KCR National Party : दु. 1.19 वाजता भारत राष्ट्र समितीच्या स्थापनेची घोषणा, तेलंगणाचे मुख्यमंत्री K चंद्रशेखर राव यांचा राष्ट्रीय राजकारणात प्रवेश
K Chandrashekar Rao : तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी दसऱ्याच्या मुहूर्तावर राष्ट्रीय राजकारणात प्रवेश केला आहे. बुधवारी दुपारी केसीआर यांनी भारत राष्ट्र समिती या पक्षाची घोषणा केली.
KCR to launch national party : तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी दसऱ्याच्या मुहूर्तावर राष्ट्रीय राजकारणात प्रवेश केला आहे. बुधवारी दुपारी केसीआर यांनी भारत राष्ट्र समिती या पक्षाची घोषणा केली. कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांनी यावेळी हजेरी लावली होती. मागील 21 वर्षांपासून केसीआर तेलंगणा राष्ट्र समितीच्या माध्यमातून तेलंगणा राज्याच्या राजकारणात सक्रीय आहेत. मागील काही दिवसांपासून भाजपविरोधात विरोधक एकवटले आहेत. यामध्ये केसीआर यांचं नाव आघाडीवर आहे. केसीआर यांनीही भाजपच्या विरोधात आवाज उठवला होता. त्यांनी दिल्लीमध्ये विरोधकांच्या भेटी घेत एकत्र येण्याचं आवाहन केले होते. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार असताना केसीआर यांनी मुंबईत येऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यावेळी भाजपविरोधातील भूमिका त्यांनी स्पष्ट केली होती. दसऱ्याच्या मुहूर्तावर केसीआर यांनी राष्ट्रीय राजकारण प्रवेश केला आहे. बुधवारी दुपारी एक वाजून 19 मिनिटांनी केसीआर यांनी भारत राष्ट्र समिती या पक्षाची घोषणा करत राष्ट्रीय राजकारणात प्रवेश केला.
2024 मध्ये भाजपला टक्कर देणार?
राष्ट्रीय पक्षाची घोषणा करताना केसीआर यांनी 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजप (BJP)आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांचा सामना करणार असल्याचं स्पष्ट केलं. केसीआर यांनी देशातील सर्वच विरोधी पक्षाला भाजपविरोधात एकवटण्याचं आवाहन केलं. मागील वर्षभरात केसीआर यांनी भाजपविरोधात अनेक वक्तव्य करत आपला इरादा स्पष्ट केला होता.
केसीआर यांच्या बीआरएस पक्षाला कधी मिळणार मान्यता?
केसीआर यांनी बीआरएस पक्षाला राष्ट्रीय पक्ष घोषीत केलं आहे, पण तुर्तास निवडणूक आयोगाकडून अद्याप पक्षाला राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळालेली नाही. कारण, एखाद्या पक्षाला राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळण्यासाठी कमीत कमी चार राज्यात अस्तित्वात असणं गरजेचं आहे. कोणत्याही चार राज्यात आणि चार राज्यात लोकसभा निवडणूकीत सहा टक्के मतं मिळवावी लागतील. अथवा पार्टीला तीन राज्यात लोकसभा निवडणुकीत दोन टक्के जागा जिंकाव्या लागतील.
अन्य राज्यातही निवडणूक लढणार केसीआर?
केसीआर यांच्या बीआरएस पक्षाचे नेते विनोद कुमार म्हणाले की, कोणताही पक्ष राष्ट्रीय पक्ष म्हणून नोंदणी करण्याशिवाय निवडणूक आयोगाला सूचना देऊन अन्य राज्यात निवडणुका लढवू शकतो. त्यामुळे आमचाही पक्ष निवडणूक आयोगाला सूचना देऊन अन्य राज्यात निवडणूक लढवणार आहे. दरम्यान, सुत्रांच्या माहितीनुसार, केसीआर यांचा पक्ष 2024 लोकसभा निवडणुकीत अन्य राज्यातही मैदानात उतरणार आहे. पक्ष कार्यकारिणीच्या बैठकीत बोलताना केसीआर म्हणाले की, भारत राष्ट्र समिती (BRS) राष्ट्रीय स्तरावर भाजपचा पर्याय म्हणून उदयास येईल. 2024 मध्ये भाजप आणि बीआरएस या दोघांमध्ये थेट लढत होईल.