पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर ओमर अब्दुल्ला यांनी घेतली नरेंद्र मोदींची भेट, केंद्र जी कारवाई करणार त्याला साथ देणार
Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली.

Pahalgam Terror Attack नवी दिल्ली : जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी आज नवी दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतरची ही पहिली भेट आहे. दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास अर्धातास बैठक सुरु होती. या बैठकीत पहलगाम दहशतवादी हल्ला आणि त्यानंतर निर्माण झालेली सुरक्षेसंदर्भातील स्थिती यासह विविध मुद्यांवर चर्चा झाली.
केंद्राकडून जी कारवाई केली जाईल त्याला जम्मू काश्मीर सरकार साथ देणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ओमर अब्दुल्ला यांच्या बैठकीपूर्वी नॅशनल कॉन्फरन्सच्या सूत्रांनी बैठकीत काय होऊ शकतं याची माहिती दिली होती. केंद्र सरकार जो निर्णय घेईल त्यात जम्मू काश्मीरच्या प्रशासनाच्या वतीनं पूर्ण सरकार्य करण्याचं धोरण अब्दुल्ला यांचं आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला आणि देशाच्या सुरक्षेच्या मुद्यावर केंद्र सरकारसोबत जम्मू काश्मीर सरकार राहणार आहे.
जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा विषयक आव्हान वाढत आहेत. केंद्र सरकारनं पाकिस्तान विरुद्ध कठोर कारवाईचे संकेत दिले आहेत. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ओमर अब्दुल्ला यांची भेट झाली आहे.
लोकांनी एकत्र राहावं
नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष माजी मुख्यमंत्री फारुक अब्दुल्ला यांनी या हल्ल्याचा निषेध केला होता. दहशतवादावाविरुद्ध लोकांनी एकजूट राहावं असं आवाहन त्यांनी केलं होतं. ते म्हणाले होते की हल्ल्यातील सहभागी लोक मानवतेचे दुश्मन आहेत, ते नरकात सडतील.
फारुक अब्दुल्ला यांनी या हल्ल्यात मारला गेलेल्या आदिल हुसैन शाह याच्या घरी भेट देत श्रद्धांजली वाहिली. आदिल हुसैन शाह पहलगाममध्ये पर्यटकांना घोड्यावरुन बैसरण भागात सफर घडवायचा. पहलगाम दहशतवादी हल्ल्यात आदिल हुसैन शाहचा मृत्यू झाला. या हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला होता, त्यात प्रामुख्यानं पर्यटकांवर हल्ला करण्यात आला होता.
पाकिस्तानवरील कारवाईचा पंतप्रधानांना अधिकार
फारुक अब्दुल्ला यांनी पाकिस्तान विरुद्ध भारताकडून जी कारवाई करण्यात येत आहे त्यावर बोलण्यास नकार दिला. ते म्हणाले हा पंतप्रधानांचा अधिकार आहे. मी काही बोलणार नाही. फारुक अब्दुल्लांनी पाकिस्तानला ठणकावलं. पाकिस्तान पीपल्स पार्टीचे नेते बिलावल भुट्टा यांच्या धमकीवर त्यांनी आक्रमकपणे भूमिका मांडत अशा वक्तव्यांनी प्रश्न सुटणार नाहीत. त्यांच्या वक्तव्यांकडे लक्ष दिलं तर काश्मीर पुढं जाणार नाही, असं फारुक अब्दुल्ला म्हणाले.
इतर बातम्या :























