(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ISRO: मिशन आर्यभट्ट ते आदित्य L1 व्हाया चांद्रयान; इस्रोचा 60 वर्षांचा अभूतपूर्व प्रवास
ISRO History: भारताच्या यशस्वी चांद्रमोहिमेनंतर इस्रोनं आपली पावलं आदित्य L1 या सूर्य मोहिमेकडे वळवली आहेत. पण भारताची अंतराळ संशोधन संस्था असलेल्या इस्रोचा आतापर्यंतचा प्रवास कसा होता हे माहीत आहे का?
ISRO History: इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (ISRO) ही भारत सरकारची अंतराळ संस्था आहे, जी देशाच्या अंतराळ संशोधन आणि उपग्रह विकासासाठी जबाबदार आहे. 1962 साली स्थापन झालेल्या ISRO ने अंतराळ तंत्रज्ञान आणि संशोधनात भारताच्या उल्लेखनीय कामगिरीमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. इस्रोचं मुख्यालय कर्नाटकातील बंगळुरुमध्ये आहे.
इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (ISRO) ची स्थापना डॉ. विक्रम साराभाई यांनी केली होती, ज्यांना भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे जनक म्हणून ओळखलं जातं. डॉ. साराभाई यांनी भारताच्या विकासासाठी आणि प्रगतीसाठी अंतराळ तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी इस्रोची स्थापना करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. होमी भाभा आणि विक्रम साराभाई यांनी इस्रोच्या जडणघडणीमध्ये मोलाचं योगदान दिलं. अंतराळ संशोधनासाठी ऑटोमिट एनर्जी विभागाअंतर्गत 1962 मध्ये भारतीय अंतराळ संशोधन समितीची स्थापना (INCOSPAR) करण्यात आली. ऑगस्ट 1969 मध्ये INCOSPAR चं नाव बदलून 'भारतीय अंतराळ संशोधन संस्था' म्हणचेच 'इस्रो' ठेवण्यात आलं.
भारतीय अंतराळ संशोधन संस्था, म्हणजेच इस्रोने 1960 च्या दशकाच्या सुरुवातीपासून भारतीय अंतराळ कार्यक्रमात (Indian Space Programme) उल्लेखनीय यश मिळवलं आहे. इस्रो अंतराळ मोहिमेत मोठा इतिहास घडवण्याच्या तयारीत आहे. जेव्हा अमेरिकन उपग्रह Syncom-3 ने 1964 टोकियो ऑलिम्पिकचं थेट प्रक्षेपण केलं, ते पाहून भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे जनक डॉ. विक्रम साराभाई (Dr Vikram Sarabhai) यांनी भारतासाठी अवकाश तंत्रज्ञानाचे फायदे ओळखले. डॉ. साराभाईंचा असा विश्वास होता की, अवकाशातील संसाधनांमध्ये समाजाचे खरे प्रश्न सोडवण्याची क्षमता आहे. आता इस्रोच्या कामगिरीचा इतिहास जाणून घेऊया...
19 एप्रिल 1975: पहिला स्वदेशी उपग्रह आर्यभट्ट लाँच
इस्रोने 19 एप्रिल 1975 मध्ये पहिला स्वदेशी उपग्रह आर्यभट्ट लाँच केला. भारताने सोव्हिएत कॉसमॉस-3M प्रक्षेपण वाहन वापरून आपला पहिला उपग्रह आर्यभट्ट प्रक्षेपित केला. हा उपग्रह इस्रोने तयार केला होता आणि सोव्हिएत महासंघाने लाँच केला होता.
18 जुलै 1980: इस्रोकडून SLV-3 लाँच
सॅटेलाइट लाँच व्हेईकल-3 (SLV-3) हा भारताचं पहिलं उपग्रह प्रक्षेपण वाहन (Satellite Launch Vehicle) होतं. 18 जुलै 1980 मध्ये SLV-3 ने रोहिणी उपग्रहाला पृथ्वीच्या कक्षेत स्थापित केलं आणि भारत हा अंतराळ संशोधनात प्रगत असलेल्या देशांच्या रांगेतील सहावा देश झाला. 'रोहिणी' ही इस्रोद्वारे लाँच करण्यात आलेली उपग्रहांची एक मालिका होती. यामध्ये चार सॅटेलाइटचा समावेश होता. त्यातील तीन उपग्रहांनी यशस्वीपणे पृथ्वीच्या कक्षेत प्रवेश केला.
