(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Indira Gandhi | इंदिरा गांधी : केवळ चौदा दिवसांत पाकिस्तानचे दोन तुकडे करणारी 'आयर्न लेडी'!
Indira Gandhi Death Anniversary: पाकिस्तानला धडा शिकवायचा निश्चय केलेल्या इंदिरा गांधी एका संधीची वाट पाहत होत्या आणि पाकिस्तानने त्यांच्या चुकीने ती संधी दिली. अमेरिकेच्या धमक्यांना भीक न घालता इंदिरा गांधींनी धाडसी निर्णय घेत पाकिस्तानचे दोन तुकडे केले.
Indira Gandhi Death Anniversary: देशातील सर्वात शक्तिशाली आणि दृढ निश्चय असलेली व्यक्ती अशी ओळख असलेल्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची आज पुण्यतिथी. त्यांच्याच पंतप्रधानपदाच्या कार्यकालात 1971 साली पाकिस्तानचे दोन तुकडे झाले आणि बांग्लादेशची निर्मिती झाली होती. या ऐतिहासिक घटनेच्या शिल्पकार म्हणून इंदिरा गांधींना ओळखले जाते. 1971 साली एक संधी चालून आली आणि त्याचा फायदा घेऊन इंदिरा गांधींनी पाकिस्तानला धडा शिकवण्याचा निर्धार केला.
25 एप्रिल 1971 साली तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींनी एका बैठकीत भारताच्या लष्करप्रमुखांना आदेश दिला की पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी जर युध्द करावे लागले तरी ते करावे. पुढच्या परिणामांची काळजी करु नये. इंदिरा गांधींना हा असा आदेश द्यावा लागला होता कारण भारताच्या पूर्व भागातील पाकिस्तानमध्य़े, म्हणजे आताच्या बांग्लादेशमध्ये अशा काही घडामोडी घडत होत्या की त्याचा थेट परिणाम भारतावर होत होता.
पाकिस्तानच्या लष्कराचा हैदोस पाकिस्तानच्या सरकारवर आणि लष्करावर पश्चिम पाकिस्तानच्या लोकांचे वर्चस्व होते. त्यांची भाषाही उर्दू होती. तर पूर्व पाकिस्तानच्या म्हणजे आताच्या बांग्लादेशच्या लोकांची मातृभाषा ही बंगाली होती. त्यामुळे पश्चिम पाकिस्तानचे राजकारणी आणि लष्करी अधिकारी पूर्व पाकिस्तानच्या लोकांचा द्वेष करायचे. 1970-71 च्या निवडणूकीत पूर्व पाकिस्तानच्या बहुमताला डावलून पश्चिम पाकिस्तानच्या लोकांनी त्यांना सत्ता हस्तांतर करण्यास नकार दिला. यावर पूर्वच्या लोकांनी याविरोधात आवाज उठवायला सुरुवात केली. त्याचाच सूड म्हणून पाकिस्तानच्या सरकारने आणि त्यांच्या लष्कराने त्यांच्याच देशाचा भाग असलेल्या पूर्व पाकिस्तानच्या लोकांवर कारवाई करण्यास प्रारंभ केला. पाकिस्तान लष्कराने या भागात आपल्याच लोकांविरोधात हिंसा सुरु केली. अनेक सामान्यांची हत्या केली. हे सर्व सुरु होते कारण त्या पूर्व पाकिस्तानच्या लोकांनी लष्कराच्या अन्यायाच्या विरोधात आवाज उठवला होता. या लोकांचा आवाज दाबण्यासाठी लष्कराने हिंसेचा वापर केला. बघता बघचा प्रचंड नरसंहार सुरु झाला. महिलांवर बलात्कार झाले, अनेक बालकांची हत्या झाली.
पाकिस्तानच्या लष्कराच्या या अन्यायापासून वाचण्यासाठी त्या लोकांनी भारताच्या सीमेलगतच्या राज्यांत आश्रय घ्यायाला सुरु केली. भारतात येणाऱ्या शरणार्थ्यांची ही संख्या वेगाने वाढू लागली. भारतीय पंतप्रधान या नात्याने इंदिरा गांधी यांच्यावर शरणार्थ्य़ांच्या या प्रश्नावर काहीतरी पावले उचलावेत यासाठी दबाब वाढत होता. परिस्थिती भान लक्षात घेऊन इंदिरा गांधींनी एका बाजूला लष्कराला तयार रहायला सांगितले आणि दुसऱ्या बाजूने पाकिस्तानवर आंतरराष्ट्रीय दबाब टाकायला सुरु केली.
