Monsoon News : गेल्या काही दिवसांपासून वाढत्या उकाड्यामुळे हैराण झालेल्या नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. पुढील दोन ते तीन दिवसांमध्ये मान्सून (Monsoon ) केरळमध्ये दाखल होणार आहे. भारतीय हवामान विभागाने याबाबत माहिती दिली आहे. 


काल मान्सून श्रीलंकेत दाखल झाला असून केरळमध्ये आज मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली आहे.  केरळमध्ये अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला आहे. केरळमध्ये 50 टक्क्यांहून अधिक स्टेशन्सवर पावसाची नोंद झाली आहे.  


भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार 1 जूनच्या आधी मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. जूनच्या सुरुवातीला मान्सूनची वाटचाल धीम्या गतीने राहणार आहे. परंतु, जून-जुलै महिन्यात चांगल्या पावसाचा अंदाज आहे. वेळेच्या सहा दिवस आधीच मान्सून अंदमानच्या समुद्रात दाखल झाला आहे. दरम्यान, आज संध्याकाळपर्यंत केरळमध्ये मान्सून कधी दाखल होईल याची तारीख जाहीर होण्याची शक्यता आहे.  






विदर्भात अनेक ठिकाणी होणार मान्सूनपूर्व पाऊस
विदर्भात देखील उष्णतेच्या लाटेमुळे नागरिकांना प्रचंड उकाड्याचा सामना करावा लागला आहे. परंतु, विदर्भात देखील अनेक ठिकाणी मान्सूनपूर्व पाऊस बरसणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. 


दरम्यान, गेले काही दिवस अरबी समुद्रात रेंगाळलेला मान्सून पुढे सरकला आहे. मान्सूनच्या पुढच्या वाटचालीसाठी अनुकूल स्थिती निर्माण झाल्यामुळे अरबी समुद्राचा आग्नेय आणि नैऋत्य भाग मान्सूननं जवळपास व्यापला आहे. मालदीव आणि कोरोरिन क्षेत्रात मान्सून सक्रीय झाला आहे. तसेच दक्षिण आणि इशान्य बंगालच्या उपसागराच्या काही भागातही मान्सून सक्रिय होण्याची शक्यता आहे. मान्सूनचा हा प्रवास असाच सुरु राहिला तर पुढील आठवडाभरात मान्सून राज्याच्या वेशीवर पोहोचेल अशी अपेक्षा देखील व्यक्त केली जात आहे.