(Source: ECI/ABP News/ABP Majha)
अॅमेझॉनचे जेफ बेजोस भारत दौऱ्यावर, महात्मा गांधींना वाहिली आदरांजली
अॅमेझॉनचे सीईओ जेफ बेजोस भारतात दौऱ्यावर आले आहे. भारतात उतरल्यानंतर बेजोस यांनी सर्वात आधी महात्मा गांधी यांच्या स्मृतीस्थळावर जाऊन आदरांजली वाहिली.
नवी दिल्ली : जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेले अॅमेझॉनचे सीईओ जेफ बेजोस भारतात दौऱ्यावर आले आहेत. भारतात उतरल्यानंतर ते सर्वात आधी कोणत्या बिझनेससंबधी मीटिंगमध्ये सहभागी झाले नाहीत. तर भारतात उतरल्यानंतर त्यांनी दिल्लीतील राज घाट येथील महात्मा गांधींच्या स्मृतीस्थळावर जाऊन पुष्पगुच्छ अर्पण करुन आदरांजली वाहिली. बेजोस यांनी याचा व्हिडीओ ट्वीटरवर शेअर केला आहे. यावेळी त्यांनी सफेद कुर्ता आणि लाल रंगाचं नेहरु जॅकेट परिधान केलेलं दिसत आहे.
जेफ बेजोस यांनी ट्वीटरवर शेअर केलेल्या व्हिडीओला कॅप्शन देताना लिहिलं की, नुकताच भारतात उतरलो आहे आणि सर्वात आधी अशा व्यक्तीला आंदरांजली वाहिली आहे, ज्याने खरंच जग बदललं आहे. “तुम्ही उद्या मरणार आहात असं समजून आज जगा. असं शिका की भरपूर जगता येईल" - महात्मा गांधी Just landed in India and spent a beautiful afternoon paying my respects to someone who truly changed the world. “Live as if you were to die tomorrow. Learn as if you were to live forever." - Mahatma Gandhi. pic.twitter.com/xDXAT9cBgf
— Jeff Bezos (@JeffBezos) January 14, 2020
जेफ बजोस यांनी पत्नी आणि मुलांसह 2018 मध्ये औरंगाबादमधील जगप्रसिद्ध अजिंठा आणि वेरुळच्या लेण्यांना भेट दिली होती. त्यावेळी अत्यंत साधेपणाने ते अजिंठा आणि वेरुळ लेणी परिसरात फिरत होते.
ऑनलाईन शॉपिंग साईट 'अमेझॉन'चे मालक जेफ बेझोस जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. बेझोस यांच्याकडे 117 अब्ज डॉलर्स इतकी संपत्ती आहे. बेझोस यांनी ऑस्ट्रेलियातील नैसर्गिक संकटासाठी 1 दशलक्ष ऑस्ट्रेलियन डॉलर मदत केली आहे. एवढ्या श्रीमंत व्यक्तीने व्यक्तीने तुटपुंजी मदत करावी त्यावरून त्यांना ट्रोल केलं जात आहे.