नवी दिल्ली : भारत-चीन सीमेवरील झटापटीत शहीद झालेल्या जवानांचं बलिदान व्यर्थ होऊ देणार नाही, असं आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलं. तसंच आम्हाला डिवचलं तर आम्हीही जशास तसं उत्तर देण्यासाठी सक्षम असल्याचं पंतप्रधानांनी ठणकावलं. कोरोना परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी आणि 15 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची आज व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक होत आहे. ही बैठक सुरु होण्यापूर्वी पंतप्रधानांनी गलवान खोऱ्यात झालेल्या हिंसक झटापटीवर पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली. तसंच सर्व शहीद जवानांना दोन मिनिटं मौन बाळगून आदरांजली वाहिली.


पंतप्रधान म्हणाले की, "आम्ही कायमच आमच्या शेजारील देशांसोबत सहकार्याची भावना ठेवली. त्यांच्या भल्यासाठी प्राथर्ना केली. आम्ही कधीच कोणत्या देशाला डिवचण्याचा प्रयत्न केला नाही. मतभेद कधीच वाद होऊ दिले नाहीत. भारताला शांतता हवी आहे. पण आम्हाला डिवचलं तर आम्ही देखील जशास तसं उत्तर देण्यास सक्षम आहोत. भारत-चीन सीमेवरील झटापटीत शहीद झालेल्या जवानांचं बलिदान व्यर्थ होऊ देणार नाही."


"जेव्हा कधी  संकटं आली आहेत, तेव्हा देशाची अखंडता आणि सार्वभौमत्वाच्या रक्षणासाठी आपल्या शक्तीचं प्रदर्शन केलं आहे. त्याग आणि तितिक्षा आमच्या राजकीय चरित्राचा वाटा आहे. विक्रम आणि वीरताही देशाच्या चरित्राचा वाटा आहे. देशाला विश्वास देऊ इच्छितो की, आपल्या जवानांचं बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही. आमच्यासाठी भारताची अखंडता आणि सार्वभौमत्व सर्वोच्च आहे. त्याच्या रक्षणासाठी आम्हाला कुणीही थांबवू शकत नाही. याबाबत कुणाच्या मनातही जरासाही भ्रम किंवा संशय असायला नको. भारताला शांतता हवी आहे. पण भारताला डिवचल्यावर कोणत्याही परिस्थितीत उत्तर देण्यासाठी भारत सक्षम आहे. आमच्या शहीद वीर जवानांचा देशाला अभिमान आहे. शत्रूला मारता मारता जवान शहीद झाले," असं पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले.


India-China Border Dispute | पंतप्रधान गप्प का? ते काय लपवत आहेत?, राहुल गांधींचे सवाल


भारत-चीन सीमेवर हिंसक झडप
भारत-चीन सीमेवर गलवान खोऱ्यात डी एक्स्लेशन प्रक्रियेदरम्यान झालेल्या दोन्ही सैन्यांमध्ये झालेल्या हिंसक झडपेत 20 भारतीय जवान शहीद झाले आहेत. भारतीय लष्कराने ही माहिती दिली आहे. 15 जूनच्या रात्री गलवान खोऱ्यात ही हिंसक झडप झाली होती. सुरुवातीला तीन जवान शहीद झाल्याची माहिती समोर आली होती. एएनआयने दिलेल्या माहितीनुसार चीनचेही 43 जवान मारले गेले किंवा जखमी झाले आहेत.


भारत-चीन वाद नेमका काय आहे?
लडाखमधल्या गैलवान पर्वताजवळच्या प्रदेशात सैन्याच्या जमवाजमवीवरुन हा वाद सुरु झाला. त्याची झळ नंतर लडाखच्या पँगाँग तलावापर्यंत पोहोचली. या तलावाच्या आसपास असलेल्या डोंगररांगामध्ये दोन्ही देशांचे फिंगर एरिया ठरलेले आहेत. पण एकमेकांच्या फिंगर एरियात अतिक्रमण केल्याने वाद पेटला. याआधी भारत-चीनचे 250 जवान एकमेकांसमोर उभे ठाकले, दगडफेक आणि मारामारीत काही जण जखमीही झाले होते.


संबंधित बातम्या




India-China Border Tension गलवान खोऱ्यात 20 भारतीय जवानांना वीरमरण, भारताच्या प्रत्युत्तरात चीनचे 43 सैनिक मारले गेल्याची माहिती