केरळ महापूर : मृतांची संख्या 357 वर
केरळात पुराच्या पार्श्वभूमीवर राज्यातील 14 जिल्ह्यांमध्ये रेड अलर्टचा इशारा मागे घेण्यात आला आहे. आत्तापर्यंत 357 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 2 लाखांहून अधिक लोक बेघर झाले आहेत.
![केरळ महापूर : मृतांची संख्या 357 वर kerala floods updates death toll reaches 357 केरळ महापूर : मृतांची संख्या 357 वर](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/08/19145132/keral.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
तिरुअनंतपुरम : केरळमध्ये पावसाचा जोर कमी झाला आहे, त्यामुळे काही भागात पुराचं पाणी हळूहळू ओसरू लागलं आहे. मात्र अनेक ठिकाणी परस्थिती जैसे थे आहे. केरळ गेल्या काही दिवसांपासून पुराच्या पाण्यानं वेढलं आहे. प्रशासनानं पुराच्या पार्श्वभूमीवर राज्यातील 14 जिल्ह्यांमध्ये रेड अलर्टचा इशारा दिला होता, तो मागे घेण्यात आला आहे.
केरळमधील पुरात आतापर्यंत 357 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 2 लाखांहून अधिक लोक बेघर झाले आहेत. मोठ-मोठी झाडं, टीव्ही, फ्रिज अशा अनेक गोष्टी रस्त्यावर, पुलावर वाहून आल्या आहेत.
पुरासोबतच केरळात इतर समस्या डोकं वर काढू लागल्या आहेत. अनेक ठिकाणी पेट्रोल आणि डिझेलसाठी वाहनांच्या रांगा लागत आहेत. पदककुडी गावात महामार्गालागत सुरु असलेल्या एकमेव पेट्रोल पंपावर भल्या मोठ्या रांगा लागल्या आहेत. अनेक वाहनं बंद अवस्थेत असल्यानं शेकडो प्रवासी अद्यापही अडकून पडले आहेत.
पेट्रोलसाठी शेकडो वाहनांच्या रांगा पेट्रोलपंपावर लागल्या आहे. त्यामुळे एकूण परिस्थिती पाहता पोलीस बंदोबस्तात पेट्रोलचं वाटप याठिकाणी सुरू आहे.
आजवरचं सर्वात मोठं बचावकार्य
एडीआरएफची टीमतर्फे युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे. एनडीआरएफने विविध भागातून जवळपास 10 हजार नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवलं आहे. पूरग्रस्थांच्या मदतीसाठी वायुसेनाही दिवसरात्र तैनात आहे. गरजूंपर्यंत खाण्यापिण्याच्या वस्तूही पुरवण्याचं काम वायुसेनेकडून केलं जात आहे. एनडीआरएफच्या 50 टीम केरळात बचावकार्य करत आहे. जवळपास सव्वा तीन लाख नागरिकांना रिलीफ कॅम्पमध्ये ठेवण्यात आलं आहे. देशभरातील आजवरचं सर्वात मोठं बचाव कार्य असल्याचं एनडीआरएफने म्हटलं आहे.
केंद्र सरकारकडून 500 कोटींची मदत केरळमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी केंद्र सरकारने 500 कोटींची मदत जाहीर केली आहे. काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केरळमधील पूरपरिस्थितीची हवाई पाहणी केली. त्याआधी केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्यासोबत मोदींची बैठक पार पडली.
पूरग्रस्तांना विविध राज्यातून मदत महापुराचा सामना करणाऱ्या केरळला देशातील इतर राज्यांमधून मदतीचा ओघ सुरु झाला आहे. यामध्ये मुख्यमंत्री मदत निधीसह अन्न आणि आवश्यक वस्तूंचा पुरवठाही करण्यात येत आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी नुकतीच केरळमधील पुरग्रस्तांच्या मदतीसाठी 10 कोटी रुपयांच्या मदतीची घोषणा केली. पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनीही केरळसाठी 10 कोटी रुपयांची मदत केली आहे. हैदराबादमधून अन्नाची पाकीटं सैन्याच्या विमानाद्वारे नेण्यात आली आहेत.
संबंधित बातम्या
केरळसाठी केंद्राकडून 500 कोटींची मदत
VIDEO : केरळ पूर : गर्भवती महिलेला हेलिकॉप्टरच्या सहाय्याने वाचवलं!
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)