1983: भारतीय राष्ट्रीय उपग्रह प्रणालीची (INSAT) सुरुवात
इस्रोने 1983 मध्ये भारतीय राष्ट्रीय उपग्रह प्रणाली (INSAT) दूरसंचार, प्रसारण आणि हवामान सेवा प्रदान करण्यासाठी सुरू केली. इंडियन रिमोट सेन्सिंग (IRS) कार्यक्रम देखील याच वर्षी सुरू झाला, ज्याद्वारे पृथ्वी निरीक्षण उपग्रह प्रक्षेपित झाले.
20 सप्टेंबर 1993: PSLVचं पहिलं यशस्वी प्रक्षेपण
पोलर सॅटेलाइट लाँच व्हेईकल (PSLV) हा भारताच्या तिसऱ्या पिढीतील लाँच व्हेईकल आहे. 20 सप्टेंबर 1993 मध्ये याला लाँच करण्यात आलं, त्यानंतर जून 2017 पर्यंत सलग 39 यशस्वी मोहिमा पीएसएलव्हीच्या मदतीने करण्यात आल्या. इस्रोसाठी हा विश्वासू लाँच व्हेईकल आहे.
18 एप्रिल 2001: GSLV-D1 द्वारे GSAT-1 चं यशस्वीरित्या प्रक्षेपण
इस्रोचा आणखी एक महत्त्वाचे संशोधन म्हणजे जिओसिंक्रोनस सॅटेलाइट लॉन्च व्हेईकल (GSLV). GSLV मध्ये PSLV पेक्षा जास्त वजनदार पेलोड्स वाहून नेण्याची क्षमता आहे. 18 एप्रिल 2001 रोजी GSLV-D1 ने GSAT-1 चं यशस्वीरित्या प्रक्षेपण केलं.
22 ऑक्टोबर 2008: चांद्रयान-1चं प्रक्षेपण
चांद्रयान-1 ही भारताची पहिली चंद्र मोहीम होती, ते 22 ऑक्टोबर 2008 मध्ये लाँच करण्यात आलं. याने चंद्राभोवती 3400 हून अधिक फेऱ्या मारल्या. 29 ऑगस्ट 2009 रोजी चांद्रयानचा अंतराळाशी संपर्क तुटला आणि ही मोहीम संपली असल्याचे जाहीर करण्यात आलं.
5 नोव्हेंबर 2013: मंगळयानचं प्रक्षेपण
एखाद्या ग्रहावर अंतराळयान पाठवणारी भारताची ही पहिली मोहीम होती. Roscosmos, NASA आणि युरोपियन स्पेस एजन्सीनंतर मंगळाच्या कक्षेत पोहोचणारी इस्रो ही जगातील चौथी अंतराळ संस्था बनली आहे. पहिल्याच प्रयत्नात मंगळाच्या कक्षेत पोहोचणारा भारत हा जगातील पहिला देश ठरला. मंगळयान 5 नोव्हेंबर 2013 रोजी प्रक्षेपित करण्यात आलं.
22 जुलै 2019: चांद्रयान-2चं प्रक्षेपण
इस्रोने 22 जुलै 2019 रोजी चांद्रयान-2 ही मोहीम लाँच केली होती. चांद्रयान-2 चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणार होते. मात्र, अखेरच्या क्षणी त्याचा विक्रम लँडरशी संपर्क तुटला. चांद्रयान-2 चा 47 दिवसांचा प्रवास शेवटच्या क्षणी अपयशी ठरला.
14 जुलै 2023: चांद्रयान-3चं प्रक्षेपण
इस्रोने 22 जुलै 2019 रोजी चांद्रयान-3 ही मोहीम लाँच केली आणि 23 ऑगस्ट 2023 रोजी चांद्रयान चंद्राच्या पृष्ठभागावर लँड झालं आणि इस्रोने इतिहास रचला. या मोहिमेने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा भारत हा पहिला देश ठरला आहे.
इस्रोच्या भविष्यातील मोहिमा
इस्रो सध्या अनेक प्रोजेक्टवर काम करत आहे. भारताच्या स्वातंत्र्याच्या शतक महोत्सवापर्यंत इस्रो अनेक मोठमोठे कार्यक्रम राबवणार आहे. यामध्ये आदित्य L1, गगनयान, व्हीनस ऑर्बिटर मिशन आणि NISAR यासारख्या मोहिमाचा समावेश आहे. इस्रोची आदित्य L1 (Adiyta L1) ही सूर्य मोहीम 2 सप्टेंबर 2023 रोजी लाँच होणार आहे. चांद्रयान-3च्या अभूतपूर्व यशानंतर सर्वांचं लक्ष आदित्य L1 या सूर्य मोहिमेकडे लागून आहे.
हेही वाचा: