Jammu Kashmir: दहशतवाद्यांच्या शोध मोहिमेसाठी गेलेल्या वाहनात स्फोट, एक जवान शहीद तर दोन जखमी
Jammu Kashmir News: जम्मू-काश्मीरमधील शोपियान भागात एका खासगी वाहनात झालेल्या स्फोटात एका जवानाला आपला जीव गमवावा लागला आहे.
Jammu Kashmir News: जम्मू-काश्मीरमधील शोपियान भागात एका खासगी वाहनात झालेल्या स्फोटात एका जवानाला आपला जीव गमवावा लागला आहे. तर अन्य दोन जवान गंभीर जखमी झाले आहेत. हे तिन्ही सैनिक या वाहनाने एका ऑपरेशनमध्ये भाग घेण्यासाठी जात होते. संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते लेफ्टनंट कर्नल इम्रॉन मौसावी यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुप्त माहितीच्या आधारे सुरक्षा दलांनी शुक्रवारी सकाळी दक्षिण काश्मीरच्या शोपियान जिल्ह्यातील पत्तीटोहलन भागात घेराबंदी आणि शोध मोहीम सुरू केली. टार्गेट भागात फिरण्यासाठी खासगी वाहन भाड्याने घेतले होते. या गाडीत तीन सैनिक होते. त्याचवेळी या वाहनात स्फोट झाला, त्यामुळे तीन जवान गंभीर जखमी झाले.
स्फोटात जखमी झालेल्या तीन जवानांना तातडीने जिल्हा रुग्णालयात आणि नंतर श्रीनगरच्या 92 बेस रुग्णालयात दाखल करण्यात आले. परिस्थिती अधिकच बिघडल्याने नायक प्रवीण यांना उधमपूर येथील कमांड हॉस्पिटलमध्ये नेले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. लष्कराने दिलेल्या माहितीनुसार, नाईक प्रवीण हे उत्तराखंडमधील टिहरी गढवालचे रहिवासी असून त्यांच्या पश्चात पत्नी आणि सहा वर्षांचा मुलगा आहे.
उधमपूरमध्ये वीरगती प्राप्त झालेल्या जवानाला श्रद्धांजली वाहण्यात आली. नायक प्रवीण यांचा मृतदेह त्यांच्या मूळ गावी पाठवण्यात आला आहे. नायक प्रवीण यांच्या कारमध्ये झालेल्या स्फोटामागील कारण अद्याप समजू शकलेले नाही, तसेच लष्कराने या कारबाबत कोणतीही माहिती दिली नाही. याबाबत तपास सुरू आहे.