National Unity Day: 'सरदार पटेल राष्ट्रीय एकता, अखंडतेचे अग्रदूत', पंतप्रधान मोदींकडून अभिवादन
इंदिरा गांधींचे आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रयत्न या प्रश्नावर अमेरिकेच्या राष्ट्रीय सल्लागार हेनरी किसिंजर यांच्यासोबत झालेल्या बैठकीत इंदिरा गांधींनी त्यांना ठामपणे सांगितले की जर अमेरिकेने पाकिस्तानला आवरले नाही तर भारताला नाईलाजाने कारवाई करावी लागेल. पूर्व पाकिस्तानचा प्रश्न ही पाकिस्तानची अंतर्गत गोष्ट आहे असे पाकिस्तान सातत्याने सांगत होते. पण इंदिरा गांधींनी साफ केले की हा प्रश्न पाकिस्तानचा अंतर्गत प्रश्न नाही. यामुळे भारतातील अनेक राज्यांची शांतता भंग होतेय.
इंदिरा गांधींनी एका बाजूने पाकिस्तानची डिप्लोमॅटिक स्तरावर नाकाबंदी करायला सुरुवात केली तर दुसऱ्या बाजूने जगभरात भारताच्या बाजूने मतप्रवाह कसा तयार होईल याची काळजी घेतली. पाकिस्तानच्या प्रश्नावरुन अमेरिकेची नरमाईची भूमिका लक्षात घेता इंदिरा गांधींनी 9 ऑगस्ट 1971 साली सोव्हिएत युनियनसोबत एक सुरक्षा करार केला. या करारात असे ठरवण्यात आले की भारत किंवा रशिया या दोन देशांपैकी कोणावरही एखाद्या तिसऱ्या देशाने आक्रमण केले तर त्याविरोधात हे दोन्ही देशांनी मिळून कारवाई करतील.
मुक्ती वाहिनीचा जन्म पूर्व पाकिस्तानची हालत दिवसेंदिवस बिघडत चालली होती. तिथे पोलीस, पॅरामिलीटरी फोर्स, ईस्ट बंगाल रेजिमेंट आणि पाकिस्तान रायफल्सच्या सैनिकांनी पाकिस्तानच्या लष्कराच्या विरोधात उठाव केला आणि स्वत:ला स्वातंत्र्य घोषित केले. या लोकांना भारताच्या मदतीची अपेक्षा होती. भारतीय लष्कराकडून या लोकांना आणि शरणार्थींना लष्करी प्रशिक्षण द्यायला सुरु झाले आणि यातूनच मुक्ती वाहिनी सेनेचा जन्म झाला.
चीन आणि अमेरिकेच्या पाठिंब्यावर पाकिस्तान भारताला सातत्याने आव्हान देण्याची भाषा करु लागला होता. नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात पाकिस्तानचे हवाई दलातील विमाने सातत्याने भारतीय सीमेवर घिरट्या घालू लागली. यावर भारताने पाकिस्तानला चेतावणी दिली. पण याचा पाकिस्तानवर कोणताही परिणाम झाला नाही. उलटे पाकिस्तानचे राष्ट्रपती याह्या खान यांनी भारताला 10 दिवसाच्या आत युध्द करण्याची धमकी दिली. यावेळी पाकिस्तानला ठाऊक नव्हते की इंदिरा गांधी अशाच संधीची वाट बघत आहेत.
डॉ होमी जहांगीर भाभा जयंती | भारताचा अणुऊर्जा कार्यक्रम आणि 'न्युक्लिअर पॉवर'चे जनक
युध्दाची घोषणा आणि ऑपरेशन ट्रायडंट इंदिरा गांधींचा निश्चय पक्का होता. प्रश्न हा होता कि पहिला हल्ला कोण करणार. पाकिस्तानला भारताच्या तयारीचा अंदाज नव्हता. 3 डिसेंबर 1971 रोजी पाकिस्तानच्या काही लष्करी विमानांनी भारतीय शहरांवर बॉम्ब हल्ला सुरु केला आणि हिच त्यांची मोठी चूक ठरली. या बातमीची माहिती मिळताच इंदिरा गांधी तडक मॅप रुममध्ये गेल्या. त्यांना लष्करातील अधिकाऱ्यांनी नेमक्या परिस्थितीचा अंदाज दिला. त्यावेळी रात्रीचे 11 वाजले होते. सेनाच्या काही अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर इंदिरा गांधींनी कॅबिनेटची बैठक घेतली आणि त्यानंतर विरोधी पक्षाच्या नेत्यांना भेटून घडलेल्या घटनेची संपूर्ण माहिती दिली. या सर्व वेगवान घडामोडीनंतर इंदिरा गांधीनी त्या रात्रीच ऑल इंडिया रेडियोवरुन देशाला संबोधित केले.
