PM Narendra Modi Property : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसीतून तिसऱ्यांदा लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. पंतप्रधान आपला उमेदवारी अर्ज भरताना भाजपचे अनेक बडे नेते उपस्थित होते. यावेळी मोदींनी निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रकातून (Election Affidavit) त्यांच्या संपत्तीबाबत माहिती समोर आली आहे.
मोदींकडे 52 हजार रुपये रोख
पंतप्रधानांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्याकडे 52 हजार रुपये रोख आहेत. मोदींच्या नावे स्टेट बँकेत दोन खाती आहेत. यापैकी एक खाते गुजरातच्या गांधीनगरमध्ये आहे आणि दुसरे खाते वाराणसीच्या शिवाजी नगर शाखेत आहे. पंतप्रधान मोदींच्या गुजरात बँक खात्यात 73 हजार 304 रुपये आणि वाराणसीच्या खात्यात फक्त सात हजार रुपये आहेत. पीएम मोदींची एसबीआयमध्येच 2 कोटी 85 लाख 60 हजार 338 रुपयांची एफडी आहे.
पीएम मोदींकडे एकूण किती संपत्ती आहे?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेटमध्ये 9 लाख 12 हजार रुपयांची गुंतवणूक केली आहे. याशिवाय जंगम मालमत्तेमध्ये त्यांच्याकडे सोन्याच्या चार अंगठ्या आहेत, ज्यांचे एकूण वजन 45 ग्रॅम असून त्यांची किंमत 2 लाख 67 हजार 750 रुपये आहे. पंतप्रधान मोदींच्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांच्याकडे ना घर आहे ना जमीन. या स्थितीत त्यांची एकूण संपत्ती 3 कोटी 2 लाख 6 हजार 889 रुपये आहे.
पंतप्रधान मोदींचे शिक्षण कुठे?
निवडणूक प्रतिज्ञापत्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या शैक्षणिक पात्रतेचीही माहिती दिली आहे. त्यानुसार पीएम मोदींनी 1967 मध्ये गुजरात बोर्डातून शालेय शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर 1978 मध्ये त्यांनी दिल्ली विद्यापीठातून बॅचलर ऑफ आर्ट्स केले. पीएम मोदींनी 1983 मध्ये गुजरात विद्यापीठातून मास्टर्स ऑफ आर्ट्स केले.
वाराणसीतून उमेदवारी अर्ज दाखल केला
यावेळीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीसाठी उत्तर प्रदेशातील वाराणसीची निवड केली आहे. 2014 मध्ये ते पहिल्यांदा वाराणसीमधून खासदार म्हणून निवडून आले आणि त्यानंतर ते देशाचे पंतप्रधान झाले. 2019 मध्येही त्यांनी वाराणसीतून निवडणूक लढवली होती आणि 2024 च्या निवडणुकीच्या लढाईतही ते वाराणसीमधून उमेदवार आहेत. मंगळवारी त्यांनी वाराणसीतून उमेदवारी दाखल केली तेव्हा एनडीए आघाडीत समाविष्ट असलेल्या अनेक पक्षांचे दिग्गज आणि अनेक राज्यांचे मुख्यमंत्रीही त्यांच्यासोबत आले होते.
वाराणसी लोकसभा मतदारसंघासाठी 1 जून रोजी मतदान होणार असून 4 जून रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे.
ही बातमी वाचा: