मुंबई : देशाच्या राजधानीमध्ये कधी पोलीस विद्यापीठात जाऊन गोळ्या चालवतात, तर कधी बुरख्यामधील हल्लेखोर जाऊन विद्यापीठांमध्ये धुडगूस घालतात आणि रक्तपात करतात. उत्तम कायदा आणि सुव्यवस्थेचा हे लक्षण नाही. सरकारमधील लोक हे नागरिकत्व दुरुस्ती कायद्यासारख्या कामांमध्ये गुंतलेले आहेत. मात्र या देशातील विद्यार्थी सुरक्षित नसेल, तर हा देश सुरक्षित राहणार नाही, असं मत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केलं आहे.


जेएनयूतील विद्यार्थ्यांवरील हल्ल्यासंदर्भात बोलताना खासदार संजय राऊत पुढे म्हणाले की, गृहमंत्री अमित शाह यांनी हल्लेखोरांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. मुळात हल्लेखोर कोण? हल्ला करण्यामागचं कारण काय ? याचा तपास पोलिसांनी करावा. गेल्या पाच वर्षापासून प्रत्येक वेळी जेएनयू का टार्गेट होत आहे? याचा सुद्धा विचार करावा लागेल. ज्या जेएनयूने भारताला नोबेल पुरस्कार मिळवून देणारा एक विद्यार्थी घडवला, ज्या जेएनयूने राज्यकर्ते, उद्योगपती आणि साहित्यिक दिले, त्या जेएनयूवर एका विशिष्ट संघटनेचा राग का? हे देशाने समजून घेतलं पाहिजे, असंही संजय राऊत यांनी सांगितलं.


जेएनयूच्या मुलींच्या हॉस्टेलमध्ये रविवारी अज्ञात हल्लेखोरांनी हैदोस घातला होता. हल्लेखोरांनी लाठ्या-काठ्यांसह मुलींच्या हॉस्टेलवर हल्ला चढवला. सर्व हल्लेखोरांनी यावेळी तोंडाला रुमाल लावले होते. या हल्ल्यात जखमी झालेल्या 20 जणांना उपचारासाठी एम्समध्ये दाखल करण्यात आलं आहे. हल्लेखोरांनी यावेळी जेएनयूएसयूची अध्यक्ष आयशी घोषलाही मारहाण केली. अभाविपच्या विद्यार्थ्यांनी हल्ला केल्याचा आरोप जेएनयू विद्यार्थी संघटनेने केला आहे. जेएनयूमध्ये झालेल्या हिंसाचाराबाबत अनेक तक्रारी आल्या असून लवकरच याप्रकरणी गुन्हा दाखल करु, अशी माहिती दिल्ली पोलिसांनी दिला आहे. गृहमंत्री अमित शाह यांनी दखल घेतली असून दिल्ली पोलीस आयुक्तांकडून प्रकरणाची माहिती घेतली. सोबतच या प्रकरणाची वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून चौकशी करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.


या मारहाणीच्या घटनेनंतर देशभरात पडसाद उमटत आहेत. अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांनी घटनेचा निषेध करत निदर्शने केली. राजकीय नेते आणि  सेलिब्रिटींनीही या घटनेचा निषेध केला. राहुल गांधी, शरद पवार, प्रियांका गांधी, ममता बॅनर्जी, अरविंद केजरीवाल इत्यादी राजकीय नेत्यांनी या घटनेचा निषेध केला आहे. अभिनेता रितेश देशमुख, अनुराग कश्यप, अभिनेत्री स्वरा भास्कर, दिया मिर्झा, सोनम कपूर, तापसी पन्नू, शबाना आझमी यांच्यासह अनेक कलाकारांनी ट्वीट करुन या घटनेचा निषेध केला आहे.


संबंधित बातम्या