Russia Ukraine Crisis : गेल्या पाच दिवसांपासून रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे. रशियाकडून होत असलेल्या सततच्या हल्ल्यामुळे युक्रेनमधील परिस्थिती अत्यंत बिटक झाली आहे. हजारो भारतीय नागरिक युक्रेनमध्ये अडकले आहेत. आतापर्यंत सहा विमाने भारतीयांना घेऊन मायदेशी परतली आहेत. परंतु, अद्यापही अजून अनेक भारतीय युक्रेनमध्ये अडकले आहेत. दोन्ही देशांमध्ये युद्ध सुरू असतानाच युक्रेनमधील भारतीयांना दिलासा मिळाला आहे. युक्रेनमधील भारतीयांना व्हिसाशिवाय पोलंडची सीमा पार करता येणार आहे. भारतातील पोलंडच्या राजदूतांनी याबाबतची माहिती दिली आहे.  






युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना पोलंड, हंगेरी आणि रोमानियामध्ये रस्त्याने आणले जात आहे आणि तेथून त्यांना भारतात पाठवले जात आहे. त्यामुळे युक्रेनमधून पोलंडमध्ये प्रवेश करणाऱ्या भारतीयांना आता व्हिसाची आवश्यकता भासणार नाही. याबाबत माहिती देताना भारतातील पोलंडचे राजदूत अॅडम बुराकोव्स्की म्हणाले, भारतीय विद्यार्थ्यांसह सुमारे दोन लाख लोक सीमा ओलांडून पोलंडमध्ये गेले आहेत. सीमेवर खूप गर्दी आहे पण आम्ही सर्वांचे स्वागत करत आहोत.


राजदूत अॅडम बुराकोव्स्की म्हणाले, भारतीय विद्यार्थ्यांसाठी विशेष विमाने असतील. शिवाय पोलंड भारताला संपूर्ण मदत करत आहे. व्हिसाशिवाय या विद्यार्थ्यांना युक्रेनमधून पोलंडमध्ये येता येणार आहे. आम्ही युक्रेनचे समर्थन करत असून युक्रेनला मदत करण्यासह त्यांना शस्त्रांचा पुरवठा देखील करणार आहोत. संपूर्ण युरोपियन युनियनचे हवाई क्षेत्र खासगी विमानांसह रशियन विमानांसाठी बंद आहे. जपान, अमेरिका आणि इतर देशांनी रशियावर निर्बंध घातले आहेत.


दरम्यान, रशिया आणि युक्रेनमधील युद्धाचा आज पाचवा दिवस आहे. दोन्ही देशांमधील युद्ध थांबणार की नाही? याचा निर्णय आज होण्याची शक्यता आहे. आज बेलारूसमध्ये रशिया-युक्रेन यांच्यात चर्चा होणार आहे. दोन्ही देशांची शिष्टमंडळं बेलारूसमध्ये पोहोचली असून चर्चा सुरू आहे. 


महत्वाच्या बातम्या