मुंबई : संयुक्त राष्ट्रात (UN) कार्यरत असलेल्या निवृत्त भारतीय लष्करी अधिकारी वैभव काळे (Vaibhav Kale) यांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. संयुक्त राष्ट्र येथे कार्यरत असलेले माजी भारतीय लष्करी अधिकारी कर्नल वैभव अनिल काळे यांचा गाझा येथील हल्ल्यात मृत्यू झाला आहे. वैभव काळे प्रवास करत असलेल्या वाहनावर वादग्रस्त रफाह या ठिकाणी हल्ला झाला. या हल्ल्यात वैभव काळे यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. ते मूळचे नागपूरचे होते. इस्रायल-हमास संघर्षात (Israel-Hamas Conflict) महाराष्ट्रातील निवृत्त भारतीय लष्करी अधिकारी वैभव काळे यांनी जीव गमावला आहे.


निवृत्त भारतीय लष्करी अधिकाऱ्याचा गाझा हल्ल्यात मृत्यू


वैभव काळे एनडीए आणि त्यानंतर आयएमएमार्फत लष्करात रुजू झाले होते. 11 जम्मू काश्मिर रायफल्स या तुकडींतर्गत त्यांनी याआधी विविध आघाड्यांवर सेवा केली. 22 वर्षांच्या सेवेनंतर 2022 मध्ये त्यांनी लष्करातून स्वेच्छानिवृत्ती घेतली. त्यानंतर ते दोन वेगवेगळ्या खासगी कंपन्यांत उच्च पदावर सेवेत होते. मात्र त्या नोकऱ्या सोडून त्यांनी संयुक्त राष्ट्र सरचिटणीसांतर्गत यूएनडीएसएस (UNDSS) मध्ये सेवा सुरू केली. त्यांचे पहिलेच पोस्टिंग गाझा पट्टीत राफा येथे होते. जागतिक संघटनेच्या कर्मचाऱ्याचा रफाहमध्ये मृत्यू झाल्याची ही पहिली घटना आहे.


वैभव काळे यांचा गाझा हल्ल्यात मृत्यू


7 ऑक्टोबरच्या दहशतवादी हल्ल्यानंतर इस्रायल-हमास संघर्षाच्या सुरुवातीपासून गाझामधील आंतरराष्ट्रीय UN कर्मचाऱ्याचा रफाहमध्ये मृत्यू झाल्याची ही पहिली घटना आहे.  कर्नल वैभव काळे हे नागपुरातील परांजपे हायस्कुल आणि भवन्स विद्या मंदिरचे माजी विद्यार्थी होते. जागतिक संघटनेने त्यांच्या अधिकृत एक्स मीडिया म्हणजेच आधीचं ट्विटर, या अकाऊंटवरुन वैभव काळे यांच्या मृत्यू बाबत माहिती दिली आहे.


@IndiaUNNewYork या एक्स मीडिया अकाऊंटवरुन केलेल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे की, 'गाझामध्ये संयुक्त राष्ट्र सुरक्षा आणि सुरक्षा विभागासाठी कार्यरत कर्नल वैभव काळे यांच्या निधनामुळे आम्हाला खूप दुःख झाले आहे. या कठीण काळात त्यांच्या कुटुंबासोबत आमच्या संवेदना आहेत.'






 


महत्त्वाच्या इतर बातम्या :