एक्स्प्लोर
VIDEO | प्रीवेडिंग फोटोशूट करताना बोट उलटली आणि...
केरळमधल्या तिजीन आणि सिल्पा या जोडप्याचं फोटोशूट करताना बोट उलटली आणि दोघं पाण्यात पडले. त्यांचा अनोखा प्रीवेडिंग व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वायरल झाला आहे.

मुंबई : लग्नसराईचा मोसम असल्यामुळे अनेक जोडपी प्रीवेडिंग फोटोशूट करत आहेत. फोटोशूट करताना होणाऱ्या गमतीजमती केरळमधल्या एका जोडप्यालाही अनुभवाला आल्या. फोटो काढताना अचानक बोट उलटल्यामुळे दोघांची तारांबळ उडाली. दोघं पाण्यात पडतानाचे क्षणच आता त्यांच्या प्रीवेडिंग व्हिडिओचाच भाग झाले आहेत. नवरदेव-नवरीच्या रोजच्या आयुष्यातले क्षण कॅमेरात कैद करण्यासाठी वेडिंग फोटोग्राफर्स चांगलीच कसरत करत असतात. मात्र केरळमधल्या तिजीन आणि सिल्पा या जोडप्याचं फोटोशूट करताना फोटोग्राफर्सना काहीच करावं लागलं नाही, कारण आपसूकच कमाल झाली. त्यांचा अनोखा प्रीवेडिंग व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वायरल झाला आहे. केरळमधील पंबा नदीत तिजीन-सिल्पाचं फोटोशूट सुरु होतं. नवरदेव-नवरी डोक्यावर केळीचं पान धरुन बोटीत बसले होते. एकमेकांकडे पाहत ते स्वतःच्या धुंदीतच हरवले होते. परफेक्ट मूमेंट्स कॅप्चर करण्यासाठी फोटोग्राफर टीममधील काही जण त्यांच्यावर नदीचं पाणी उडवत होते. अशातच गंमत झाली! बोटीचा तोल गेला आणि कोणाला समजायच्या आतच दोघं पाण्यात पडले. तिजीन-सिल्पाच्या मदतीला कोणी जाईपर्यंत ते पाण्यात पडून उभेही राहिले होते. अर्थात ही सगळी मजा-मस्ती होती, मात्र या निमित्ताने त्यांना अविस्मरणीय व्हिडिओ मिळाला. 'वेडप्लॅनर वेडिंग स्टुडिओ'ने हा व्हिडिओ शेअर केला आहे.
आणखी वाचा























