वॉशिग्टन : ज्या लोकांना कोरोना लसीचे दोन्ही डोस प्राप्त झाले आहेत त्यांच्या कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूची शक्यता 11 पटींनी कमी होते आणि रुग्णालयात भरती होण्याची शक्यताही 10 पटींनी कमी होते असं अमेरिकेच्या आरोग्य विभागाने आपल्या एका अहवालात सांगितलं आहे. 


यूएस सेंटर फॉर डिसीज कन्ट्रोल अॅन्ड प्रिव्हेंशन (US Centers for Disease Control and Prevention) च्या वतीने कोरोना लसीकरणासंबंधी तीन अहवाल प्रकाशित करण्यात आले आहेत. त्यामधील एका अहवालात असं सांगण्यात आलं आहे की, ज्या लोकांना अद्याप कोरोनाचे दोन्ही डोस मिळाले नाहीत त्यांच्या तुलनेत कोरोनाचे दोन्ही डोस घेतलेले लोक हे अधिक सुरक्षित आहेत. पूर्ण लसीकरण झालेल्या लोकांची कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूची शक्यता 11 पटींनी कमी होते. तसेच त्यांच्या रुग्णालयात भरती होण्याची शक्यताही 10 पटींनी कमी होते. 


मॉडर्ना लस डेल्टा व्हेरिएंट विरोधात अधिक प्रभावी
लसीच्या प्रभावाची तुलना करता, डेल्टा व्हेरिएंटविरोधात इतर लसींच्या तुलनेत मॉडर्नाची लस ही अधिक प्रभावी असल्याचं या अहवालात सांगण्यात आलं आहे. डेल्टा व्हेरिेंटविरोधात मॉडर्नाची लस ही 95 टक्के प्रभावी आहे तर फायझरची लस ही 80 टक्के प्रभावी आहे. जॉन्सन अॅन्ड जॉन्सन ची लस ही 60 टक्के प्रभावी असल्याचं या अहवालात सांगण्यात आलं आहे. 


अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी लसीकरणाचे नवे धोरण जाहीर केलं आहे. अमेरिकेतल्या ज्या कंपन्यात कर्मचाऱ्यांची संख्या 100 हून अधिक आहे त्या कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण करावं किंवा दर आठवड्याला त्यांची कोरोनाची चाचणी करावी असा आदेश प्रशासनाकडून देण्यात आला आहे. 


संबंधित बातम्या :