मुंबई : जवाहरलाल नेहरु विद्यापीठातील (जेएनयू) हॉस्टेलमध्ये रविवारी (5 जानेवारी) रात्री मास्कधारी हल्लेखोरांना राडा घातला. हल्लेखोरांनी लाठ्या-काठ्यांसह मुलींच्या हॉस्टेलवर हल्ला चढवला. हल्ल्यात जेएनयू विद्यार्थी संघटनेची अध्यक्ष आयशी घोष गंभीर जखमी झाली आहे. रक्ताने माखलेले तिचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या हल्ल्यात जखमी झालेल्या 18 जणांना उपचारासाठी एम्समध्ये दाखल करण्यात आलं आहे. अभाविपच्या विद्यार्थ्यांनी हल्ला केल्याचा आरोप जेएनयू विद्यार्थी संघटनेने केला आहे.


आयशी विद्यार्थी राजकारणातील एक सक्रिय नेता म्हणून समोर आली आहे. या संपूर्ण आंदोलनात तिला कुटुंबाचाही पाठिंबा मिळाला आहे. रविवारच्या घटनेवर तिच्या आई-वडिलांनीही प्रतिक्रिया दिली आहे. "देशभरात अस्थिर वातावरण आहे. भविष्यात आपल्यालाही मारहाण होऊ शकते. आज माझी मुलगी आहे, उद्या दुसऱ्या कोणाचा तरी मुलगा/मुलगी असेल," अशी प्रतिक्रिया तिच्या वडिलांनी दिली. तर या संदर्भात आयशी घोषच्या आईने विद्यापीठाचे कुलगुरुंच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. "आंदोलनातून बाहेर पडण्यास मुलीला कधीच सांगणार नाही," असंही तिच्या आईने सांगितलं.

जाणून घेऊया कोण आहे आयशी घोष?  

- आयशी घोष झारखंडच्या छोट्या धनबाद या शहरातून शिक्षणासाठी दिल्लीला आली होती. तिने 2019 मध्ये जेएनयू विद्यार्थी संघटनेची अध्यक्ष म्हणून तिची निवड झाली होती. विजयानंतर तिने विद्यापीठाच्या अनेक मुद्द्यांवर शांततेने संघर्ष करणार असल्याचं म्हटलं होतं.

- दौलतराम कॉलेजमधून राज्यशास्त्राचं शिक्षण घेतल्यानंतर ती सध्या जेएनयूच्या स्कूल ऑफ इंटरनॅशनल स्टडीजमधून एमफिल करत आहे. विद्यापीठ प्रशासनाने विद्यार्थ्यांसंदर्भात घेतलेल्या कोणत्याही निर्णयात त्रुटी सापडल्यानंतर तिने अनेकदा विरोध केला आहे.

- 2019 मध्ये एमबीएची फी 12 लाख रुपयांपर्यंत वाढवल्यानंतर आयशी घोष उपोषणाला बसली होती. यादरम्यान तब्येत बिघडल्यानंतर वैद्यकीय सल्लामसलत केल्यानंतर तिला उपोषणावरुन उठवण्यात आलं होतं.

- आयशी घोष स्टूडेंट फेडरेशन ऑफ इंडिया संघटनेशी संबंधित आहे. आयशीच्या रुपाने या संघटनेमधून 13 वर्षांनी एखाद्या अध्यक्षाची निवड झाली आहे. "जेएनयू असं कॅम्पस आहे जे समानतेसाठी ओळखलं जातं. इथे एक संघटना पूर्णत: स्त्रीविरोधी मानसिकतेची आहे, तर कॅम्पसचा मूळ स्वभाव समानतेचा आहे. इथे मला संपूर्ण कॅम्पसने पाठिंबा दिला आहे," अशी प्रतिक्रिया आयशीने निवडीनंतर दिली होती.

- जेएनयूमधून बाहेर पडल्यानंतर देशाच्या राजकारणात जाण्याची इच्छा आयशीने व्यक्त केली होती. "महिला राजकारणातूनच समाजात त्यांच्याविरोधातील मानसिकता बदलू शकतात," असं आयशी म्हणाली होती.

- विद्यार्थी संघटनेची अध्यक्ष बनल्यानंतर जेएनयू प्रशासनाने इंटर हॉस्टेल मॅन्युअलमध्ये हॉस्टेलटी फी वाढवून ड्रेस कोड सारखे नवे नियम  बनवल्यानंतर आयशी त्याचा जोरदार विरोध केला होता. यानंतर कॅम्पसमध्ये फी वाढ आणि नव्या हॉस्टेल मॅन्युअलबाबत आंदोलन छेडण्यात आलं होतं.

- आंदोलनाचं नेतृत्त्व करणाऱ्या आयशीने फी वाढीच्या मुद्द्यावर 11 नोव्हेंबर रोजी विद्यापीठाच्या दीक्षांत सोहळ्यात निषेधाचं आवाहन केलं होतं. यामध्ये हजारोंच्या संख्येने विद्यार्थी सहभागी झोले होते. त्यानंतर मनुष्यबळ विकास मंत्रालयाने फीवाढीबाबत समितीची स्थापना केली होती.

संबंधित बातम्या