मुंबई : दिल्लीतील जवाहरलाल नेहरु विद्यापीठात (जेएनयू) घुसून मास्कधारी लोकांनी विद्यार्थ्यांवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात जेएनयू विद्यार्थी संघटनेची अध्यक्ष आयशी घोष गंभीर जखमी झाले आहे. या हल्ल्यात 18 जण जखमी झाले असून त्यांच्या एम्स ट्रॉमा सेंटरमध्ये उपचार सुरु आहे. जेएनयूमधील हल्ल्यावर बॉलिवूडमधूनही प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. अभिनेता रितेश देशमुख, अभिनेत्री स्वरा भास्कर, तापसी पन्नूसह अनेक कलाकारांनी ट्वीट करुन या घटनेचा निषेध केला आहे.


रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख
अभिनेता रितेश देशमुखने जेएनयूमधील हल्ल्याचा उल्लेख 'भयानक' असा केला आहे. "तुम्हाला चेहरा झाकण्याची गरज का भासली? अभिमान वाटावा अशी ही गोष्ट नाही. मास्क घालून आलेल्या गुंडांनी जेएनयूमध्ये घुसून विद्यार्थी आणि शिक्षकांना केलेल्या मारहाणीची दृश्ये अतिशय भयानक आहेत. असा हिंसाचार कदापि सहन केला जाणार नाही," असं ट्वीट रितेशने केलं आहे.





तर रितेशची पत्नी आणि अभिनेत्री जेनेलिया देशमुखनेही जेएनयूमधील विद्यार्थ्यांवरील हल्ल्याचा निषेध केला आहे. तिने ट्विटरवर लिहिलं आहे, "मास्कधारी गुंडांनी जेएनयूमध्ये घुसून विद्यार्थी आणि शिक्षकांवर केलेल्या हल्ल्याची दृश्ये पाहून मन विचलित झालं. पोलिसांना आवाहन आहे की, गुन्हेगारांची ओळख पटवून जखमी विद्यार्थ्यांना न्याय द्यावा."





स्वरा भास्कर
स्वरा भास्करने जेएनयू विद्यार्थी संघटनेची अध्यक्ष आयशी घोषचा रक्तबंबाळ आणि रडतानाचा व्हिडीओ ट्विटरवर पोस्ट केला आहे. तिने लिहिलं आहे की "अभाविपच्या गुंडांनी जेएनयूएसयू अध्यक्ष आयशी घोषवर हल्ला केला. वसंत कुंज पोलिस स्टेशन जेएनयूपासून केवळ एक किमी अंतरावर आहे. तुम्ही हे काय होऊ देत आहात?"





याशिवाय तिने स्वत:चा आणखी एक व्हिडीओ शेअर करुन दिल्लीच्या रहिवाशांना जेएनयू कॅम्पसच्या गेटबाहेर मोठ्या संख्ये उपस्थित राहण्याचं आवाहन केलं. तसंच आपले आई-वडील जेएनयू कॅम्पसमध्ये राहत असल्याचंही तिने सांगितलं.





अनुराग कश्यप
आता भाजपची निंदा करण्याची वेळ आहे. ते बोलणार की, ज्यांनी हे केलं ते चुकींचं होतं. पण सत्य हे आहे की, जे घडलं ते भाजप आणि अभाविपने केलं. नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या निगराणी आणि पाठिंब्याने केलं आहे. दिल्ली पोलिसांसोबत मिळून केलं आहे. हेच एकमेव सत्य आहे.


शबाना आझमी
ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांनी स्वरा भास्करचा व्हिडीओ शेअर करुन म्हटलं आहे की, हे अतिशय धक्कादायक आहे. निंदा करणं पुरेसं नाही. दोषींवर त्वरित कारवाई करण्याची गरज आहे.





दिया मिर्झा
अभिनेत्री दिया मिर्झाने प्रश्न विचारले आहेत. हे आणखी किती काळ चालू ठेवलं जाणार आहे? तुम्ही किती वेळ डोळेझाकपणा करणार आहे? राजकारण किंवा धर्माच्या नावावर असहाय लोकांवर किती काळ हल्ला केला जाईल? आता पुरे झालं. दिल्ली पोलिस.


सोनम कपूर
धक्कादायक, घृणास्पद आणि भ्याड. जर तुम्ही निरपराधांवर हल्ला करता तर किमान तुमचा चेहरा दाखवण्याची हिंमत दाखवा.




तापसी पन्नू
पिंक सिनेमातील अभिनेत्री तापसी पन्नूनेही हल्ल्याचा निषेध केला आहे. तिने हल्ल्याचा व्हिडीओ ट्वीट करुन लिहिलं आहे की, "ज्या ठिकाणी आपलं भविष्य आकार घेत आहे, तिथली ही परिस्थिती आहे. आता कायमचा ठपका बसला आहे. अपरिमीत हानी."





काय आहे प्रकरण?
नवी दिल्लीतील जवाहरलाल नेहरु विद्यापीठातील हॉस्टेलमध्ये रविवारी मास्कधारी हल्लेखोरांना राडा घातला. हल्लेखोरांनी लाठ्या-काठ्यांसह मुलींच्या हॉस्टेलवर हल्ला चढवला. हल्लेखोरांनी यावेळी जेएनयूएसयूची अध्यक्ष आयशी घोषलाही मारहाण केली. सर्व हल्लेखोरांनी तोंडाला रुमाल किंवा मास्क लावले होते. या हल्ल्यात जखमी झालेल्या 18 जणांना उपचारासाठी एम्समध्ये दाखल करण्यात आलं आहे. अभाविपच्या विद्यार्थ्यांनी हल्ला केल्याचा आरोप जेएनयू विद्यार्थी संघटनेने केला आहे.


जेएनयू हिंसाचाराबाबत दिल्ली पोलिसांनी सांगितलं की, "काल जेएनयूमध्ये झालेल्या हिंसाचाराबाबत अमच्याकडे अनेक तक्रारी आल्या आहे. आम्ही लवकरच गुन्हा दाखल करु."
दुसरीकडे जेएनयू कॅम्पसच्या गेटची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. मुख्य गेट बंद करण्यात आलं आहे. विद्यापीठाच्या विद्यार्थ्याची तपासणी करुन आणि ओळखपत्र पाहिल्याशिवाय आत पाठवलं जात नाही. पोलिसांनी काल रात्री कॅम्पसमध्ये फ्लॅग मार्च केला होता.

दरम्यान, या प्रकरणाची गृहमंत्री अमित शाह यांनी दखल घेतली असून दिल्ली पोलीस आयुक्तांकडून प्रकरणाची माहिती घेतली. सोबतच या प्रकरणाची वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून चौकशी करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.