नवी दिल्ली : भारत-चीन सीमेवर गलवान खोऱ्यात दोन्ही सैन्यांमध्ये झालेल्या हिंसक झडपेत 20 भारतीय जवान शहीद झाले आहेत. भारतीय लष्कराने याबाबत माहिती दिली आहे. विशेष म्हणजे या झडपेत एकही गोळी चालली नाही. मात्र या रक्तरंजित संघर्षात आपल्या 20 जवानांना वीरमरण आलं आहे. लाईन ऑफ अॅक्चुअल कंट्रोलची स्थिती चीन बदलण्याचा प्रयत्न करत होता, यातून हा सगळा संघर्ष झाला, अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाने दिली.


सोमवारी (15 जून) रात्री नेमकं काय घडलं?


भारत आणि चीनमध्ये 6 जून रोजी मेजर जनरल रँक लेव्हलची चर्चा झाली होती. यामध्ये सीमेवर शांतता प्रस्थापित करण्यावर सहमती झाली होती. 6 जूनच्या चर्चेनुसार चीनच्या सैनिकांना त्यांच्या सीमेत आणखी मागे जाण्यास सांगण्यात आलं होतं. मात्र शांततेत चर्चा करण्याऐवजी चीनने वाद घालण्यास सुरुवात केली.


त्यानंतर भारतीय सैनिक आणि चीनच्या सैनिकांमध्ये हिंसक झडप झाली. घटनास्थळी भारतीय जवानांची संख्या चीनच्या सैनिकांच्या तुलनेने कमी होती. यावेळी चीनच्या सैनिकांनी भारतीय जवानांवर लाठ्याकाठ्या, दगड आणि टोकदार हत्यारांना भ्याड हल्ला चढवला. या हल्ल्यात 20 जवान जखमी झाले होते. त्यानंतर आज सकाळी भारतीय लष्कराने एका अधिकाऱ्यासह तीन जवान शहीद झाल्याची माहिती दिली होती. यामध्ये कर्नल संतोष बाबू, हवालदार पालानी आणि कुंदन झा यांचा समावेश होता.


सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गलवान खोऱ्यात पेट्रोलिंग पॉईंट 14 जवळ दोन्ही सैन्यात बातचित सुरु होती. चीनी सैनिकांच्या हल्यानंतर भारतीय सैनिकांनीही प्रत्युत्तर देत हल्ला चढवला. यामध्ये चीनचे 43 सैनिक मारले गेले किंवा जखमी झाल्याची माहिती एएनआय वृत्तसंस्थेने दिली आहे. मात्र चीनकडून याबाबत कोणतीही अधिकृत माहिती आलेली नाही.





सूत्रांच्या माहितीनुसार, रात्रीच्या अंधारात जवळपास 3 तास ही हिंसक झपड सुरु होती. चीनच्या या हल्ल्यानंतर भारतीय जवानांना परत आणण्यात आलं. मात्र 20 पैकी 17 जवान गंभीर जखमी होते. तीन जवानांच्या वीरमरणांची माहिती सकाळी मिळाली होती. मात्र इतर 17 जखमी जवानही नंतर शहीद झाले.


संबंधित बातम्या




India-China Border Tension | भारत-चीन झटापटीत 20 भारतीय जवानांना वीरमरण, गलवान खोऱ्यात झटापट