नवी दिल्ली : महाराष्ट्रासह देशभरातील राज्यसभेच्या ५७ जागांसाठी (Rajya Sabha Election 2022) 10 जूनला मतदान होत आहे. या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षाला आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे. जुन ते ऑगस्टमध्ये अनेक राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ समाप्त होत आहे. त्यामुळे या जागांसाठी काही नवे चेहरे चर्चेत आहेत, तर काहींनी पुन्हा एकदा दावेदारी ठोकली आहे. या निवडणुकीसाठी कोणती समीकरण जुळून येत आहेत आणि ही निवडणूक प्रक्रिया कशी असते आणि सदस्य निवडीची प्रक्रिया कशी असते हे आपण या बातमीमध्ये समजून घेणार आहोत. 


राज्यांना कोणत्या आधारावर जागा प्राप्त होतात ?


राज्यसभेत एकूण सदस्य संख्या २५० आहे. तथापि, यामधील १२ सदस्य हे राष्ट्रपती नियुक्त असतात. उर्वरित २३८ सदस्य राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे प्रतिनिधीत्व करतात. यासाठी वेगवेगळ्या राज्यांमध्ये जागांचे वाटप केले जाते. राज्यातील लोकसंख्येच्या आधारावर कोणत्या राज्याला किती जागा मिळणार हे निश्चित केले जाते. अर्थातच, ज्या राज्याची लोकसंख्या सर्वाधिक आहे त्या राज्याला अधिक जागा मिळतात. उत्तर प्रदेश सर्वात मोठे राज्य असल्याने त्या राज्याला सर्वाधिक ३१ जागा मिळतात.   



सदस्य कोणत्या पद्धतीने निवडले जातात ?


राज्यसभा सदस्याची निवड करताना एक प्रतिनिधी एका वेळेला एकाच उमेदवाराला मतदान करू शकतो. तथापि, अपवादात्मक परिस्थितीमध्ये मत ट्रान्सफर सुद्धा होऊ शकते. समजा, ज्या उमेदवाराला मत देण्यात आलं आहे तो उमेदवार विजयी झाला असल्यास ते मत ट्रान्सफर केलं जातं. आणि दुसऱ्या उमेदवाराला इतकी कमी मते मिळाली आहेत त्यामध्ये तो विजयी होऊ शकत नाही अशावेळी मत ट्रान्सफर होऊ शकतं. त्यासाठीच प्राथमिकता ठरवून उमेदवारांना 1 पासून 4 पर्यंत नंबर दिले जातात. 


अशी आहे मतदान प्रक्रिया 


पहिल्यांदा प्राथमिकता असलेल्या मतांनाही एक नंबर निश्चित केला जातो. म्हणजेच याचा अर्थ असा की, एका उमेदवाराला विजयासाठी किती आमदारांच्या मतांची आवश्यकता आहे हे राज्यसभेच्या किती जागांवर निवडणूक होत आहे यावर निश्चित केले जाते. यासाठी जो फॉर्म्युला असतो तो असा असतो की राज्यातील एकूण आमदारांच्या संख्येला राज्यसभेच्या होणाऱ्या निवडणुकीच्या आकड्याला १ जोडून भागले जाते. यामध्ये पहिल्या नंबरने जो आकडा येतो त्याला तेवढी मते मिळवावी लागतात. उत्तर प्रदेशात एकूण आमदारांची संख्या ४०३ आहे. त्या ठिकाणी ११ जागेवर निवडणूक होत आहे, तर फॉर्म्युला असा असेल 403/ [11+1] +1 = 34 म्हणजेच पहिल्या पसंतीची ३४ मते मिळवावी लागतील.  



उत्तर प्रदेशमध्येच एनडीएला सर्वाधिक जागा


उत्तर प्रदेशात सत्तेत असलेल्या भाजपकडे सर्वाधिक आमदार असल्याने अर्थातच सर्वाधिक जागा त्यांच्या पदरात पडतील. त्यामुळे राज्यातील ११ पैकी ८ जागांवर त्यांचा निश्चित विजय मानला जात आहे. दुसरीकडे समाजवादी आघाडी तीन जागांवर विजय मिळवू शकते, तर दुसरीकडे काँग्रेस बसपाची झोळी रिकामीच राहण्याची चिन्हे आहेत. कारण नुकत्याच झालेल्या निवडणुकीत काँग्रेसला दोन, तर बसपाला केवळ १ जागा होती.  


