युनिकॉर्न्स कंपन्यांच्या संख्येत भारताने ब्रिटनला मागे टाकलं; ह्युरन इंडियाचा अहवाल
Start Up India : भारतात सध्या 54 युनिकॉर्न कंपन्या आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी 33 युनिकॉर्न कंपन्यांची भर पडली आहे.

नवी दिल्ली : भारतात आता तरुणाईमध्ये नव कल्पकतेचा विकास चांगलाच होत असल्याचं दिसून येतंय. नव-नवीन कल्पना आणि त्याची अंमलबजावणीमुळे भारतातील कंपन्यांमध्ये मोठ्या संख्येने भर पडत आहे. त्याचसंबंधीत एक ह्युरन इंडियाचा एक अहवाल प्रसिद्ध झाला आहे. भारताने युनिकॉर्न्स कंपन्यांच्या संख्येबाबत आता ब्रिटनलाही मागे टाकलं आहे. भारतात सध्या 54 युनिकॉर्न्स कंपन्या असून ब्रिटनमध्ये 39 युनिकॉर्न्स कंपन्या असल्याचं या अहवालात सांगण्यात आलं आहे. युनिकॉर्न्स कंपन्यांच्या संख्येच्या बाबतीत भारताचा जगात तिसरा क्रमांक लागतो.
युनिकॉर्न्स कंपन्या म्हणजे नेमकं काय?
ज्या कंपन्यांचे भागभांडवल हे 1 अब्ज डॉलर्स किंवा त्यापेक्षा जास्त असतं त्या कंपन्यांना युनिकॉर्न्स कंपन्या म्हटलं जातं. भारतात सध्या 54 युनिकॉर्न्स कंपन्या असून गेल्या वर्षीच्या तुलनेत त्यामध्ये 33 युनिकॉर्न्स कंपन्यांची वाढ झाली आहे. ब्रिटनमध्ये सध्या 39 युनिकॉर्न्स कंपन्या असून गेल्या वर्षीच्या तुलनेत त्यामध्ये 15 नव्या कंपन्यांची भर पडली आहे. भारतातील बंगळुरुमध्ये बोस्टन, पॅलो अल्टो, बर्लिन, शिकागो आणि इतर मोठ्या शहरांच्या तुलनेत जास्त युनिकॉर्न्स कंपन्या आहेत. बंगळुरुमध्ये एकूण 25 युनिकॉर्न्स कंपन्या असून जगभरातील शहरांचा विचार करता हे शहर सातव्या क्रमांकावर आहे.
ह्युरन इंडियाच्या या अहवालानुसार, भारतीयांनी भारताबाहेर, जगभरात 65 युनिकॉर्न्स कंपन्या स्थापन केल्या आहेत. यातील बहुतांश कंपन्या या सिलीकॉन व्हॅलीमध्ये आहेत. गेल्या वर्षाच्या तुलनेत या वर्षी भारतामध्ये एकूण 33 नव्या युनिकॉर्न्स कंपन्या स्थापन झाल्या आहेत. यावरुन भारतामध्ये आता स्टार्टअप कंपन्या स्थापन करण्यासाठी योग्य वातावरण निर्माण होत असल्याचं या अहवालात सांगण्यात आलं आहे.
या अहवालात दिलेल्या माहितीनुसार, Byju’s ही भारतातील सर्वाधिक भांडवल असणारी युनिकॉर्न कंपनी ठरली आहे. या कंपनीचे भागभांडवल हे 21 अब्ज डॉलर्स इतकं आहे. भारतातील सर्वात मोठी ही कंपनी जगातील 15 वी मोठी युनिकॉर्न कंपनी ठरली आहे. भारतातीलच InMobi ही कंपनी जगातील 28 वी युनिकॉर्न कंपनी ठरली आहे. भारतात एकूण युनिकॉर्न्स कंपन्यांपैकी 15 कंपन्या या ई-कॉमर्स क्षेत्रातल्या आहेत असं या अहवालात सांगण्यात आलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
