(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Joshimath Sinking: जोशीमठ अजुनही खचतंय... अवघ्या 12 दिवसांत 5.4 सेमी भूस्खलन, इस्रोकडून सॅटेलाइट इमेज जारी
Joshimath Sinking Satellite Images: इस्रोनं जारी केलेल्या जोशीमठच्या सॅटेलाईट इमेजेसमध्ये जोशीमठ दिवसेंदिवस कसं खचतंय, हे स्पष्ट होतंय. कार्टोसॅट-2एस उपग्रहावरून ही छायाचित्रं घेण्यात आली आहेत.
Joshimath Sinking Satellite Images: इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (ISRO) च्या नॅशनल रिमोट सेन्सिंग सेंटरनं जोशीमठ शहराच्या (Joshimath City) सेटेलाईट इमेजेस प्रसिद्ध केल्या आहेत. या इमेजेसवरुन जोशीमठमध्ये जमीन खचण्याची प्रक्रिया कशी सुरू आहे, याचा अंदाज येतोय. जोशीमठ अवघ्या 12 दिवसांत 5.4 सेंटीमीटरपर्यंत खचल्याचं सॅटेलाइट इमेजमधून दिसून आलं आहे.
इस्रोने फोटो जारी करत सांगितलंय की, 27 डिसेंबर 2022 ते 8 जानेवारी 2023 दरम्यान जोशीमठमध्ये 5.4 सेमी भूस्खलनाची नोंद झाली आहे. एप्रिल 2022 ते नोव्हेंबर 2022 दरम्यान, जोशीमठमध्ये 9 सेंटीमीटरपर्यंत भूस्खलन झाल्याचं दिसून येतंय. एनएसआरसीनं गेल्या आठवड्यात सांगितलं की, डिसेंबर ते जानेवारीच्या पहिल्या आठवड्यादरम्यान जोशीमठमध्ये वेगानं भूस्खलन होण्यास सुरुवात झाली आहे.
जोशीमठमधील सबसिडन्स झोन (Subsidence Zone)
सॅटेलाइट इमेजमधून दिसून येतंय की, आर्मी हेलिपॅड आणि नरसिंह मंदिरासह मध्य जोशीमठमध्ये सबसिडन्स झोन आहे. जोशीमठ-औली रस्त्यालगत 2,180 मीटर उंचीवर सर्वाधिक भूस्खलन झालं आहे. 2022 मध्ये, एप्रिल ते नोव्हेंबर दरम्यान, जोशीमठमध्ये 8.9 सेंटीमीटरपर्यंत भूस्खलन झाल्याचं नोंदवण्यात आलं होतं.
जोशीमठची परिस्थिती गंभीर
चमोली जिल्हा प्रशासनानं जोशीमठ हे भूस्खलन क्षेत्र म्हणून घोषित केलं आहे. गेल्या काही दिवसांत येथील शेकडो घरं आणि इमारतींना भेगा गेल्या आहेत. जोशीमठमधून शेकडो कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. दरम्यान, राज्य सरकारनं 1.5 लाख रुपयांचं पॅकेज मदत म्हणून जाहीर केलं असून लवकरच राज्य सरकारकडून पुनर्वसन पॅकेजची घोषणा होण्याची शक्यता आहे.
दोन हॉटेल्स पाडली
जोशीमठमध्ये गुरुवारी (12 जानेवारी) दोन हॉटेल पाडण्याचं काम सुरू करण्यात आलं आहे. मात्र, खराब हवामानामुळे ते पाडण्याचं काम मध्यंतरी थांबवावं लागलं होतं. यापूर्वी स्थानिक नागरिक आणि रहिवाशांच्या विरोधामुळे काही दिवस पाडकामाला स्थगिती देण्यात आली होती. जोशीमठमध्ये फक्त 'मलारी इन' आणि 'माउंट व्ह्यू' ही हॉटेल्स पाडण्यात येणार असल्याचं प्रशासनानं सांगितलं आहे.
जोशीमठमधील परिस्थितीला जबाबदार कोण?
जोशीमठमधील भूस्खलनाचं विश्लेषण करण्यासाठी अनेक तज्ज्ञांची पथकं तैनात करण्यात आली आहेत. मात्र, या परिस्थितीसाठी स्थानिक लोकांनी एनटीपीसी जलविद्युत प्रकल्पाच्या बोगद्याच्या कामाला जबाबदार धरलं आहे. दुसरीकडे, एनटीपीसीनं एक निवेदन जारी करून त्यांचा बोगदा जोशीमठच्या खालून जात नाही, त्यामुळे त्यांचा आणि या परिस्थितीचा काहीही संबंध नसल्याचा दावा केला आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Joshimath News: बेसुमार विकासकामांमुळे देवभूमी ढासळतेय? हिमालयाच्या संकेतातून धडा घेण्याची गरज