Train Cancel : रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी, आज 117 गाड्या रद्द तर काही गाड्यांच्या वेळापत्रकातही बदल
आज (7 एप्रिल) रेल्वेने मोठ्या प्रमाणात गाड्या रद्द केल्या आहेत. रेल्वे गाड्या रद्द करण्याचे कारण म्हणजे सध्या अनेक ठिकाणी रेल्वेच्या रुळांच्या दुरुस्तीचे काम सुरु आहे.
Train Cancel : रेल्वे प्रवाशांच्या दृष्टीने महत्त्वाची बातमी आहे. आज (7 एप्रिल) रेल्वेने मोठ्या प्रमाणात गाड्या रद्द केल्या आहेत. रेल्वे गाड्या रद्द करण्याचे कारण म्हणजे सध्या अनेक ठिकाणी रेल्वे रुळांच्या दुरुस्तीचे काम सुरु आहे. त्यासाठी आज 117 रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. रेल्वे रुळांवरुन दररोज हजारो गाड्या धावतात. त्यामुळं वेळोवेळी रुळांच्या देखभालीची आवश्यकता असते. त्यामुळं आज देखभाल आणि रुळांची दुरुस्ती करण्यासाठी अनेक गाड्या रद्द कराव्या लागल्या आहेत.
रेल्वे ही भारतातील सर्वसामान्यांच्या जीवनाची जीवनवाहिनी मानली जाते. उन्हाळ्याच्या सुट्टीत किंवा कोणत्याही सणासुदीच्या काळात ट्रेनमध्ये खूप गर्दी असते. ही गर्दी टाळण्यासाठी, कोणत्याही प्रकारचा त्रास सहन करावा लागू नये म्हणून लोक आधीच काही महिने आरक्षण करतात. मात्र, शेवटच्या क्षणी गाडी रद्द झाल्यास अशा परिस्थितीत प्रवाशांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागतं. यासोबतच रेल्वेलाही मोठा आर्थिक फटका सहन करावा लागतो. तसेच अनेकवेळा वादळ किंवा खराब हवामान, पावसामुळे रेल्वे रुळांवर पाणी भरल्याने गाड्या रद्द कराव्या लागतात. यासोबतच कायदा आणि सुव्यवस्था नियंत्रित ठेवण्यासाठीही अनेकदा गाड्या रद्द केल्या जातात.
एकूण 137 गाड्या रद्द, 10 गाड्यांचे वेळापत्रकही बदललं
आज वेगवेगळ्या कारणांमुळं रेल्वेनं अनेक गाड्या रद्द केल्या आहेत. आज एकूण 137 गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. यामध्ये 117 पूर्णपणे रद्द करण्यात आल्या आहेत. तर 20 गाड्या अंशत: रद्द करण्यात आल्या आहेत. रद्द केलेल्या गाड्यांमध्ये बोकारो-आसनसोल (03591/03592), बालामौ-शहाजहानपूर (04305/04306), गोंडा-सीतापूर (05091/05092) या गाड्यांचा समावेश आहे. त्याचबरोबर एकूण 7 गाड्यांचे वेळापत्रकही बदलण्यात आले आहे. यामध्ये हातिया-आनंद विहार टर्मिनल, पुणे-भुवनेश्वर यासह एकूण 7 गाड्यांचे वेळापत्रक बदलण्यात आले आहे. त्याच वेळी, एकूण 10 गाड्या वळवण्यात आल्या आहेत. जर तुम्हाला रद्द झालेल्या, रिशेड्युल केलेल्या किंवा वळवलेल्या गाड्यांची यादी देखील तपासायची असेल, तर तुमच्याकडे स्मार्टफोन आणि इंटरनेट कनेक्शन असणे आवश्यक आहे.
रद्द झालेल्या गाड्यांची यादी कशी तपासायची:
रद्द केलेल्या, पुनर्निर्धारित किंवा वळवलेल्या गाड्यांची यादी तपासण्यासाठी सर्वप्रथम https://www.irctchelp.in/tomorrow-cancelled-train-list/ या वेबसाइटला भेट द्या. या साइटवर गाड्यांच्या संदर्भात पूर्ण माहिती दिली आहे.