नवी दिल्ली : चीनी ड्रॅगनच्या लष्करी साहसवादानं पुन्हा डोकं वर काढलंय. भारत आणि चीनमध्ये तब्बल पाच दशकानंतर हिंसक झटापट होऊन जवान शहीद होण्याची वेळ आलीय. ही घटना इतकी गंभीर आहे की याचे दीर्घकालीन परिणाम पुढचे काही दिवस जाणवू शकतात.


भारत आणि चीन सैनिकांमध्ये नेमकं काय घटलं?


गेल्या महिनाभरापासून भारत आणि चीनमध्ये जो सीमावाद धुमसत होता, त्याचा अखेर भडका उडाला. काल रात्री पूर्व लडाखमधल्या गॅलवान खोऱ्यात दोन्ही बाजूंमध्ये हिंसक झटापट झाली. त्यात भारतीय लष्कराच्या एका कमांडिंग ऑफिसरसह दोन जवान शहीद झाले आहेत. दोन्ही बाजूंनी गोळीबार मात्र झाला नाही, असं लष्कराकडून सांगितलं गेलं आहे.


भारत चीन सीमेवर अशी हिंसक झडप होऊन जवान मृत्यमुखी होण्याची घटना याआधी 1975 मध्ये घडली होती. म्हणजे तब्बल 45 वर्षानंतर पुन्हा भारत चीनची सीमा रक्तरंजित झालीय. त्यामुळे भारत आणि चीनमध्ये सगळं काही आलबेल नाही, तणाव वाढत चाललाय हेच यातून अधोरेखित होतंय. चीनचीही मनुष्यहानी झालीय की नाही हे भारतीय लष्कराच्या वक्तव्यातून स्पष्ट होत नव्हतं. पण चीनच्या ग्लोबल टाईम्स सरकारी मुखपत्रानेच ही बाब कबूल केलीय. चीनचेही काही जवान शहीद झाल्याचं त्यांनी म्हटलं आहे. पण आकडा किती हे मात्र गुलदस्त्यात आहे.


या सगळ्या घटनेनंतर चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचंही वक्तव्य आलं. पण ते सरळसरळ भारतालाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करणारं होतं. त्यांनी दावा केला की भारतीय सैन्यानं लाईन ऑफ अँक्च्युअल कंट्रोलचं उल्लंघन केलं. त्यामुळेच आम्ही प्रत्युत्तर दिलं. पण भारताने मात्र हा दावा स्पष्टपणे फेटाळला. सीमा ओलांडली नसल्याचं भारताकडून सांगितलं गेलं आहे.


घटना रात्रीची असली तरी त्यावर सरकारी शिक्कामोर्तब आज सकाळी झालं. त्यानंतर राजधानी दिल्लीत वेगवान बैठकांचा सिलसिला सुरु होता. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी आधी चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपीन रावत, लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे, परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांच्यासोबत बैठक घेतली. तासाभराच्या चर्चेनंतर त्यांनी पंतप्रधान मोदींनाही ताज्या स्थितीची माहिती दिली. त्यामुळे आता पुढची स्थिती भारत कशी हाताळणार, नेमकी कशा पद्धतीची वक्तव्यं केली जाणार याची उत्सुकता आहे.


नेमका काय वाद आहे?



लडाखमधल्या गैलवान पर्वताजवळच्या प्रदेशात सैन्याच्या जमवाजमवीवरुन हा वाद सुरु झाला. त्याची झळ नंतर लडाखच्या पँगाँग तलावापर्यंत पोहचली. या तलावाच्या आसपास असलेल्या डोंगररांगामध्ये दोन्ही देशांचे फिंगर एरिया ठरलेले आहेत. पण एकमेकांच्या फिंगर एरियात अतिक्रमण केल्यानं वाद पेटला. याआधी भारत-चीनचे 250 जवान एकमेकांसमोर उभे ठाकले, दगडफेक आणि मारामारीत काही जण जखमीही झाले होते.


चीनचीच उत्पत्ती असलेल्या कोरोना संकटाशी सध्या भारतासह सारं जग झुंज देतंय. त्यात आता सीमेवरची डोकेदुखीही वाढलीय. एकाचवेळी आपल्या तीन शेजाऱ्यांसोबत आपली सीमेवरची भांडणं सुरु आहेत. पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन सुरुच आहे, शिवाय दूतावासातल्या भारतीय अधिकाऱ्यांचाही छळ सुरु असल्यानं संबंध ताणले गेलेत. नेपाळनं तर आपल्या नकाशात बदल करुन काही भारतीय भाग आपले असल्याचा दावा केलाय..आणि आता तब्बल 45 वर्षांनी भारत चीनची सीमाही रक्तरंजित होताना दिसतेय. कोरोनासारखं प्राणघातक संकट असताना आपले सगळेच शेजारी अशांत असणं हे धोरणात्मकदृष्ट्या भारताला परवडणारं नाही.



India - China Border Dispute | चीनचेही काही जवान मारले गेले, ग्लोबल टाईम्सची माहिती