जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्यात चार पोलीस शहीद
जम्मू-काश्मीरच्या शोपियान जिल्ह्याच्या अरहामामध्ये दहशतवाद्यांनी दुपारी पोलिसांच्या पथकावर गोळीबार सुरू केला.
जम्मू : जम्मू-काश्मीरच्या शोपियानमध्ये आज पोलिसांच्या पथकावर दहशतवाद्यांनी हल्ला केला. दहशतवाद्यांच्या या हल्ल्यात चार पोलिस शहीद झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिसांच मोठं पथक घटनास्थळी दाखल झालं.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शोपियान जिल्ह्याच्या अरहामामध्ये दहशतवाद्यांनी दुपारी पोलिसांवर गोळीबार सुरू केला. या गोळीबारात चार पोलिस जखमी झाले. जखमी पोलिसांना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्याने चारही पोलिसांचा मृत्यू झाला.
पोलिस कॉन्स्टेबल इशफाक अहमद मीर, कॉन्स्टेबल जवाद अहमद भट, कॉन्स्टेबल मोहम्मद इकबाल मीर आणि पोलिस अधिकारी आदिल मंजूर भट हे या हल्ल्यात शहीद झाले आहेत. याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलिस संपूर्ण प्रकाराची चौकशी करत आहेत.
दोन दहशतवाद्यांचा खात्मा दुसरीकडे जम्मू-काश्मीरातील अनंतनागमध्ये लष्कर आणि पोलिसांनी दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं आहे. कुलगामातील रेडवानी स्थित हिझाब कमांडर अल्ताफ अहमद दार उर्फ अल्ताफ कचरू याचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाला यश आलं आहे. तर दुसऱ्या अतिरेक्याचं नाव उमर राशिद असल्याचं कळतंय.
काही दिवसांपूर्वी बातामालोमध्ये झालेल्या चकमकीत पळून जाण्यात उमर राशिद यशस्वी ठरला होता. मात्र, आता पोलिस आणि लष्कराच्या संयुक्त कारवाईत उमर राशिदचाही खात्मा करण्यात आला आहे. त्यामुळे कालपासून दहशतवादी आणि सुरक्षा दलातील सुरु असलेल्या चकमक आता थांबवण्यात आली आहे. अल्ताफ कचरू आणि उमर राशिद हे दोघेही सुरक्षा यंत्रणांच्या मोस्ट वॉन्टेड दहशतवादी यादीत होते..