी सरकार निर्णय घेणार असल्याचे याआधी परिवहन, रस्ते महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले होते.
कोणत्या देशात GNSSचा वापर?
Global Navigation Satellite System (GNSS) चा वापर करून काही देशांमध्ये टोल आकारणी केली जाते. युरोपमधील काही देशांमध्ये 3.5 टन वजनापेक्षा अधिक वाहनांकडून टोल आकारणी केली जाते. यामध्ये जर्मनी, स्लोव्हाकिया, हंगेरी, बेल्जियम, रशिया, चेक प्रजासत्ताक, बल्गेरिया आदी देशांमध्ये ही GNSS चा वापर करून टोल आकारला जातो. पोलंडनेदेखील मागील वर्षी GNSS आधारीत टोल वसूल करण्याचा निर्णय घेतला.
जीपीएस आधारीत टोलचा काय फायदा?
जीपीएस आधारीत टोल वसुली सुरू झाल्यास टोल नाक्यावर होणारी वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर कमी होईल असा दावा करण्यात येतो. टोल नाकेही हटवण्यात येतील. थेट टोल वसुली होणार असल्याने वाहने वाहतूक कोंडीत अडकणार नाहीत.
वेळ आणि इंधनाची बचत
जीपीएस तंत्रज्ञानाच्या मदतीने देशभरातील टोलनाक्यांवरील कोट्यवधी प्रवाशांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे. वाहतूक कोंडी न झाल्याने इंधनाची बचत होईल. त्याशिवाय प्रवासाला कमी वेळ लागेल.
FAStag नेमकं काय आहे? त्याने काय सुविधा मिळते?
फास्टटॅग म्हणजे एक डिजिटल स्टिकर आहे. हे स्टिकर गाडीच्या समोरच्या काचेवर लावलं जातं. रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन टेक्नॉलॉजी म्हणजे RFID तंत्रज्ञानावर हे स्टिकर काम करतं. या टेक्नॉलीजीच्या मदतीने टोल नाक्यांवर लागलेले कॅमेरे स्टिकरवरील बारकोड स्कॅन करतात आणि FASTag खात्यातून टोलची रक्कम वजा होते. रोख पैशांचे व्यवहार न करता टोल भरण्यासाठी या फास्टॅगचा वापर होतो. टोलचे पैसे देण्यासाठी वाहनांना टोलनाक्यावर थांबण्याचीही गरज लागत नाही. त्यामुळे वाहनचालकांना वेळ वाचतो, इंधनाची बचत होते.