Goa CM Swearing in Ceremony : आजचा दिवस गोव्याच्या दृष्टीनं महत्त्वाचा आहे. कारण आज प्रमोद सावंत (Pramod Sawant) हे गोव्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. ते सलग दुसऱ्यांदा गोव्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेत आहेत. आजचा शपथविधी सोहळा मोठ्या दिमाखात पार पडणार आहे. दरम्यान, प्रमोद सावंत यांच्यासोबत अन्य 8 आमदारांना मंत्रीपदाची शपथ दिली जाणार आहे. या आठ जणांच्या नावांची अंतिम यादी ठरली आहे. या आठ जणांमध्ये नेमकी कोण कोणाला संधी मिळाली ते पाहुयात...
 
या आठ जणांना सावंतांच्या मंत्रीमंडळात संधी


1) विश्वजीत राणे
2) माविन गुदिन्हो
3) रवि नाईक
4) रोहन खंवटे
5) गोविंद गावडे
6) बाबूश मोन्सेरात
7) सुभाष शिरोडकर 
8) नीलेश काब्राल




वरील आठ आमदारांना प्रमोद सावंत यांच्या मंत्रीमंडळात स्थान देण्यात येणार आहे. प्रमोद सावंत यांच्यासोबत हे आठ जण आज शपथ घेणार आहेत. एकूण 9 जणांचा शपथविधी सोहळा आज संपन्न होणार आहे. महत्त्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षेसाठी गोवा पोलीस, राज्य राखीव दल, एसपीजी, पंतप्रधानांची खास सुरक्षा व्यवस्था असे सुमारे 800 जवान तैनात करण्यात आले आहेत. अतिमहत्त्वाच्या व्यक्ती नौदलाच्या खास हेलिकॉप्टरने गोवा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून ताळगावच्या पठारावर उभारलेल्या खास हेलिपॅडवर हेलिकॉप्टरने दाखल होतील. चार राज्यांतील मुख्यमंत्री, तसेच देवेंद्र फडणवीस, सी.टी. रवी हे रविवारीच गोव्यात दाखल झाले आहेत.


या सोहळ्यासाठी राज्यातील दहा हजार नागरिक उपस्थित राहतील, असे अपेक्षीत धरुन या लोकांच्या जेवणाची व्यवस्था डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमशेजारी करण्यात आली आहे. एका स्टॉलवर पाचशे व्यक्ती असे गृहीत धरुन 20 स्टॉल उभारण्यात आले आहेत. 


दरम्यान, या शपथविधी सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत. मोदी हे या भव्य दिव्य सोहळ्याचे आकर्षण असणार आहेत. त्यांच्याबरोबरच 10 भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री देखील या शपथविधी सोहळ्यासाठी उपस्थित राहणार आहेत. गोव्यातील श्यामा प्रसाद मुखर्जी स्टेडिअममध्ये प्रमोद सावंत सरकारचा शपथविधी सोहळा संपन्न होणार आहे. 


या सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह देशाचे गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान, हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर,आसामचे मुख्यमंत्री हेमंत शर्मा, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेश पटेल,कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर धामी आणि मणिपूरचे मुख्यमंत्री वीरेंद्र सिंह देखील उपस्थित राहणार आहेत.  


गोव्यामध्ये विधानसभेच्या एकूण 40 जागा आहेत. यामध्ये 20 जागा भाजपने जिंकल्या आहेत. तसेच भाजपने गोव्यातील सर्वात जुना प्रादेशिक पक्ष असलेल्या महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाच्या ( MGP) 2 आमदारांनी आणि तीन अपक्ष आमदारांना पाठिंब्याची पत्रे राज्यपाल पीएस श्रीधरन पिल्लई यांना सुपूर्द केली आहेत. राज्यपालांनी सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपला पुढील सरकार स्थापनेसाठी आमंत्रित केले होते.