इंदिरा गांधींनी भारतीय लष्कराला ढाकाकडे कूच करण्याचा आदेश दिला. त्याचवेळी भारतीय हवाई दलाने पश्चिम पाकिस्तानच्या महत्वाच्या ठिकांणावर बॉम्बचा वर्षाव सुरु केला. भारताच्या तिनही दलाने पाकिस्तानची मोठी नाकाबंदी केली. पाकिस्तानने केलेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने 4 डिसेंबर 1971 रोजी ऑपरेशन ट्रायडंट सुरु केले होते. भारतीय नौसेनेने बंगालच्या खाडीत आणि अरबी समुद्रात पाकिस्तानविरोधात मोर्चा उघडला होता. 5 डिसेंबरला भारतीय नौसेनेने पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ला करुन त्यांच्या नौसेनेच्या मुख्यालयाचे त्याचे प्रचंड नुकसान केले. आता पाकिस्तान भारताच्या जाळ्यात पूर्णपणे अडकला होता. या गोष्टीचा फायदा घेऊन इंदिरा गांधींनी बांग्लादेशच्या निर्मितीला मान्यता देण्याची घोषणा केली.
याचा अर्थ असा होता की पूर्व पाकिस्तान हा आता पाकिस्तानचा हिस्सा राहिला नसून तो आता स्वतंत्र झाला आहे. भारताने युध्दातील विजयापूर्वीच ही घोषणा केली होती कारण युध्दविरामानंतर हा मुद्दा संयुक्त राष्ट्रात अडकून राहू नये. दुसऱ्या बाजूला पाकिस्तानच्या मदतीला तिकडे अमेरिकेने त्यांच्या नौसेनेचे सर्वात बलाढ्य सातवे आरमार बंगालच्या खाडीकडे पाठवले होते. याचा मुकाबला करण्यासाठी भारत-रशिया करारांतर्गत रशियाने त्यांची नौसेना हिंदी महासागराकडे पाठवण्याचा निर्णय घेतला. अशाप्रकारे दोन महासत्ता अप्रत्यक्षपणे एकमेकांसमोर आल्या होत्या.
People's President डॉ.अब्दुल कलाम: पोखरणचा हिरो आणि खऱ्या अर्थाने 'फकीर'
Dr Kalam Jayanti : नावाड्याचा मुलगा ते वैज्ञानिक अन् देशाचे राष्ट्रपती, डॉ. अब्दुल कलामांचा प्रेरणादायी प्रवास
युध्दबंदी नाही आत्मसमर्पण करा, भारताचा आदेश अमेरिकेचे आरमार बंगालच्या खाडीत पोहचायच्या आधीच इंदिरा गांधींच्या आदेशाने लष्कर प्रमुख सॅम मानेकशॉ यांनी पाकिस्तानच्या लष्कराला आत्मसमर्पण करण्याचे आवाहन केले. पाकिस्तानसमोर कोणताही पर्याय उरला नव्हता.
पूर्व पाकिस्तानमध्य़े पाकिस्तानचे कमांडर ए.ए.के. नियाजी यांनी चीन आणि अमेरिकेच्या जीवावर आत्मसमर्पण करण्यास नकार दिला. पण तोपर्यंत भारतीय सेनेने ढाक्याला घेराव घातला होता. 14 डिसेंबरला भारतीय सेनेने ढाक्यातील गव्हर्नरच्या बंगल्यावर हल्ला केला. त्यावेळी तिथे गुप्त बैठकीसाठी पाकिस्तानच्या लष्कराचे अनेकल उच्च पदस्थ अधिकारी उपस्थित होते. या घटनेने पाकिस्तानच्या लष्कराचा आत्मविश्वास डळमळीत झाला. जनरल नियाजींनी लागोलाग भारतीय लष्कराकडे युध्दविरामाचा प्रस्ताव पाठवला. पण भारतीय लष्करप्रमुख सॅम मानेकशॉ यांनी आता युध्दविराम नाही तर आत्मसमर्पण करा असा आदेश पाकिस्तानला दिला.
आत्मसमर्पणाची जबाबदारी मेजर जेकब यांच्यावर सोपवली होती. त्यानंतर पूर्व कमांडचे प्रमुख लेफ्टनंट जनरल मेजर जगजितसिंह अरोरा ढाक्यात पोहचले. अरोरा आणि नियाजी यांच्यात 16 डिसेंबरला दुपारी 2.30 वाजता आत्मसमर्पणाची प्रक्रिया सुरु झाली.
पाकिस्तानचे लष्कर कमांडर नियाजींनी आत्मसमर्पणाच्या कागदावर सही केली आणि नंतर आपले लष्करी बिल्ले उतरवले. आत्मसमर्पणाच्या नियमांनुसार नियाजींनी त्यांचे रिव्ह़ॉल्वर अरोरांना दिले. पाकिस्तानच्या आत्मसमर्पणानंतर इंदिरा गांधींनी त्याची घोषणा केली. भारताने केवळ 14 दिवसात पाकिस्तानला गुडघ्यांवर आणले आणि अशा प्रकारे आपल्या धडाडीचा अनुभव जगाला दाखवत इंदिरा गांधींनी पाकिस्तानचे दोन तुकडे केले.