नवी दिल्ली : देशात एकीकडे लसीकरणाच्या कार्यक्रमाने 73 कोटींचा टप्पा ओलांडला असला तरी दुसरीकडे कोरोनाची रुग्णसंख्या काही केल्या कमी येत नसल्याचं दिसून येतंय. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासात देशात 33 हजार 376 नव्या रुग्णांची भर पडली आहे तर 308 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. गेल्या 24 तासात एकूण 32 हजार 198 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. त्या आधीचा विचार करता गुरुवारी देशात 34 हजार 976 नव्या रुग्णांची भर पडली होती तर 260 जणांचा मृत्यू झाला होता.
केरळमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताना दिसत नाही. गेल्या 24 तासात वाढलेल्या रुग्णसंख्येमध्ये सर्वाधिक रुग्णसंख्येची नोंद ही केरळमध्ये झाली आहे. काल एकाच दिवसात केरळमध्ये 25 हजार 10 नवीन रुग्णांची भर पडली तर 177 लोकांचा मृत्यू झाला आहे.
देशातील कोरोनाची सद्यस्थिती :
- कोरोना रुग्णांची एकूण संख्या : तीन कोटी 32 लाख 08 हजार 330
- एकूण कोरोनामुक्त रुग्ण : तीन कोटी 23 लाख 74 हजार 497
- सक्रिय रुग्णांची एकूण संख्या : तीन लाख 91 हजार 516
- एकूण मृत्यू : चार लाख 42 हजार 317
- एकूण लसीकरण : 73 कोटी 05 लाख 89 हजार 688 लसीचे डोस
राज्यात पुण्यात सर्वाधिक अॅक्टिव्ह रुग्णसंख्या
राज्यात शुक्रवारी 4,154 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 4 हजार 524 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 64 लाख 91 हजार 179 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97. 05 टक्के आहे. गुरुवारी 44 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली असून राज्याचा एकूण मृत्यूदर 2.12 टक्के इतका झाला आहे.
भारतात 73 कोटी लोकांचे लसीकरण
भारतातील लसीकरणाच्या कार्यक्रमाने चांगलाच वेग घेतला असून 73 कोटी डोसचा टप्पा ओलांडला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शुक्रवारी संध्याकाळी याबाबतची आकडेवारी जारी केली. त्यामध्ये सांगिलं आहे की, देशातील 55.58 कोटी नागरिकांना लसीचा पहिला डोस आणि 17.38 कोटी नागरिकांना लसीचा दुसरा डोस देण्यात आला आहे. देशातील 18 टक्के नागरिकांना कोरोना लसीचे दोन्ही डोस देण्यात आले आहेत.
Corona Vaccination : हिमाचल पाठोपाठ गोव्यातही 100 टक्के लसीकरण, देशात 73 कोटी डोस वितरित