उत्तर प्रदेशात भाजपकडून राज्यसभा उमेदवारांमध्ये जफर इस्लाम, शिव प्रताप शुक्ला, संजय सेठ, सुरेंद्र नागर आणि जयप्रकाश निषाद यांच्यासारख्या नेत्यांचा समावेश आहे. पक्षाकडून लवकरच नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे. समाजवादी पक्षाने कपिल सिब्बल आणि माजी राज्यसभा खासदार जावेद अली आणि आरएलडी प्रमुख जयंत चौधरी यांना उमेदवारी दिली आहे. 


महाराष्ट्रात कोणाला फायदा होणार ?


महाराष्ट्रात राज्यसभेच्या 6 जागांसाठी 10 जूनला मतदान होत आहे. राज्यात एकुण 288 विधानसभा सदस्य आहेत. अशा परिस्थितीत फॉर्म्युलानुसार 288/6+1+1 = 42 म्हणजेच एक राज्यसभा उमेदवाराला 42 मते मिळवावी लागतील. भाजपच्या गोटातून दोन उमेदवार विजयी होतील एवढे संख्याबळ आहे. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडे आपापल्या एक-एक उमेदवाराला विजयी करू शकतात. मात्र, आघाडी असल्याने ते आणखी एक उमेदवार पाठवू शकतात. त्यामुळे शिवसेनेकडून दुसरा उमेदवार रिंगणात आहे. राष्ट्रवादीने त्याला ग्रीन सिग्नल दिला आहे. 


बिहारमधील काय आहे स्थिती ?


बिहारमध्ये पाच जागांसाठी मतदान होत आहे. पक्षांकडून उमेदवारांची चाचपणी सुरु झाली आहे. आरजेडीकडून मीसा भारती आणि डॉ. फैय्याज अहमद यांना संधी देण्यात आली आहे. सदस्य संख्या कमी असल्याने नितीशकुमार यावेळी एका जागेवर समाधान मानण्याची शक्यता आहे.  त्यामुळे याचा फायदा आरजेडीला होण्याची शक्यता आहे. जेडीयूकडून केंद्रीय मंत्री आरसीपी सिंह प्रमुख दावेदार आहेत. त्यांचा कार्यकाल संपत आला आहे. दुसरीकडे भाजपची नावे दिल्लीत निश्चित होतील. एकंदरीत पाहिल्यास आरजेडी आणि भाजपला प्रत्येकी दोन, तर जेडीयूला एक जागा मिळेल अशी चिन्हे आहेत.


काँग्रेसला किती जागा मिळतील ? 


आकड्यांवरून अंदाज बांधल्यास काँग्रेसला या निवडणुकीत ११ जागा मिळण्याची शक्यता आहे. असं झाल्यास वरिष्ठ सभागृहात त्यांची सदस्य संख्या ३३ होईल जी सध्या २९ आहे. गुलाम नबी आझाद, आनंद शर्मा, मुकूल वासनिक, रणदीप सुरजेवाला, अजय माकन आणि राजीव शुक्ला यांना राज्यसभेची आशा आहे. पी. चिदंबरम (महाराष्ट्र), रमेश (कर्नाटक), अंबिका सोनी (पंजाब), विवेक तन्खा (मध्य प्रदेश), प्रदीप टम्टा (उत्तराखंड), कपिल सिब्बल (उत्तर प्रदेश) आणि छाया वर्मा (छत्तीसगड) यांचा कार्यकाळ समाप्त होत आहे. 


काँग्रेसला या निवडणुकीत राजस्थानमधून तीन, छत्तीसगडमध्ये दोन, महाराष्ट्र,  कर्नाटक हरियाणा आणि मध्य प्रदेशात एक जागा मिळू शकते. तमिळनाडू सत्तारूढ द्रमुक आणि झारखंडमध्ये झामुयोने एक-एक जागा दिल्यास काँग्रेसला दोन जागांची लाॅटरी लागू शकते.  


हे ही वाचलं का ?