MHA Transferred Sanjeev Khirwar : दिल्लीच्या त्यागराज स्टेडियममध्ये (Thyagraj Stadium) खेळाडूंचा सराव थांबवून श्नानासोबत फिरल्यामुळे वादात सापडलेले आयएएस अधिकारी संजीव खिरवार (Sanjeev Khirwar) यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. केंद्रीय गृह मंत्रालयानं (MHA) त्यांची दिल्लीहून लडाखमध्ये बदली केली आहे. एवढंच नाही तर मंत्रालयानं त्यांची पत्नी रिंकू दुग्गा (Rinku Dugga)  यांची बदली करून त्यांना अरुणाचल प्रदेशात पाठवलं आहे. केंद्रीय गृह मंत्रालयानं या संदर्भात दिल्लीच्या मुख्य सचिवांकडून अहवाल मागवला होता आणि अहवाल आल्यानंतर गृह मंत्रालयानं हा निर्णय घेतला आहे. 


त्यागराज स्टेडियममध्ये सराव करणाऱ्या खेळाडूंकडून सतत तक्रारी येत होत्या की, त्यांना संध्याकाळी साडेसहा वाजेपर्यंत सराव संपवण्यास सांगितलं जातं, स्टेडियमच्या वेळेमुळे नाहीतर त्यानंतर दिल्ली सरकारचे प्रधान सचिव (महसूल) संजीव खिरवार आपल्या श्वानाला स्टेडियममध्ये फिरवण्यासाठी घेऊन येतात. म्हणून खेळाडूंना सराव थांबवण्यास सांगितलं जातं. 



काय आहे प्रकरण? 


समोर आलेल्या माहितीनुसार दिल्लीचे प्रमुख सचिव आयएएस संजीव खिरवार हे 7.30 च्या सुमारास त्यांच्या श्वानासह फिरण्याकरता दिल्लीच्या त्यागराज स्टेडियममध्ये येत असतात. त्यामुळे 7 वाजताच त्याठिकाणी सराव करणाऱ्या खेळाडूंना मैदानाबाहेर काढलं जातं. दरम्यान या साऱ्याबाबत खेळाडू आणि प्रशिक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे. एका कोचने इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या माहितीत सांगितलं की, 'आधी याठिकाणी 8, 8.30 पर्यंत अॅथलिट्स सराव करत असत, पण आता 6.30 वाजल्यापासूनच तेथील गार्ड्स शिट्टी वाजवण्यास सुरुवात करतात आणि मैदान मोकळं केलं जातं. त्यामुळे आता त्यांना 3 किमीवरील जवाहरनगर स्टेडियममध्ये जावं लागत आहे.' विशेष म्हणजे संजीव यांचा कुत्रा मैदानात रेसिंग ट्रॅक, फुटबॉलचं मैदान साऱ्यावर फिरत असल्याचंही निदर्शनास आलं आहे.


प्रकाराबाबत IAS म्हणतात... 


या साऱ्या प्रकरणाबाबत आयएएस संजीव खिरवार यांच्याशी संपर्क केला असता हा साफ चूकीचा आरोप असल्याचं ते म्हणाले आहेत. संजीव यांनी 'मी कधी कधी माझ्या श्वानाला फिरवण्यासाठी मैदानावर घेऊन जातो. पण त्यानं खेळाडूंना कोणता त्रास होणार नाही, याचीही काळजी घेतो.' असं म्हटलं आहे.


दरम्यान, हा प्रकार समोर येताच, दिल्ली सरकारनंही तातडीनं कारवाई केली. दिल्ली सरकारनं सांगितलं की, आतापासून दिल्लीतील सर्व स्टेडियम रात्री 10 वाजेपर्यंत सुरु राहतील. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी एका ट्वीटद्वारे ही माहिती दिली. त्यांनी लिहिलं की, स्टेडियम लवकर बंद केल्यामुळे खेळाडूंना मोठ्या त्रासाला सामोरे जावं लागत आहे. त्यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सर्व स्टेडियम 10 वाजता बंद करण्याचे आदेश दिले आहे. जेणेकरून खेळाडूंना सराव करताना कोणतीही अडचण येणार नाही. त्यागराज स्टेडियम 2010 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी बांधण्यात आलं होतं.