Amul Milk Price Hike: अमूल ब्रँडनं आपल्या दुधाच्या किंमतीत दोन रुपये प्रतिलिटरनं वाढ केलीय. उद्यापासून 1 मार्चपासून ही दरवाढ लागू होणार आहे. अमूलनं लागू केलेल्या ताज्या दरानुसार, अहमदाबाद आणि सौराष्ट्राच्या बाजारात येत्या 1 मार्चपासून अमूल गोल्ड दूधाची किंमत 30 रुपये अर्धा लीटर, अमूल ताजा 48 रुपये अर्धा लीटर आणि अमूल शक्ती 27 रुपये अर्धा लीटर दरानं विकलं जाणार आहे. अमूल दुधाच्या किंमतीत वाढ झाल्यानं गृहिणींचे बजेट कोलमडलंय. 


एका वर्षात दुसऱ्यांदा दरवाढ
गुजरात सहकारी दूध विपणन संघानं एका वर्षाच्या आत दुधाच्या किंमतीत वाढ केलीय. ही दरवाढ अमूल सोना, अमूल ताजा, अमूल शक्ती, अमूल टी-स्पेशल तसेच गाय आणि म्हशीच्या दुधासह अमूल दुधाच्या सर्व ब्रँडवर लागू होईल. अमूलनं सात महिने 27 दिवसांच्या आत दुधाच्या दरात पुन्हा वाढ केलीय. कच्चा मालाच्या खर्चात वाढ झाल्यानं अमूलनं हा निर्णय घेतलाय. अमूलनं जुलै 2021 मध्ये दुधाच्या किंमती वाढवल्या होत्या. वाढत्या महागाईमध्ये अमूल दुधाच्या किंमतीत वाढ झाल्यानं जनतेच्या खिशावर थेट परिणाम झालाय.


दुग्धजन्य पदार्थाच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता
उन्हाळा सुरु झाला की दुधाची मागणी वाढते. दुग्धजन्य पदार्थ तयार करण्यासाठी लोक मोठ्या प्रमाणात दुधाची खरेदी करत आहेत. दुधापासून आईसक्रीम, दही, ताक, लोणी, तूप आदी पदार्थ तयार केले जातात. परंतु, दूध दरवाढीमुळं या पदार्थांच्या किंमतीतही वाढ होण्याची शक्यता आहे.


हे देखील वाचा-



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha