राजनाथ सिंह आणि चीनच्या संरक्षणमंत्र्यांमध्ये बैठक; सीमा तणाव कमी करण्यासंदर्भात चर्चा
पूर्व लडाखमध्ये अनेक ठिकाणी भारत आणि चिनी सैनिकांमध्ये चार महिन्यांपासून तणावपूर्ण परिस्थिती आहे. पाच दिवसांआधी चीनने पँगाँग तलावाच्या दक्षिण किनाऱ्याजवळ भारतीय क्षेत्रावर कब्जा करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला होता.
मॉस्को : सध्या भारत आणि चीन यांच्यात तणाव सुरु आहे. अशातच पूर्व लडाख सीमेवर निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि चीनचे रक्षामंत्री वेई फेंगही यांच्यात शुक्रवारी रात्री मॉस्कोमध्ये बैठक पार पडली. या बैठकीत पूर्व लडाखमधील तणाव कमी करण्याच्या दृष्टीने चर्चा करण्यात आली. पूर्व लडाखमध्ये ज्या ठिकाणी संघर्ष निर्णाण झाला होता, त्या ठिकाणी आधी होती तशी परिस्थिती निर्माण करा, तसेच सैन्य मागे घ्या, असं राजनाथ सिंह यांनी स्पष्ट केलं.
राजनाथ सिंह यांच्या कार्यालयाने ट्वीट करत माहिती दिली की, 'संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि चिनी संरक्षण मंत्री जनरल वेई फेंगही यांच्यातील मॉस्कोमधील बैठक संपली आहे. ही बैठक दोन तास 20 मिनिटं सुरु होती.' रशियाची राजधानी असलेल्या मॉस्कोमधील एका नामांकित हॉटेलमध्ये भारतीय वेळेनुसार साधारण साडेनऊ वाजण्याच्या सुमारास ही बैठक सुरु झाली. भारताकडून संरक्षण सचिव अजय कुमार आणि रशियातील भारताचे राजदूत डी. बी. व्यंकटेश वर्मा सुद्धा या बैठकीत सहभागी झाले होते.
सीमा तणावर संपवण्याच्या दृष्टीने भर
मीडिया रिपोर्ट्सनुसार, चीनच्या सैन्याने पँगाँग तलावाच्या दक्षिणेकडे चीनने एकतर्फी नियंत्रण रेषा बदलण्याचा प्रयत्न केला होता. त्याला काल झालेल्या बैठकीत भारतीय प्रतिनिधींनी तीव्र आक्षेप नोंदविला. या बैठकीत दोन्ही नेत्यांमध्ये दीर्घकाळ सुरु असलेल्या भारत-चीन सीमावादावर तोडगा काढण्याचे काय मार्ग आहेत, यावर प्रामुख्याने चर्चा झाली. यावेळी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितले की, पूर्व लडाख क्षेत्रात शांतता आणि सुरक्षेसाठी विश्वासाचं वातावरण, अनाक्रमण, एकमेकांबाबत संवेदनशीलता, मतभेदांचे शांततामय निराकरण या गोष्टी प्रादेशिक शांतता व स्थिरतेसाठी गरजेच्या आहेत.
पाहा व्हिडीओ : 'भारतीय सैन्यानं तयारीत राहायला हवं', CDS जनरल बिपिन रावत यांचं सूचक विधान
दरम्यान, पूर्व लडाखमध्ये अनेक ठिकाणी भारत आणि चिनी सैनिकांमध्ये चार महिन्यांपासून तणावपूर्ण परिस्थिती आहे. पाच दिवसांआधी चीनने पँगाँग तलावाच्या दक्षिण किनाऱ्याजवळ भारतीय क्षेत्रावर कब्जा करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला होता. त्यानंतर दोन्ही देशांतील तणाव आणखी वाढला.
मे महिन्यात पूर्व लडाखमध्ये भारत आणि चीन यांच्या उद्भवलेल्या सीमावादानंतर दोन्ही देशांमध्ये पहिल्यांदाच समोरा-समोर ही उच्चस्तरीय बैठक पार पडली. याआधी विदेश मंत्री एस जयशंकर आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोबाल यांनी तणाव कमी करण्यासाठी चिनी विदेश मंत्री वांग यी यांच्यासोबत फोनवरुन चर्चा झाली होती. आता विदेश मंत्री एस जयशंकरही पुढिल आठवड्यात एससीओच्या विदेश मंत्र्यांसोबतच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी रशियाला जाऊ शकतात.
महत्त्वाच्या बातम्या :