(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Jammu Kashmir : जम्मू-काश्मीरमध्ये मुसळधार पावसामुळे नदीला पूर, प्रवाह ओलांडताना दोन जवान गेले वाहून
Two Soldier Swept Away : जम्मू-काश्मीरमधील पुंछमध्ये पेट्रोलिंग दरम्यान ओसंडून वाहणारी नदी पार करण्याच्या प्रयत्नात नायब सुभेदारसह दोन जवान वाहून गेले आहेत.
Jammu Kashmir News : जम्मू-काश्मीरमध्ये सध्या मुसळधार पाऊस (Heavy Rain) सुरु असून यामुळे नदी-नाल्यांना पूर आला आहे. मुसळधार पावसामुळे जम्मू-कश्मीरमधील पुंछमध्ये दुर्घटना घडली आहे. पावसामुळे दुथडी भरून वाहणाऱ्या नदीचा प्रवाह ओलांडताना भारतीय लष्कराचे दोन जवान वाहून गेलं आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी जम्मू-काश्मीरमधील पुंछमध्ये पेट्रोलिंग दरम्यान ओसंडून वाहणारी नदी पार करण्याच्या प्रयत्नात नायब सुभेदारसह दोन जवान वाहून गेले आहेत.
नदीचा प्रवाह ओलांडताना 2 जवान वाहून गेले
अधिकाऱ्यांनी या घटनेची माहिती देताना सांगितलं की, शनिवारी दोन जवान पुंछ परिसरात गस्त घालत असताना दुथडी भरून वाहणारी नदी ओलांडण्याचा प्रयत्न करत असताना जोरदार प्रवाहाच्या तडाख्यात आल्याने दोन जवान वाहून गेले आहेत. भारतीय लष्कराचे दोन जवान नदीत वाहून गेल्याने जम्मू आणि काश्मीरच्या पुंछ जिल्ह्यातील मुगल रोडलगत पोशाना भागात बचाव आणि शोध मोहीम सुरू आहे.
नायब सुभेदार कुलदीप सिंह गेले वाहून
वाहून गेलेल्या दोन जवानांपैकी एकाचं नाव नायब सुभेदार कुलदीप सिंह असं आहे. अन्य जवानाबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. सुरक्षा दल आणि आपत्ती व्यवस्थापन दल यांच्याकडून शोध आणि बचाव मोहिस सुरु आहे. कारवाईचे निरीक्षण करण्यासाठी आणि आवश्यक मार्गदर्शन करण्यासाठी वरिष्ठ लष्कर आणि पोलिस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.
नदीला अचानक पूर
पीटीआय वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, दोन जवान पुंछच्या सुरनकोटमधील पोशाना येथील डोगरा नाला ओलांडत होते, मात्र मुसळधार पावसामुळे आलेल्या पुरामुळे पाण्याच्या जोरदार प्रवाहाने ते वाहून गेले. पीटीआयने लष्करी अधिकार्यांच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे. अधिकाऱ्यांनी शनिवारी संध्याकाळी सांगितलं होतं की, लष्कर, पोलीस आणि राज्य आपत्ती व्यवस्थापन दलाचे संयुक्त पथक दोन्ही बेपत्ता जवानांचा शोध घेत आहेत, पण अद्याप त्यांच्याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. लष्कर आणि पोलिसांचे वरिष्ठ अधिकारीही घटनास्थळी दाखल झाले असून त्यांच्याकडून बचावकार्यावर लक्ष ठेवलं जात आहे. दरम्यान, मुसळधार पावसामुळे लोकांना नदी आणि नाल्यांपासून दूर राहण्याचा सल्ला प्रशासनाकडून देण्यात येत आहेत.
तिसऱ्या दिवशी पवित्र अमरनाथ यात्रा स्थगित
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाची संततधार सुरुच आहे. खराब हवामानामुळे सलग तिसऱ्या दिवशी पवित्र अमरनाथ यात्रा स्थगित करण्यात आली आहे. श्रीनगरमध्ये संततधार पावसामुळे झेलम नदीच्या पाण्याच्या पातळीने धोक्याचा टप्पा ओलांडला आहे. घरांमध्ये पाणी शिरू लागले आहे. स्थानिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.