India Pakistan War: भारत-पाकिस्तान युद्धाच्या एक पाऊल आणखी जवळ, इकडे मॉकड्रील तिकडे बॉर्डरवर पाकिस्तानचा अंदाधुंद गोळीबार
India Pakistan Tension: पाकिस्तानी सैन्याकडून सीमारेषेवर पुन्हा गोळीबार, भारतीय सैन्याचं चोख प्रत्युत्तर. भारत आणि पाकिस्तान युद्धाची वेळ आता जवळ येऊन ठेपली आहे, असे संकेत.

India Pakistan War: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव आता शिगेला पोहोचला आहे. दोन्ही देशांमध्ये कोणत्याही क्षणी युद्धाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर भारताने शत्रूने हवाई हल्ला (Air Strike) केल्यास सामान्य नागरिकांनी त्यापासून कसे वाचावे, यासाठी देशभरात मॉकड्रील (Mock drill) घेण्याची तयारी सुरु केली आहे. या सगळ्यानंतरही युद्धखोर पाकिस्तान मागे हटायला तयार नाही. पाकिस्तानी लष्कराने (Pakistan Army)सोमवारी रात्री आणि मंगळवारी पहाटे पुन्हा एकदा सीमारेषेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन केले.
पाकिस्तानी लष्कराने कुपवाडा, बारामुल्ला, पुंछ, राजौरी, मेंढर, नौशेरा, सुंदरबनी आणि अखनूर सेक्टरमध्ये अंदाधुंद गोळीबार केला. भारतीय लष्कराकडूनही (Indian Army) त्याला चोख प्रत्युत्तर देण्यात आले. गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानी लष्कराकडून सातत्याने नियंत्रण रेषेच्या परिसरात (LOC) अंदाधुंद गोळीबार केला जात आहे. पाकिस्तान सातत्याने चिथावणी देत असल्याने भारतीय सैन्याकडून लवकरच एखादी मोठी कारवाई होण्याची शक्यता आहे.
पहलगाम हल्ल्यानंतर पहिली मोठी कारवाई
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर सरकारने पहिली मोठी कारवाई केली आहे. जम्मू-काश्मीरमध्ये प्रशासनात मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. त्यानुसार अनंतनाग जिल्ह्यातील सहा पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. पहलगामचे ठाणे प्रभारी (SHO) रियाज अहमद यांची बदली करुन त्यांना अनंतनागला पाठवण्यात आले आहे.
दिल्लीत घडामोडींना वेग
भारत-पाकिस्तान युद्धाच्या शक्यतेमुळे दिल्लीतील घडामोडींना वेग आला आहे. दिल्लीत काल दिवसभरात अनेक महत्त्वाच्या बैठका पार पडल्या. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सोमवारी रात्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. तत्पूर्वी पंतप्रधान मोदी यांनी संरक्षण खात्याच्या सचिवांची भेट घेतली होती. या बैठका अत्यंत महत्त्वपूर्ण मानल्या जात आहेत.
याशिवाय, युद्ध झाल्यास दिल्लीतील महत्त्वाची ठिकाणे शत्रुकडून लक्ष्य केली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे दिल्ली पोलिसांनी युद्धसराव सुरु केला आहे. संपूर्ण पोलीस दलाला हल्ला झाल्यास काय करायचे याचे नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
आणखी वाचा
शाहबाज शरीफ यांची खुर्ची धोक्यात; पाकिस्तानच्या पंतप्रधानांना हातातलं खेळणं बनवणारा असीम मुनीर कोण?























